कोरेगाव : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील रेल्वे स्थानकांत सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची तपासणी आणि प्रवासी वर्गाकडून नव्याने काही सोयी-सुविधांबाबतच्या सूचना जाणून घेण्यासाठी ऑफिस ऑफ दि चेअरमन, पॅसेंजर अमेनिटी कमिटी अर्थात प्रवासी सुविधा समिती गुरुवारपासून (ता.१६) तीन दिवस विभागातील प्रमुख १६ रेल्वे स्थानकांना भेट देणार आहे.
कोरोना साथीच्या काळातील लॉकडाउनमध्ये संपूर्ण कालावधीत बंद ठेवण्यात आलेली रेल्वेसेवा कोरोना नियंत्रणात आल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाली आहे. आता ही सेवा पूर्ण क्षमतेने ‘रुळा’वर आलेली आहे. मध्यंतरी लॉकडाउन काळात रेल्वे स्थानके आणि रेल्वेसेवा बंद असल्यामुळे स्थानकांमध्ये निर्माण झालेल्या नवनवीन समस्यांचा निपटारा करून प्रवासी वर्गाला पूर्ववत सोयी-सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले. या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील रेल्वे स्थानकांची तपासणी करून प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबतच्या सूचना जाणून घेण्यासाठी प्रवासी सुविधा समिती गुरुवारपासून तीन दिवस दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ही समिती पुणे विभागामधील प्रमुख १६ रेल्वे स्थानकांना भेट देणार आहे.
ही समिती उद्या (ता. १५) रात्री कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनल येथे मुक्कामी येणार आहे. गुरुवारी (ता.१६) ही समिती छत्रपती शाहू महाराज टर्मिनल (कोल्हापूर), हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज व सांगली, तर शुक्रवारी (ता.१७) किर्लोस्करवाडी, कऱ्हाड, सातारा, लोणंद आणि जेजुरी या रेल्वे स्थानकांची तपासणी करून तेथील प्रवासी सोयी-सुविधांबाबत सद्य:स्थिती आणि स्थानक व प्रवाशांसाठी नव्याने कराव्या लागणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सूचना जाणून घेणार आहे. शनिवारी (ता. १८) ही समिती पुणे येथे पुणे विभागातील रेल्वेचे डीआरएम आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुणे रेल्वे स्थानकासह हडपसर, शिवाजीनगर, पिंपरी- चिंचवड व देहूरोड रेल्वे स्थानकांची तपासणी करून तेथील प्रवासी सोयी-सुविधांबाबत सद्य:स्थिती आणि स्थानकांत व प्रवाशांसाठी नव्याने कराव्या लागणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सूचना जाणून घेणार आहे.
प्रवासी सुविधा समितीचे अध्यक्ष बी. के. कृष्णदास असून, सदस्यांत छोटूभाई एकनाथ पाटील, भजनलाल शर्मा, डॉ. राजेंद्र अशोक फडके, गोटाला उमराणी, कैलास लक्ष्मण वर्मा, डॉ. अभिलाषा पांडे, वैभिश्र्वनी अवस्थी यांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी सुविधा समिती स्थापन केलेली आहे. ही समिती रेल्वेच्या विविध विभागांचा नियमित दौरा करून रेल्वे स्थानकांमधील प्रवासी वर्गाच्या सोयी-सुविधांबाबत उदाहरणार्थ प्लॅटफॉर्म व्यवस्था, टॉयलेट, पंखे, बुकिंग कार्यालय, तिकीट आरक्षण, स्थानक आणि परिसरातील स्वच्छता, अधिकारी, कर्मचारी प्रवासी वर्गाला देत असलेल्या सेवा-सुविधा आदी समस्या जाणून घेते. त्यातील किरकोळ समस्यांचा निपटारा समितीद्वारे जागेवरच करण्यात येतो.
- छोटूभाई एकनाथ पाटील,सदस्य, पॅसेंजर अमेनिटी कमिटी अर्थात प्रवासी सुविधा समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.