Female Scientist of India : भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. या दिवसानिमित्त जाणून घेऊया भारताच्या अशा महिला सायंटिस्टबद्दल ज्यांनी आपल्या कामाने संपूर्ण जगापुढे आदर्श ठेवला.
१. बिभा चौधरी (Bibha Chowdhuri)
बिभा चौधरी या एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ अन् भारतातील पहिल्या महिला संशोधकांपैकी एक आहे. पाय-मेसन (पिओन) नावाचा नवीन उपअणु कण शोधणाऱ्या या जगातल्या पहिल्या महिला आहेत ज्यांना होमी जे भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये सामील होण्यासाठी निवडले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, त्यांनी कण भौतिकशास्त्र आणि वैश्विक किरणांचा अभ्यास केला. IAU द्वारे HD 86081 या ताऱ्याला स्टार बिभा असे नाव देण्यात आले.
२. जानकी अंमल (Janaki Ammal)
१९७७ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ म्हणून इतिहास रचणाऱ्या आणखी एक भारतीय महिला वैज्ञानिक म्हणजे जानकी अंमल. त्या एक वनस्पतिशास्त्रज्ञ होत्या, ज्यांनी नंतर भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या महासंचालक म्हणून पद स्वीकारले. १९२१ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पतिशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी वनस्पती प्रजनन, सायटोजेनेटिक्स आणि फायटोजिओग्राफीचा अभ्यास केला आणि काम केले. त्यांचे सर्वात उल्लेखनीय काम ऊस आणि वांग्यावर होते.
३. असीमा चॅटर्जी (Asima Chatterjee)
सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसीन क्षेत्रातील आपल्या कार्यासाठी ओळखल्या जाणार्या असीमा चॅटर्जी यांना आजही सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञांमध्ये खूप मोलाचे स्थान आहे. १९३६ मध्ये पूर्वीच्या कलकत्ता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संशोधन सुरु केले. व्हिन्का अल्कलॉइड्सवरील संशोधन, मलेरियाविरोधी औषधांचा विकास आणि मिरगीविरोधी औषधांच्या विकासासाठी त्यांना सन्मानित केले जाते. भारतीय औषधी वनस्पतींवरील कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक पुस्तकांच्या त्या लेखिका देखील आहेत.
४. कल्पना चावला (Kalpana Chawla)
भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचा विचार केल्यास अंतराळवीर आणि एरोस्पेस इंजिनियर कल्पना चावला यांचे कार्य कायम स्मरणात राहील. अंतराळात जाणारी पहिल्या महिला भारतीय त्या होत्या. त्यांनी स्पेस शटल कोलंबिया पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना विघटित झाल्यामुळे आपला जीव गमावला.
५. टेसी थॉमस (Tessy Thomas)
एक भारतीय महिला शास्त्रज्ञ, एरोनॉटिकल सिस्टीमचे महासंचालक आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील अग्नी-IV क्षेपणास्त्राचे माजी प्रकल्प संचालक, थॉमस यांना भारताची ‘मिसाईल वुमन’ म्हणून ओळखले जाते. भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनजवळ लहानाची मोठी झाल्याने रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचे आकर्षण तिथूनच सुरु झाले. क्षेपणास्त्र मार्गदर्शनात डॉक्टरेटसह, थॉमस यांनी या क्षेत्रात अनेक दशके काम केले आहे आणि २००१ मध्ये त्यांना अग्नी सेल्फ-रिलायन्स पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
६. डॉ. अदिती पंत (Dr. Aditi Pant)
भारतीय समुद्रशास्त्रज्ञ, डॉ. पंत या भूविज्ञान आणि समुद्रशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भूगर्भशास्त्रज्ञ सुदिप्ता सेनगुप्ता यांच्यासह १९८३ मध्ये अंटार्क्टिकाला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. पुणे विद्यापीठात बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हवाई विद्यापीठात सागरी विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि लंडनमधील वेस्टफिल्ड कॉलेजमध्ये पीएचडी केली. विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये अनेक उल्लेखनीय पदांवर राहिल्याबद्दल त्या ओळखल्या जातात. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, पुणे युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही त्यापैकी काही आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.