मोबाईल गेम्सचं व्यसन ही आजच्या तरुण पिढीसमोरील एक मोठी समस्या झाली आहे. राजस्थानमधील अलवर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला याचाच प्रत्यय आला. एका १५ वर्षाच्या मुलाचं मानसिक संतुलन अशा मोबाईल गेम्समुळे बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
झोपेत ओरडायचा 'फायर'
पब्जी, बीजीएमआय आणि फ्री फायर या बॅटल रॉयल प्रकारच्या गेम्स आहेत. यामध्ये प्लेयर्स एक प्रकारचे सैनिक असतात, जे ऑनलाईन ग्रुपमध्ये हा गेम खेळतात. यात ते एकमेकांना काही सूचनाही देत असतात. दिवसभर गेम खेळल्यामुळे हा मुलगा झोपेतही त्यातील सूचना ओरडत होता.
झोपेतच तो 'फायर-फायर..', 'साइड से मार.. साईड से..' अशा प्रकारच्या गोष्टी ओरडायचा. यासोबतच त्याचे हातही अगदी गेम खेळताना जशा प्रकारे हलतात, तसेच हलायचे. त्यामुळे घरच्यांनी वैतागून त्याचे हात बांधून देखील ठेवले होते.
दिवसाला १५ तास खेळायचा गेम
मिळालेल्या माहितीनुसार, सातवीत शिकणारा हा मुलगा दिवसाचे १४ ते १५ तास मोबाईल गेम्स खेळायचा. घरात कुणाला कळू नये म्हणून चादरीखाली लपूनही तो गेम खेळायचा. अगदी खाण्या-पिण्याचंही भान त्याला राहत नव्हतं. यामुळे तो वारंवार आजारी देखील पडत होता.
अभ्यासासाठी घेतला मोबाईल
ऑनलाईन शाळा सुरू असताना अभ्यास करण्यासाठी म्हणून पालकांनी या मुलाला मोबाईल घेऊन दिला होता. इंटरनेट समस्या येऊ नये म्हणून घरात वायफाय देखील बसवण्यात आलं होतं. यामुळेच हा मुलगा तासन् तास गेम खेळू शकत होता.
घरातून गेला पळून
सतत गेम खेळतो म्हणून घरच्यांनी यापूर्वी या मुलाला समजावले होते. मात्र, त्यावेळी चिडून तो घरातून पळून गेला होता. अखेर बरीच शोधाशोध केल्यानंतर त्याला घरी आणण्यात आलं. सध्या या मुलाला अलवरच्या एका होस्टेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ त्याच्यावर उपचार करत आहेत. यासोबतच विशेष समुपदेशक देखील त्याची देखरेख करत आहेत.
गेम्सचं व्यसन धोकादायक
मोबाईल गेम्स खेळणाऱ्यांमध्ये एक पॅटर्न नेहमी दिसून येतो. तो म्हणजे, ही गेम खेळणाऱ्यांना हरायचं नसतं. एखादा मुलगा गेम खेळताना हरला, तर जिंकण्याच्या उद्देशाने तो पुन्हा-पुन्हा ही गेम खेळत राहतो. यातूनच पुढे गेम खेळण्याच्या आवडीचे सवयीत, आणि सवयीचे व्यसनात रुपांतर होते. यामुळे गेम खेळताना त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.