ISRO Sun Mission : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, इस्रो आता आपल्या पहिल्या सौर मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता भारताचं हे सूर्ययान लाँच होईल. या मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
भारताचं हे पहिलंच ऑब्जर्वेटरी-क्लास स्पेस बेस सौर मिशन आहे. शनिवारी लाँच केल्यानंतर 'आदित्य'ला 'L1' या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.
आदित्य उपग्रहामध्ये 590 किलोचं प्रॉपल्शन फ्लुएल असणार आहे. तर, यामध्ये असणाऱ्या विविध उपकरणांचं वजन हे एकूण 890 किलो आहे. बंगळुरूममध्ये असणाऱ्या इंडियन इन्सिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सने याचं डिझाईन केलं आहे. तर, यातील प्रमुख पेलोड VELC हा मुख्यत्वे अहमदाबादमध्ये तयार करण्यात आला आहे.
या उपग्रहाला आदित्य नाव देण्यामागे मोठं कारण आहे. आदित्य हे सूर्याच्या 12 नावांपैकी एक आहे. तसंच, भारताचा भास्कर नावाचा एक उपग्रह आधीपासूनच अवकाशात आहे. त्यामुळे, सौर मोहिमेसाठी असणाऱ्या उपग्रहासाठी 'आदित्य' हे नाव निश्चित करण्यात आलं.
L1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित झाल्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल. पृथ्वीवरून या पॉइंटपर्यंत जाण्यासाठी आदित्यला चार महिन्यांचा वेळ लागेल. त्यानंतर पुढे पाच वर्षांपर्यंत आदित्य सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करेल.
सूर्याच्या आतील पृष्ठभागाचं तापमान हे सुमारे 5,500 डिग्री सेल्सिअस एवढं असतं. त्यानंतर मधल्या स्तरांवरील तापमान हे कमी होत जातं. मात्र, सर्वात बाहेरील आवरणावर असणारं तापमान हे पुन्हा कमी होण्याऐवजी वाढून 15 लाख डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं. याच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न आदित्य करेल.
यासोबतच कोरोनल हीटिंग, सौर वादळे, कोरोनाल मास इंजेक्शन, फ्लेअर्स पृथ्वीच्या जवळील अंतराळ हवामान, सूर्यावरील वातावरण आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आदित्य करणार आहे.
इस्रोच्या एका वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य उपग्रह आपल्या उपकरणांच्या मदतीने सूर्याचे कित्येक फोटो घेईल. सोबतच, सौर वादळे आणि इतर गोष्टींबद्दल डेटा गोळा करेल. यासाठी आदित्यमधील SUIT (सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप) चा वापर करण्यात येईल. यानंतर VELC चे शटर उघडून सूर्याचा फोटो घेण्यात येईल. हा डेटा 20 सेकंदांमध्ये इस्रोला मिळणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.