आदित्य एल-1 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. "संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी विश्वाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील" असं मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी हे लाँचिंग यशस्वी झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी यावेळी PSLV चे आभार मानले. पीएसएलव्ही या रॉकेटच्या मदतीने आदित्य उपग्रहाला अपेक्षित कक्षेत पोहोचवता आलं. या मोहिमेत अपर स्टेजमध्ये रॉकेटला दोन वेळा प्रज्वलित करण्यात आलं. हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होता, मात्र पीएसएलव्हीने हे यशस्वीपणे पार पाडलं. असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे देखील आभार मानले, आणि अभिनंदन केले.
आदित्य एल-1 उपग्रह हा रॉकेटपासून वेगळा झाला आहे. या उपग्रहाला पृथ्वीच्या अपेक्षित कक्षेत प्रस्थापित करण्यात यश मिळालं आहे. यामुळे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं इस्रोने घोषित केलं आहे.
पीएसएलव्ही यानाचं प्रक्षेपण होऊन आता एक तास पूर्ण झाला आहे. या काळामध्ये इस्रोने पहिल्या चार टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यानंतर आता काही वेळातच आदित्य उपग्रह रॉकेटपासून वेगळा होईल.
लाँच झाल्यानंतर काही काळापर्यंत पीएसएलव्ही यान हे आपल्या ट्रॅकिंग रेंजच्या बाहेर होतं. यानंतर आता शिपबोर्न टर्मिनलचा वापर करून यानाला ट्रॅक करण्यात यश मिळालं आहे. यामुळे आता यानाचा लाईव्ह डेटा उपलब्ध होतो आहे.
आदित्य उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटपासून वेगळा झाल्यानंतर काही दिवस तो पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे. 18 सप्टेंबरनंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून L1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. आदित्यला आवश्यक तेवढी गती मिळण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
आदित्य उपग्रहाचं लाँचिंग झाल्यानंतर पीएसएलव्ही रॉकेटच्या तीन स्टेज यशस्वीपणे पार पडल्या आहेत. यानंतर हे यान 170 किलोमीटर उंचीवर पोहोचलं आहे.
इस्रोच्या विश्वासार्ह PSLV रॉकेटने आकाशात झेप घेतली आहे. हे रॉकेट आदित्य उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडणार आहे.
आदित्य यानाच्या लाँचिंगसाठी हवामान अगदी योग्य असल्याचं इस्रोने सांगितलं आहे. मोहिमेचे मिशन डायरेक्टर यांनी लाँच सिक्वेन्स सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर ऑटोमॅटिक लाँच सिक्वेन्स सुरू करण्यात आलं आहे.
आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणासाठी मिशन कंट्रोलमधील तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रक्षेपणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोच्या आदित्य एल-1 मोहिमेचं बजेट हे सुमारे 400 कोटी रुपये आहे. आतापर्यंत जगभरात राबवण्यात आलेल्या सौर मोहिमांच्या तुलनेत ही सर्वात स्वस्त मोहीम असणार आहे. इस्रोने यापूर्वी देखील सर्वात कमी बजेटमध्ये चांद्र आणि मंगळ मोहीम यशस्वी करुन दाखवली आहे.
एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर सुमारे पाच वर्षांनंतर उपग्रह जाणार आहे. नवीन पिढीसाठी ही पहिलीच मोहीम असणार आहे. एकाच वेळी ऑप्टिकल, यूव्ही आणि एक्स-रे अशा सर्व पद्धतीने आदित्य सूर्याचं निरीक्षण करेल.(Latest Marathi News)
आदित्य हा उपग्रह L-1 या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी गुरुत्वाकर्षण बल जवळपास नाहीसं होत असल्यामुळे, उपग्रहाला एका ठिकाणी स्थिर ठेवणं कमी इंधनात शक्य होतं. तसंच, या ठिकाणाहून सूर्याचं सातत्याने (24x7) निरीक्षण शक्य आहे. यामुळे हा पॉइंट अगदी महत्त्वाचा आहे, अशी माहिती इस्रोचे माजी संचालक जी. माधवन नायर यांनी दिली.
श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन आदित्य उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शाळकरी मुलं याठिकाणी उपस्थित आहेत.
पुण्यात असणाऱ्या ‘आयुका’ संस्थेतील प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांच्या टीमने ‘इस्रो’च्या सहकार्याने सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपची (सूट) निर्मिती केली आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यापूर्वी अनेक देशांनी मोहिमा राबवल्या आहेत. अंतराळात अमेरिका आणि इतर देशांच्या ऑब्जर्वेटरी आहेत. आतापर्यंत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची एकही वेधशाळा अंतराळात नव्हती. मात्र, आदित्य मोहिमेनंतर भारताचीही स्पेसमध्ये एक ऑब्जर्वेटरी असणार आहे.
11:50 वाजता लाँचिंगचे आदेश दिल्यानंतर टप्प्या टप्प्याने सर्व इंजिन्स सुरू केले जातील. यानंतर 70 सेकंदांनंतर पहिलं आणि दुसरं सेप्रेशन पार पडेल. 92 सेकंदांनंतर PSOM XL सेप्रेशन पार पडेल. यानंतर 584 व्या सेकंदापर्यंत PS 1,2,3 इग्निशन आणि सेप्रेशन हे टप्पे पार पडतील. लाँचनंतर 63 मिनिटांनी, म्हणजे सुमारे तासाभराने आदित्य उपग्रह PSLV रॉकेटपासून वेगळा होईल.
एखादा उपग्रह L1 पॉइंटभोवती असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करणं, हे मोठं आव्हान आहे. आदित्य उपग्रह आपल्यासोबत सात पेलोड घेऊन जात आहे. ही मोहीम इस्रोसाठी अगदी ऐतिहासिक असणार आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले इस्रोचे माजी वैज्ञानिक अण्णादुराई यांनी याबाबत माहिती दिली.
लाँच केल्यानंतर L1 पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्यला साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी लागेल. हे अंतर 15 लाख किलोमीटर एवढं आहे.
आदित्यचा पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचा प्रवास हा पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. यातील पहिला टप्पा हा PSLV रॉकेटचे लाँचिंग असणार आहे. दुसरा टप्पा ऑर्बिट एक्स्पांशन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आदित्यला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर सोडण्यात येईल. चौथा टप्पा हा क्रूज फेज असेल, यामध्ये आदित्य अंतराळात प्रवास करेल. पाचव्या टप्प्यात आदित्यला L1 पॉइंटवर असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येईल.
आज सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी आदित्यच्या लाँचचे थेट प्रक्षेपण सुरू होईल. इस्रोची वेबसाईट, अधिकृत यूट्यूब चॅनल, अधिकृत फेसबुक आणि एक्स हँडल याठिकाणी हे लाईव्ह पाहता येईल. याव्यतिरिक्त डीडी नॅशनल चॅनलवर देखील या लाँचचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
आदित्य उपग्रह हा खरोखरच सूर्यावर जाणार नसून, सूर्याचा लांबूनच अभ्यास करणार आहे. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवरुन 'आदित्य' सूर्याचं निरीक्षण करेल. हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधील एकूण अंतरापैकी केवळ एक टक्का एवढं आहे.
आदित्य एल-1 मोहीम यशस्वीपणे पार पडावी यासाठी वाराणसीमध्ये काही नागरिकांनी हवन केले. भारताची ही पहिलीच सौर मोहीम असणार आहे.
आदित्य उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी काही तास बाकी आहेत. यासाठी इस्रोचं विश्वासार्ह पीएसएलव्ही रॉकेट वापरण्यात येणार आहे. श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरवर असणाऱ्या दुसऱ्या लाँच पॅडवर हे रॉकेट प्रक्षेपणासाठी सज्ज झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.