‘ॲप’निंग : घरबसल्या विस्तारा ज्ञानाच्या कक्षा

Google-Play
Google-Play
Updated on

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरात केलेल्या लॉकडाउनमुळे कार्यालयीन कामकाज, व्यापार, दळणवळण ठप्प झाले आहे. साहजिकच अनेकजण घरी बसून कंटाळले आहेत. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग व्हावा, असे वाटत असेल आणि घरबसल्या काही ‘हटके’ शिकण्याची इच्छा असेल, तर आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी पुढील ॲपना नक्की भेट द्या. अलीकडील काळात डिजिटल शैक्षणिक उद्योग (ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म) वाढीस लागला आहे आणि सध्या लॉकडाउनमुळे अनेकजण या प्लॅटफॉर्मला भेट देत आहेत. त्यामुळे सर्वांना वापरता येतील आणि नवीन काही शिकता येईल, अशा ॲपबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही ॲप ‘गुगल’ प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत.

यूडेमी - यूडेमी हे यूजर बेस्ड लर्निंग ॲप असून, सर्वजण त्याचा वापर करू शकतात. विविध विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना आपले व्हिडिओ आणि कोर्स अपलोड करून ज्ञानदान करण्याचे व्यासपीठ ‘यूडेमी’ने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी हे ॲप फायदेशीर आहे. लॉकडाउनच्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यातील शिक्षक घरबसल्या पैसे कमावू शकतात. केवळ शिक्षकच नाही, तर जगातील कोणीही स्वत:चा ऑनलाइन कोर्स तयार करू शकतो. विषय निवडण्याचे आणि त्याच्याशी निगडित व्हिडिओ अपलोड करण्याचे स्वातंत्र्य यूजर्सना आहे. भाषा, फॅशन, पालकत्व अशा विषयाचे ज्ञान येथे मिळू शकते. 

क्विझॲप - क्विझॲप हे एक गेमिंग ॲप आहे. विविध भाषांमधील सुमारे १२०० विषयांवरील बहुपर्यायी प्रश्नांची (मल्टिपल चॉईस क्वेशन्स) मालिका येथे उपलब्ध आहे. सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी तुम्ही या ॲपचा वापर करू शकता. तसेच या ॲपद्वारे वेगवेगळ्या लोकांशी संवादही साधता येतो. महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडत्या विषयात आपण सर्वोत्तम आहोत, हे दाखवायचे असेल, तर क्विझॲप हे चांगले व्यासपीठ आहे. जगभरातील कोणत्याही व्यक्तीला आव्हान देत तुम्ही क्विझ गेम खेळू शकता.

डॉलिंगो - हे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय ॲप आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण सुमारे  ३० कोटी वापरकर्ते एकाचवेळी या ॲपचा वापर करतात. तुम्हाला कोणती भाषा शिकायची असेल, तर या ॲपशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी, इटालियन, पोर्तुगीज, डच अशा तीसहून अधिक भाषा शिकण्यासाठी हे व्यासपीठ विनामूल्य खुले आहे. शब्दसंग्रह, व्याकरण आणि गेमिंग अशा विविध पायऱ्यांद्वारे नवी भाषा शिकण्यासाठी हे ॲप मदत करते. सर्वात जास्त अमेरिकी नागरिक या ॲपद्वारे नव्या भाषा शिकत आहेत. परकी भाषा शिकण्यासाठी बऱ्याच ठिकाणी भरमसाठ फी आकारली जाते. मात्र, या ॲपच्या मदतीने एक रुपयाही न खर्च करता नवी भाषा शिकण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

खान ॲकॅडमी - खान ॲकॅडमी हे असे शैक्षणिक व्यासपीठ आहे, की ज्याद्वारे विद्यार्थी गणित, विज्ञान-तंत्रज्ञान, संगणक, प्रोग्रॅमिंग, इतिहास आणि इतर बरेच विषय शिकू शकतात. विविध ३६ भाषांमध्ये शिकण्याचा पर्यायही खुला असून, हे ॲप विनामूल्य वापरता येते.

युझिशियन - संगीतप्रेमी मंडळींसाठी हे ॲप फायदेशीर आहे. ज्यांना पियानो, गिटार, बास, युकुले यांसारखे एखादे वाद्य शिकायचे आहे, त्यांनी युझिशियन ॲपला नक्की भेट दिली पाहिजे.  या ॲपमध्ये उपलब्ध असणारे संगीताचे अभ्यासक्रम हे तज्ज्ञ संगीत शिक्षकांनी डिझाइन केलेले आहेत. शेकडो व्हिडिओ, १५०० हून अधिक धडे (मिशन्स), पियानोसाठी शास्त्रीय आणि पॉप गाण्यांसाठीचे शीट यांचा वापर वाद्य शिकताना करता येतो. वाजवत असलेले वाद्य आपण बरोबर वाजवत आहोत की चुकीचे हे या ॲपद्वारे कळते. त्यामुळे आपल्या चुका लगेच कळतात. ॲपमध्ये असलेल्या गेमप्ले पर्यायाद्वारे तुमच्या प्रगतीचे आकलनही केले जाते. हे ॲप आयओएस, ॲण्ड्रॉइड फोन आणि पीसीसाठी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.