देशातील दुचाकींमध्ये मोठी क्रांती होणार आहे. देशातील अग्रगण्य दुचाकी निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाजने मोठे संकेत दिले आहेत. बजाजच्या सर्वात लोकप्रिय बाईक्सपैकी एक असणाऱ्या पल्सरची नवीन रेंज लाँच होणार आहे. सोबतच कंपनी एक CNG बाईक लाँच करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
सीएनबीसीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी कंपनीचा यावर्षीचा प्लॅन एका पत्रकार परिषदेत सांगितला. या आर्थिक वर्षात बजाज ऑटो आपल्या पल्सर दुचाकीची रेंज अपग्रेड करणार आहे. सोबतच, आतापर्यंतची सर्वात मोठी आणि तगडी पल्सर बाईक देखील लाँच करण्यात येणार आहे.
पल्सर ही गाडी बजाजच्याच नव्हे तर एकूणच दुचाकींमध्ये अगदी लोकप्रिय अशी बाईक आहे. तरुणांमध्ये पहिल्यापासूनच या बाईकची क्रेझ राहिली आहे. आता हीच बाईक आणखी दमदार इंजिनसह पुन्हा बाजारात आणण्यात येणार आहे. यासोबतच, नवीन पल्सर गाड्यांमध्ये सहा अपग्रेड्स देण्यात येणार आहेत.
बजाज पल्सर गाडी ही 250cc क्षमतेपर्यंतच्या इंजिनसह उपलब्ध आहे. त्यामुळे आता कंपनी कदाचित 400cc क्षमतेच्या इंजिनसह पल्सर लाँच करेल असं म्हटलं जात आहे. बजाजच्या डॉमिनर या 400 सीसी गाडीचं इंजिनच यामध्ये वापरलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजीव बजाज यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना CNG वाहनांवरील लागू असणारा GST कमी करून 18 टक्के करण्याची शिफारस केली आहे. यामुळे बजाज CNG बाईक लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
यापूर्वीही राजीव बजाज यांनी CNG दुचाकीचा उल्लेख केला होता. यामध्ये ड्युअल फ्युअल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असल्याचं ते म्हणाले होते. म्हणजेच पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही इंधनांवर ही गाडी धावेल असं म्हटलं जात आहे.
अर्थात, याबाबत बजाज कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या गाडीची तयारी कुठपर्यंत आली, किंवा अशी दुचाकी कधी लाँच होऊ शकेल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.