असंख्य स्त्रीया आणि बाळांचे प्राण वाचवणारे सिझेरियन तंत्रज्ञान

Cesarean section: प्रसुतीत जेव्ही अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. यातला एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सिझेरिअन सेक्शन.

Cesarean section
Cesarean sectionSakal
Updated on
Summary

१७९४ साली आजच्याच दिवशी एलिझाबेथ हॉग बेनेट या अमेरिकन महिलेनं सिझेरिअनद्वारे बाळाला जन्म दिला होता त्या निमित्तानं सहज हा आढावा !

Cesarean section: अगदी अश्मयुगीन माणसापासून आजच्या आधुनिक माणसापर्यंत माणसाची शरीररचना असेल,विचार करण्याची पद्धत असेल किंवा आजुबाजूचा परिसर असेल कालानुरूप संख्य असंख्य बदल होत गेले असले तरी ‘निसर्गधर्म’ मात्र फारसे बदलले नाही.इतर प्राणीमात्रांप्रमाणंच श्वासोच्छ्वास-तहानभूक-पुनरुत्पादन या बाबी तेव्हाही होत्या,आजही आहेत,उद्याही राहतील. यातल्या पुनरुत्पादनात गर्भारपण-बाळंतपण-अपत्यजन्म हे महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे (Pregnancy) विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय (Uterus) आकुंचन पावू लागतं आणि ‘कळा’ सुरू होतात आणि त्या वाढत जाऊन अखेरीस नैसर्गिक प्रसूती होते.

अश्मयुगीन स्त्री असेल किंवा आजची आधुनिक स्त्री.इथं सगळ्यांचीच नैसर्गिक प्रसूती होते असं मात्र नाही. प्रसुतीत जेव्ही अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. यातला एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचं (Pregnant) पोट प्रत्यक्ष फाडून आणि गर्भाशयात छेद देऊन बाळाला बाहेर काढलं जातं. विज्ञानविश्वातल्या संशोधनामुळं अश्या प्रक्रारची शल्यक्रिया आता सहजासहजी केली जाते आणि यामुळं माता मृत्यूदर हा प्रचंड कमी आणि बाळाचा जन्मदर प्रचंड वाढलाय. (Cesarean section: which saved the lives of countless women and their babies)

चला,आज या सिझेरिअन सेक्शनबद्दल जाणून घेऊया...


Cesarean section
‘अन् आताही ती फिरतेय’ हे छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं...

प्राचिन भारत आणि चीनमध्ये या बाबतीत एक ना अनेक आख्यायिका असल्या तरी संदर्भ बरेचसे पौराणिक आहेत. एका आख्यायिकेनुसार रोमन सम्राट ज्युलियस सिझरचा जन्म सिझेरिअनमुळं झाल्यानं या शल्यक्रियेचं नाव त्यावरून सिझेरिअन पडलंय अशी वदंता असली तरी त्यातही फारसं तथ्य नाही. मात्र या सिझेरिअननं आपल्या राज्यात नैसर्गिक प्रसुती होत नसेल तर अशी शल्यक्रिया अवलंबावी असा कायदा मात्र पारित केला होता. अर्थात यात मातेच्या आरोग्यापेक्षा राज्याची लोकसंख्या शत्रुराज्यापेक्षा कमी होऊ नये हाच मुख्य उद्देश होता.

मग हा सिझेरिअन शब्द नेमका आला कुठून? तर लॅटिन भाषेतून..लॅटिन Caedare या शब्दाचा अर्थच होतो कापणे किंवा छेद घेणे. जी मुलं मृत मातेचं गर्भाशय फाडून बाहेर काढली जात त्यांना नाव पडलं caesones..विपरित परिस्थितीत जिवंत राहिल्यानं आणि अतिरिक्त वजनामुळं ही बाळं पुढं ‘योद्धे’ म्हणून वापरले जात.


Cesarean section
Nikola Tesla : एडिसननं बल्बचा शोध लावला खरं, पण तुमच्या घरात उजेड पाडला तो या अवलियानं!

इ.स.१५०० पर्यंत नैसर्गिक प्रसूती न झाल्यानं बाळंतीण दीर्घकाळ अडून राही आणि मरणासन्न अवस्थेपर्यंत पोहोचत असत..अनेकदा यात मृत्यू होणं सामान्य होतं. तत्कालिन नियमानुसार मृत गर्भवतीचं पोट फाडून जिवंत मूल मिळवण्याचा प्रयत्न केला जाई आणि यात क्वचित प्रसंगी कधी यशही मिळत असे. याच दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये जेकब नुफर हा वराहपालक त्याच्या व्यवसायाचा एक म्हणून डुक्कर माद्यांची बीजांडं आणि गर्भाशय काढून टाकण्याचं काम करत असे. मुळं या पठ्ठ्याला मादीच्या प्रजनन इंद्रियांचं आणि प्रसुतीचं ढोबळ ज्ञान होतं.

एकदा यात जेकबची बायको गरोदरपण संपून बाळंतपणाच्या अवस्थेत येऊन ठेपली पण कळांवर कळा येऊनही प्रत्यक्षात प्रसूती मात्र होत नव्हती. जेकबनं एक दोन नव्हे तर तेरा सुईणी कामाला लावल्या होत्या पण प्रसुती काही होईना सरतेशेवटी बायकोची मरनासन्न अवस्था बघता त्यानं स्थानिक प्रशासनाकडं धाव घेतली आणि चक्क त्यांच्याकडून जिवंत बायकोचं पोट फाडण्याची रितसर परवानगी मिळवली. अडलेल्या बायकोला मोकळं करण्यासाठी आता तो स्वतः हे धाडसी पाऊव घरच्या घरीच उचलणार होता. त्यानं बायकोला घरातील ओट्यावर ठेवलं आणि त्याच्या जवळची आयुधं वापरून शल्यक्रिया केली. पण ‘भूल दिली होती का नाही?’ हे मात्र सांगता येणार नाही. जेकबच्या हाताला यश आलं आणि चक्क बाळ-बाळंतीण दोघंही सुखरूप राहिले.

जेकबच्या बायकोनं पुढं पाच अपत्यांना नैसर्गिकपणं जन्म दिला आणि ते पोट फाडून अर्थात सिझेरिअनमुळं जन्माला आलेलं बाळही सत्तरीपार जगलं. जेकबनं केलेली यशस्वी ही या संदर्भातील महत्वाचा आणि दिशादर्शक असा टप्पा ठरली. याच कालावधीत मानवी शरीराचाही साकल्यानं अभ्यास सुरू होता..इ.स.१५४३ साली प्रकाशित झालेल्या एका शरीररचना ग्रंथात स्त्रीच्या गर्भाशय आणि संबंधित जननमार्गांचं व्यवस्थित वर्णन केलेलं आढळतं.

इ.स. १६००साली सिझेरिअन न करताही चिमट्याच्या मदतीनं अडलेलं बाळ मोकळं करण्याचा एक नवा प्रयोग ‘चेंबरलेन’ यानं केला तो म्हणजे ‘फोर्सेप डिलिव्हरी’ त्याला मर्यादित यशही मिळालं. अठराव्या शतकात मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास झाला आणि रितसर प्रशिक्षणही सुरू झालं..सुईणी थोड्या कालबाह्य होत गेल्या. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सिझेरिअन शल्यक्रिया बहुतांशी पुरुषच करत कारण स्त्रियांना तसं रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण मिळत नव्हतं..इ.सं १८१५ ते १८२१ या दरम्यान एका ब्रिटिश स्त्रीनं अशी शल्यक्रिया केल्याची नोंद मात्र सापडते. या शल्यक्रियांदरम्यान संबंधित स्त्रीला भूल कशी देत याचे फारसे उल्लेख सापडत नाहीत..

१८७९ साली युगांडात केलेल्या एका सिझरच्या वेळी त्या स्त्रीला केळींपासून बनवलेली वाईन देण्यात आली होती आणि याच शल्यक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी करण्यासाठी ‘कॉटरी’ या तंत्राचा वापर केला गेला. पुढं बाळंतीणीला भूल देण्यासाठी नानाविविध वनस्पतींचे अर्क वापरले जाऊ लागले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप-अमेरिकेत खास स्त्रियांच्या समस्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये उभी राहिली आणि १८४६ मध्ये रुग्णाला संपूर्ण भूल देण्यासाठी ‘इथर’चा वापर केला गेला. ही एक क्रांतिकारी घटना असली आणि लवकरच त्याचा वापर शल्यक्रियामध्ये वाढू लागला तरी सिझेरिअनसाठी मात्र स्त्रिया त्याचा स्वीकार करेना कारण काय? तर अंधश्रद्धा. इव्हच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून स्त्रीनं अपत्यास जन्म देताना असह्य वेदना सोसल्याच पाहिजेत ही समजूत रूढ होती आणि काही केल्या तिचं निराकरण होत नव्हतं..

सरतेशेवटी दस्तूरखुद्द व्हिक्टोरिया राणीनं १८५३ आणि १८५७ मध्ये आपल्या दोन अपत्यांना जन्म देताना भूल म्हणून क्लोरोफॉर्मचा स्वीकार केला आणि त्याचे अपेक्षित सामाजिक पडसाद उमटले आणि तेव्हा कुठं इतर बायकांनीही अनुकरण सुरू केलं. भूलीचा वापरही सुरू झाला आणि बाळंतपण सुसह्य झालं तरीही अनेकदा बायका शल्यक्रियेनंतर जंतुसंसर्गानं मरत. पॅरीस मध्ये तर १७८७ ते १८७६ या कालखंडात सिझेरिअन झालेली एकही स्त्री जगली नव्हती. या शल्यक्रियांमध्ये तेव्हा मूल काढल्यानंतर गर्भाशय शिवलं जात नव्हतं..गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावून पुढं तो छेद आपोआप बुजेलच असा गैरसमज होता पण अनेकदा तसं होत नसल्यानं कित्येकदा स्त्रिया रक्तस्त्रावानं किंवा जंतुसंसर्गानं मरत असत. यावर जालीम उपाय म्हणून एका डॉक्टरनं तर सिझेरिअन नंतर गर्भाशयच काढून टाकणं हा मार्ग अवलंबला..१८८२ साली एम.साॅमल्नंगर या डाॅक्टरनं सिझेरिअन पश्चात ‘गर्भाशय शिवलंच पाहिजे’ असा आग्रह धरला. टाके घालण्यासाठी त्यानं चांदीच्या पातळ तारा वापरल्या. आता समस्या उरली फक्त जंतुसंसर्गाची..एकोणीसाव्या शतकात प्रतिजैविकांचा विकास झाला आणि ही समस्याही मोठ्या प्रमाणात सुटली. भूलशास्त्रातही विकास होत केला आणि फक्त कमरेखालील भाग बधीर केला जाऊ लागला. हजारो वर्षांच्या इतिहासात प्रसुतीतंत्र बरंचसं रांगडं होतं. माता आणि बालक मृत्युदर प्रचंड मोठा होता..

आज हे तंत्र एक सुलभ शल्यक्रिया झालंय किंबहुना डाॅक्टर लोकं पैश्यासाठी सिझरच करतात हा मतप्रवाह हल्ली रुढ झालाय परंतु:

▪️बाळाची स्थिती उलटी असेल..

▪️बाळ आडवं असेल..

▪️बाळाचं डोकं मोठं असेल..

▪️बाळाची हृदयगती मंदावत असेल..

▪️जुळी/तिळी बाळं असतील..

▪️नाळेचा गुंता झाला असेल..

▪️आई कमकुवत असेल किंवा तिला संलग्न आजार असतील..

तर सिझेरिअन शिवाय उत्तम आणि सुरक्षित पर्याय नाही..

आपल्याकडं शहरी भागात सिझेरिअन सेक्शन ‘सिझर’ म्हणून बरंच पॉप्यूलर झालंय,ग्रामीण भागात याला ‘शिज्रिंग’ म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()