तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे गुगलला कशी मिळतात? जाणून घ्या सविस्तर

Do you know how Google works to answer your questions read full story
Do you know how Google works to answer your questions read full story
Updated on

नागपूर : गुगल... गुगल म्हणजे काय हे आता कुणालाही सांगायची गरज नाही. या पृथ्वीतलावर असा व्यक्ती सापडणार नाही ज्याला गुगलबद्दल माहिती नाही. कारण, आज प्रत्येक जण गुगलचा वापर करीत आहे. प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्यासाठी गुगल हा खात्रीशीर पर्याय समजला जात आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर गुगललाच सर्वकाही माहिती आहे असे म्हटले तरी चालेल! मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला का? गुगलच काम कसे चालते? अगदी क्षणार्धात माहिती उपलब्ध करून देणाऱ्या गुगलची यंत्रणा कशी काम करते? चला तर जाणून घेऊया गुगलबद्दल...

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात गुगल हे अत्यंत महत्वाचे साधन बनले आहे.  विद्यार्थ्यांपासून ते गृहिणींपर्यंत सर्वांनाच पडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रश्नाचे उत्तर गुगल चुटकीत देतो. आता तर कुणाच्या घराचा पत्ता शोधण्यापासून तर रेसिपी तयार करण्यापर्यंत गुगलचा वापर होत आहे. आता प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर करीत आहे. जणू गुगल जीवनाचा एक भाग झालेला आहे. 

दिवसेंदिवस वाढत चाललेली गुगलची व्याप्ती जगासाठी वरदान ठरत आहे. यामुळे अशक्य वाटणारे कामही शक्य वाटू लागले आहे. गुगलमुळे माहितीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नागरिकांसाठी सुलभ झालेल्या गुगलबद्दल मात्र नागरिकांना जास्त काही माहिती नाही. गुगलच्या कामाबद्दल काही माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.

वेब क्रॉलिंग

गुगल हे आपण काहीतरी शोधणे सुरू करतो त्या आधीपासून काम करीत असते. यातली पहिले काम असते क्रॉलिंग.  या शब्दाचा मराठी  अर्थ हा रांगणे/रेंगाळणे असा होतो.  जेव्हा एखादा वापरकर्ता सर्च इंजिनवर एखादा शब्द लिहितो तेव्हा गुगल ती माहिती त्याच्या डाटाबेसमध्ये शोधते आणि त्यासंबंधी असलेली माहिती सादर करते. त्यासाठी सर्च इंजिन स्वत:च्या वेब क्रॉलर या  प्रोग्रॅमचा वापर करून कोट्यावधी वेब पेजेस क्रॉल करते. या वेब क्रॉलरला सामान्यतः सर्च इंजिन बॉट किंवा सर्च इंजिन स्पायडर  म्हणतात. हे क्रॉलर्स, बॉट्स किंवा स्पायडर्स हे दुसरे तिसरे काही नसून कोडिंग केलेला एक प्रोग्रॅम असतो. याद्वारे इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक संकेतस्थळाला भेट दिली जाते आणि त्या संकेतस्थळाची माहितीची नोंद करण्यात येते.  ही प्रकिया अत्यंत गुंतागुंतीची आणि वेळ घेणारी आहे. मात्र, गुगलचे काम चालण्यासाठी ही सर्वात आवश्यक पायरी आहे. या प्रक्रियेशिवाय गुगल आपल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊ शकत  नाही.

इंडेक्सिंग

क्रॉलिंग दरम्यान मिळवलेली सगळी माहिती सर्च इंजिनच्या डेटाबेसमध्ये जोडली जाते. या प्रक्रियेला इंडेक्सिंग असे म्हणतात. इंडेक्सिंग म्हणजे उपलब्ध झालेल्या माहितीच्या नोंदी घेणे. गुगलचा क्रॉलर प्रोग्राम नवीन संकेतस्थळांवर शोध घेत जातो आणि  त्या सर्व संकेतस्थळांवर असलेल्या महितीचा एक एक डेटाबेस बनवतो. या डेटाबेसला इंडेक्स म्हणतात. या मिळालेल्या माहितीवर  प्रक्रिया करून त्याचा इकमेकांशी संबंध जोडण्यात येतो. तसेच  त्या माहितीचे वर्गीकरण देखील केले जाते. 

पेज रँकिंग

पेज रॅकिंग म्हणजे जेव्हा वापरकर्ता एखादी माहिती शोधतो तेव्हा त्याला मिळणारी माहिती ही पेजवर ज्या क्रमांकावर दिसते त्याला रँकिंग म्हणतात. गुगल मिळालेल्या माहितीवर जी प्रक्रिया करतो त्यानुसार माहितीचा रँक ठरत असतो.  प्रत्येक पेजवर वापरकर्त्याला १० रिझल्ट्स दिसतात ते  त्यांच्या ठरलेल्या रँकनुसारच दिसत असतात. इंडेक्सिंग सोबतच त्यावर प्रक्रिया करताना त्याचा पेज रँक देखील ठरवला जातो. माहितीचा शोध घेण्यासाठी जे शब्द गुगलकडे आपण देतो त्या शब्दांनुसार माहितीची रँक ठरते. कुठले संकेतस्थळ शोध उत्तरांत वर दिसेल हे देखील या पेज रँकिंग वरून हे निश्चित होते.

सर्च

ही एखादी माहिती मिळवण्याची शेवटची पायरी असते.  जेव्हा वापरकर्ता एखादा किवर्ड गुगलच्या सर्च बारवर टाकतो तेव्हा सर्च इंजिनचा प्रोग्राम लगेच त्या शब्दांशी संबंधित माहितीचा शोध इंडेक्समध्ये सुरू करतो. आपल्या शब्दांशी निगडित असलेली सर्व संकेतस्थळे एकत्र करतो. त्यांचा पेज रँक ठरवतो आणि क्षणात ती यादी आपल्यासमोर शोध निकाल  म्हणून दाखवतो. सर्व प्रक्रिया एका क्षणात पार पाडते आणि आपल्याला हवी असणारी माहिती  तत्काळ उपलब्ध होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.