Gopichand Thotakura Blue Origin : अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अंतराळ संशोधनासाठी ब्लू ओरिजिन नावाची कंपनी उभारली होती. ही कंपनी सहा अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. यापैकी एक अंतराळवीर म्हणून आंध्र प्रदेशच्या गोपीचंद थोटाकुरा यांची निवड झाली आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास गोपीचंद हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील.
यासोबतच, अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय सिव्हिलियन ठरतील, असंही म्हटलं जात आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय म्हणून राकेश शर्मा यांना ओळखलं जातं. ते तत्कालीन विंग कमांडर होते. तसंच यापूर्वी कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, राजा चौधरी हे भारतीय वंशाचे अंतराळवीर अवकाशात गेले आहेत. मात्र, हे सर्व अमेरिकेचे नागरिक होते.
गोपीचंद थोटाकुरा हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे जन्माला आले होते. ते सध्या अमेरिकेत वास्तव्यास असतात. प्रिझर्व्ह लाईफ या मल्टी-मिलियन डॉलर वेलनेस सेंटरचे ते सहसंस्थापक आहेत. त्यांनी विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं असून, ते पायलटही आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी ते भारतात मेडिकल एअर-इव्हॅक्युएशन सर्व्हिस चालवत होते.
गोपीचंद यांनी सांगितलं, की एक सामान्य नागरिक म्हणून अंतराळात जाणं हे अधिक रोमांचक आहे. तसंच, पुढे जाऊन आपणही अंतराळवीर होऊ अशी प्रेरणा यामुळे लहान मुलांना मिळेल; असं ते म्हणाले.
"मी आठ वर्षांचा असताना KLM विमानाचं कॉकपिट पाहिलं होतं. तेव्हापासूनच मला विमानं आणि उड्डाण यामध्ये रस निर्माण झाला. माझ्या अंतराळात जाण्याच्या योजनेबद्दल माझ्या घरच्यांनाही माहिती नव्हतं, ब्लू ओरिजिनच्या घोषणेनंतर त्यांना हे समजलं" असंही ते म्हणाले.
Blue Origin कंपनीचं NS-25 हे अगदी खास मिशन असणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच ही कंपनी अंतराळात मानव पाठवणार आहे. यापूर्वी 2022 साली या कंपनीने NS-23 हे मानवरहित उड्डाण केलं होतं. मात्र, ते यशस्वी ठरलं नाही. यानंतर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने ब्लू ओरिजिनच्या सर्व मोहिमा थांबवल्या होत्या. या उड्डाणाबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंपनीला काही सुधारणा सांगण्यात आल्या.
त्यानंतर कंपनीचं NS-24 हे मिशन 2023 च्या डिसेंबरमध्ये लाँच झालं. ही मोहीम यशस्वी ठरली. त्यानंतर आता NS-25 या मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. ही मोहीम कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये पृथ्वीच्या कार्मन लाईन या कक्षेच्या पुढे अंतराळवीरांना नेण्यात येईल. हे सर्व काही मिनिटं अंतराळात राहतील, आणि मग हळू-हळू त्यांना खाली आणण्यात येईल.
गोपीचंद यांच्यासोबत या मोहिमेमध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट मेसन एंजेल, फ्रेंच आंत्रप्रेन्यर सिल्व्हियन शिरॉन, अमेरिकेतील टेक आंत्रप्रेन्यर केनेथ एल. हेस, निवृत्त अकाउंटंट कॅरोल शॅलर आणि अमेरिकेचे माजी एअर फोर्स कॅप्टन एड ड्वाएट हे असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.