MedTech Mitra : 'मेडटेक' उत्पादनांसाठी केंद्राचा महामार्ग, नवीन पोर्टल केलं लाँच

सरकारने सुरू केलेले ‘मेडटेक मित्र’ हे फक्त पोर्टलच नाही; तर तज्ज्ञांची मदत, सुविधा, तांत्रिक सहाय्य आणि नियामक मार्गदर्शनाची व्यापक प्रणाली आहे. मेडटेक मित्र खिडकीमध्ये प्रवेश करण्यासाठी सरकार वैज्ञानिक, नवोदित, स्टार्टअप आणि स्थापित कंपन्यांना आमंत्रित करत आहे.
मेडटेक
मेडटेकsakal
Updated on

MedTech Mitra Portal by Indian Government : केंद्र सरकारने अलीकडेच क्लिनिकल मूल्यमापन, नियमन सुलभीकरण आणि नवीन मेडटेक उत्पादनांच्या खरेदीसाठी नवकल्पकांना हाताशी धरून ‘मेडटेक मित्र’ उपक्रम सुरू केला आहे. मेडटेक उत्पादनाचा प्रवास (उदा. वैद्यकीय उपकरण किंवा निदान) एका शोधकर्त्याच्या कल्पनेतून सुरू होतो, जो प्रयोगशाळेत त्याची पुरावा संकल्पना (पीओसी) प्रदर्शित करतो. शोधकर्त्याला पुढील चाचणीसाठी आराखडा (प्रोटाइप) तयार करण्यासाठी भागीदाराची आवश्यकता असते. उत्पादनास प्राण्यांच्या अभ्यासाची आवश्यकता भासू शकते. शेवटी, कठोर नियामक व नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आणि मजबूत संशोधन पद्धती वापरून मानवी अभ्यास करणे आवश्यक आहे. मंजूर आणि परवानाकृत उत्पादनानंतर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाची, तसेच बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या संधीची वाट पाहत असते.

नवोन्मेषक आणि स्टार्टअप्स त्यांच्या तांत्रिक कामात खूप चांगले असू शकतात; परंतु क्लिनिकल सेटिंगमध्ये कल्पनाशक्ती ते उत्पादन वापरासाठी सज्ज अशा प्रवासातील मार्गक्रमणा जटिल आहे. अनेकदा योग्य वेळी सर्वसमावेशक मार्गदर्शन, सुविधा मिळत नाहीत. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी नियामक आवश्यकता, चाचणी व प्रमाणीकरण, उद्योगश्रेणी उत्पादन, प्राणी अभ्यास, क्लिनिकल मूल्यमापन/चाचण्या, तंत्रज्ञान मूल्यमापन अत्यावश्यकता अशांपैकी काही कारणास्तव त्यांना समजून न घेण्याच्या आणि संधींच्या अभावाशी संबंधित आहेत. परिणामी, संभवतः प्रभावी असणारी मोठ्या प्रमाणावरची मेडटेक उत्पादने (Medtech Products) विकासाच्या मार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर अडकून राहतात. यामुळे अनेक नवकल्पक निराश होतात. या अस्वीकारार्ह परिस्थितीमुळे नवोन्मेषाची आणि उद्योजकतेची भावना तसेच प्रतिभा दडपली जाते.

‘मेडटेक मित्र’ची मुहूर्तमेढ

शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सना भेडसावणाऱ्या समस्यांच्या निराकरणासाठी, नवकल्पकांना त्यांच्या मेडटेक उत्पादनांच्या विकासाच्या आणि वाढीच्या प्रवासात मदतीसाठी केंद्र सरकारने सुविधाजनक आणि मदतीचा हात देणारा महामार्ग तयार केला आहे. २५ डिसेंबर २०२३ रोजी, सुशासन दिनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नीती आयोग तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटना (सीडीएससीओ) यांच्या भागीदारीने ‘मेडटेक मित्र’ उपक्रम सुरू केला. ‘आयसीएमआर’मधील वैद्यकीय उपकरण आणि निदान मिशन सचिवालयाने आयसीएमआर संकेतस्थळावर पोर्टल कार्यान्वित केले आहे. (https://medtechmitra.icmr.org.in/) अर्जदाराकडून इनोव्हेटर/स्टार्टअप, उत्पादन आणि त्याच्या विकासाच्या टप्प्याचे ऑनलाइन तपशील भरणे आणि मार्गदर्शनाची विनंती करणे, आयसीएमआर-सीडीएससीओ पथक प्रकरणाचे परीक्षण करणे, आवश्यक मदतीचे क्षेत्र ओळखणे, वैयक्तिक संवाद साधणे आणि विशिष्ट सुविधा उपायांसाठी वैयक्तिक अर्जदाराला मदतीचा हात देणे, हा हेतू यामागे आहे.

संस्थात्मक सहकार्यावर भर

प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल अभ्यास हे मोठे आव्हान आहे- तुम्हाला सहयोगी संघ आणि निधीची आवश्यकता असते. मेडटेक मित्र पथक ‘आयसीएमआर’च्या प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल ट्रायल्स नेटवर्क आणि इतर संशोधन संस्थांच्या संशोधकांशी नवोदितांना जोडणार आहे. वैज्ञानिक पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे निवडलेल्या नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानावर आधारित प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल अभ्यास करणाऱ्या संस्थांना निधी दिला जातो. मेड-इन-इंडिया मेडटेक उत्पादनांचा विकास, प्रमाणीकरण, अधिकृतता आणि खरेदीसाठीच्या या महामार्गाचे अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), फार्मास्युटिकल्स विभाग, संशोधन संस्थांचे इन्टेन्ट नेटवर्क, कलाम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी आणि आरोग्य संशोधन विभागातील दोन कार्यक्रम (भारतातील आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकन आणि मार्गदर्शक तत्त्वे केंद्र) हे मुख्य भागीदार आहेत. प्रारंभ झाल्यापासून अल्पावधीतच ऐंशीहून अधिक नवोन्मेषक मेडटेक मित्रांशी जोडले आहेत, जे मदतीचा हात देणाऱ्या यंत्रणेची अपूर्ण असणारी गरज दर्शवतात. भविष्यात या प्रणालीची संभाव्य व्याप्ती खूप मोठी राहिल.

मेडटेक उद्योग हे उदयोन्मुख क्षेत्र आहे, ज्याचे मूल्य सध्या ११ अब्ज अमेरिकी डॉलर असून, २०३०पर्यंत ते ५०अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. भारताची नवोन्मेष परिसंस्था अधिकाधिक उजळ होत आहे. देशात एक लाखाहून अधिक स्टार्टअप्स आहेत (काही वर्षांपूर्वी पाचशेच्या तुलनेत), त्यातील वैद्यकीय तंत्रज्ञानावर केंद्रित असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. भारतामध्ये निदानासह वैद्यकीय उपकरणांची मोठी मागणी आहे; परंतु आपण त्यापैकी ८०% आयात करतो. स्वदेशी मेडटेक उत्पादने बहुतेक वेळा कमी तंत्रज्ञानाची असतात. हे चित्र बदलले पाहिजे- केवळ देशाच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठीही. वैद्यकीय तंत्रज्ञानाचे सुपर हब बनणे हे भारताचे भाग्य आहे. यासाठी नवकल्पना आणि संशोधन व विकास प्रणाली उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या उद्योगाला जगभरातील उच्च दर्जाच्या आणि नाविन्यपूर्ण मेडटेक उत्पादनांच्या पुरवठादारामध्ये स्वतःचे रूपांतर करावे लागेल.

संशोधन, विकासाला प्रोत्साहन

सरकारने अलीकडे मेडटेक क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. वैद्यकीय उपकरणे पार्क विकसित केले जात आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरण सुरू केले आहे. नवोन्मेषाचे राष्ट्रीय धोरण जारी केले आहे. फार्मा-मेडटेक क्षेत्रातील वाढीव नवोपक्रमाच्या पारंपरिक दृष्टिकोनाचे विघटनकारी नवोपक्रमात रूपांतर करण्यासाठी संशोधन व विकास प्रोत्साहन योजना (पीआरआयपी) अलीकडेच सुरू केली आहे. मेडटेक क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण तसेच संशोधन व विकास प्रक्रियेमधील वरील प्रयत्नांचा एक सातत्यपूर्ण भाग म्हणून मेडटेक मित्र उपक्रमाकडे पाहिले गेले पाहिजे; ज्यात पंतप्रधानांच्या ‘जय विज्ञान, जय अनुसंधान’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या आवाहनाला मूर्त रूप आहे.

मेडटेक उत्पादने विकसित भारताच्या प्रवासातील औद्योगिक पोर्टफोलिओचा प्रमुख भाग म्हणून उदयास येतील. मेडटेक मित्र हे फक्त पोर्टल नाही, तर तज्ज्ञांची मदत, सुविधा, तांत्रिक सहाय्य आणि नियामक मार्गदर्शनाची प्रणाली आहे. मेडटेक मित्र खिडकीमध्ये प्रवेश करण्यासाठी सरकार वैज्ञानिक, नवोदित, स्टार्टअप आणि स्थापित कंपन्यांना आमंत्रित करत आहे. नवोन्मेषकांचा मित्र असणाऱ्या या प्रणालीला सतत जाणून घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ‘मेडटेक मित्र’मध्ये भारताच्या ‘मेडटेक नवोन्मेष परिसंस्थे’चे आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाचे रूप पालटून टाकण्याची क्षमता आहे. हे व्यासपीठ स्वदेशी, उच्च दर्जाची, परवडणारी वैद्यकीय उपकरणे आणि निदानाद्वारे सार्वत्रिक आरोग्य संरक्षण मिळविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळकट करेल.

विनोद पॉल

(लेखक नीती आयोगाचे सदस्य आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.