माकडांवर प्रयोग करुन प्रेमभावनेचा शास्त्रीय उलगडा करणाऱ्या अवलियाची गोष्ट!

हॅरीच्या जन्मदिनी सहज हा पोस्टप्रपंच..
harrys
harrys esakal
Updated on
Summary

हॅरीच्या प्रयोगांबद्दल अगदी तांत्रिक-तात्विक मतभेद असलेत तरी त्याच्या संशोधनामुळं मानसशास्राला अन् प्रेम या संकल्पनेच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली एवढं मात्र नक्की. हॅरीच्या जन्मदिनी सहज हा पोस्टप्रपंच..

मित्रहो, 'प्रेम' हा वरवर कवी आणि तत्वज्ञांचा प्रांत वाटत असला तरी त्यामागेही 'विज्ञान' आहे. साधं 'लव्ह ॲट फर्स्ट साईट' हे प्रकरण देखील वाटते तेवढे साधंसरळ नाही. 'अ' ला बघून 'ब'चं नॉरॲड्रेनॅलिन वाढते ते ॲड्रेनॅलिनला धक्का देते मग डोपामाईन धावू लागते त्याच्यासोबत फिनिलइथेलॅमाईन निघते तेव्हा कुठं 'ब'च्या तळहातांना घाम येतो-छातीत धडधड वाढते-पोटात गुदगुल्या होतात. 'अ' विचारते 'काय झालं?' अन् 'ब' उत्तर देतो "कुछ कुछ होता हैं तुम नहीं समझोगी!"

विज्ञानात 'कुछ कुछ' वगैरे काही नसते संप्रेरकांपासून अनेक केमिकल्स इथे कामाला लागलेले असतात तेव्हा कुठं 'प्रेम' होतं. आहात कुठं? कुणासाठी 'प्रेम' ही सिद्ध करण्याची गोष्ट असेल तर कुणासाठी नसेल पण विज्ञानविश्वात-वैद्यकशास्रात-मानसशास्रात या अनुषंगाने अभ्यास होत आला, अनेक प्रयोग होत आलेत. आज या 'प्रेमाची आणि त्यामागच्या मानसशास्त्राची' गोष्ट सांगतो. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात अनेक तज्ज्ञ प्रेमाला ढोबळपणे एका प्रकारचे 'भावनिक वर्तन' मानत. काही वर्तनशास्रतज्ज्ञ तर 'प्रेम हे प्रसंगी घातक अस्त्र ठरू शकते' अशी मांडणी करत. अनेक विचारवंत-मनोअभ्यासक प्रेमासारख्या भावनेतून मानसिक समस्या आणि मानसिक समस्येतून आजार निर्माण होतात या विचारांचे होते.

harrys
पहिल्यांदाच सूक्ष्मजंतू व आदिजीवांचे निरीक्षण करणाऱ्या लेव्हेनहूक यांची कहाणी

मुळात मनाचं 'शास्त्र' असतं हे रुढ होण्याचा तो काळ असल्याने अनेक तज्ज्ञ लोकदेखील अतिरिक्त शास्त्रीय कारणीमिमांसा करतांना परस्परविरोधी अन् अतिरेकी विधानं करत. वर्तनशास्राच्या चळवळीनं मानसशास्राला झाकोळून टाकले होते, त्यामुळे या क्षेत्रात तंत्रशुद्ध-विवेकवादी-विज्ञाननिष्ठ निरिक्षण आणि संशोधनाची तीव्र आवश्यकता होती. 'हॅरी हार्लोव' या अमेरिकन मानसशास्रज्ञाने पहिल्यांदा प्रेमाला विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात बघितलं-त्यावर अभ्यास केला-प्रयोग केले.

अर्थात त्याचे प्रयोग वादग्रस्त ठरले तरी यातून त्यानं 'प्रेम' या संज्ञेभोवती असणाऱ्या 'जवळीक-आपुलकी-जिव्हाळा-भावनिक बंध' या बाबींवर अत्यंत मौलिक अन् सुक्ष्म निरिक्षणं मांडली. वादग्रस्त असले तरी त्यानं अनेक परिणामकारक निकाल देतील असे रंजक प्रयोग केले. त्यात त्याने प्रेमाची ताकद, प्रेमाचा अभाव अन् या दोघांही घटकांचा मनावर-शरीरावर होणारा परिणाम माकडांवर केलेल्या प्रयोगांतून सप्रमाण सिद्ध केले. या वेळी त्यानं 'प्रेम-काळजी' या बाबी एकूण निरोगी दैनंदिन आयुष्यासाठी पर्यायाने व्यक्तीमत्व विकासासाठी महत्त्वाच्या असल्याचेही निरिक्षण नोंदवले.

harrys
वर्ल्ड फेमस ‘डनलप टायर्स’ बनवणाऱ्या डनलप भाऊंची कहाणी

प्रेम या संकल्पनेबाबत 'बंध जुळणं' महत्वाचे असल्याचा तत्कालिन समज होता. हॅरीनं फक्त इतकेच पुरेसे नसून त्यात एक उब असणे, त्याची जोपासना होणे हे ही महत्वाचे असल्याचे अधोरेखित केले. हॅरीनं माकडाच्या नवजात पिल्लांना घेऊन एक रंजक प्रयोग केला. त्याने या पिल्लांना त्यांच्या आईपासून दूर करत दोन पर्याय दिले. एक माकडीणीची गोड-मऊ प्रतिकृती तर दुसरी यंत्रवत बनवलेली पण दुधाची नळी जोडलेली प्रतिकृती. पिल्लांनी काय करावं? दुध पिण्यापुरतं ते यंत्रवत प्रतिकृतीकडं गेले पण त्यांनी अधिकाधिक वेळ कापडी मऊ प्रतिकृतीसोबतच घालवला. यातून शारिरिक पोषणासाठी आवश्यक असलं तरी दूध हा घटक केवळ दुवा ठरलं पण विश्वास-स्पर्श-उब या गोष्टींनी खऱ्या अर्थानं बंध निर्माण झाला-नातं जुळले.

या प्रयोगात पुढं त्यानं जेव्हा कापडी प्रतिकृती तिथून काढली तेव्हा पिलं कावरीबावरी झाली. काही जागीच थिजले तर काहींनी रडून ओरडून गोंधळ घातला, यातील काही जखमी झाले तर काही कल्लोळात दगावले यातून 'सुरक्षेची भावना' हा देखील नात्यातला महत्त्वाचा घटक आहे असा निष्कर्ष निघाला.

या प्रयोगानं 'प्रेम' ही एक व्यापक संकल्पना अन् नात्यातला अत्यंत आवश्यक असा घटक आहे यावर शिक्कामोर्तब केलं. प्रेमाच्या अभावामुळे व्यक्ती भावनिकदृष्ट्या कोलमडू शकते आणि त्याचा व्यक्तीमत्वावर परिणाम होऊन दिर्घकालिन नुकसान होऊ शकते प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो हे ही लक्षात आले.

harrys
फक्त 20 सेकंद मोकळ्या वातावरणात राहिलेल्या 'बबल बॉय' डेव्हिडची कहाणी

हॅरीच्या प्रयोगांनी जगभरात उलथापालथ केली, अनेक समज-गैरसमज दूर केले, अनाथाश्रम-मानवी हक्क-सामाजिक संस्था इथे काम करणाऱ्यांची मनोभूमिका अधिक सकारात्मक आणि डोळस झाली. एका बाजूला एवढं सगळं होत असतांना हॅरीचं वैयक्तिक आयुष्य गर्तेत होते, बायकोला दुर्धर आजाराने घेरले, मुले दुरावली यामुळे तो मद्यपान आणि नैराश्य यात अडकत गेला. त्याच्यासोबत काम करणारी लोकं त्याला कटू-चिडचिडा-निरुत्साही-माणुसघाणा-गोंधळलेला-क्रूर अशी विशेषणं देऊ लागली.

प्रचंड 'निराश' अशा प्रकारच्या व्यक्तीगत अनुभवानंतर कदाचित त्यामुळेच मानसिक आधार-आपलेपणा-जिव्हाळा-प्रेम या गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत, या आपल्या मतांवर हॅरी अधिकच ठाम झाला. अर्थात 'प्रेम' या संकल्पनेच्या स्वरुपाबाबत-महत्वाबाबत जगभरात अंत:स्रावीशास्र-मज्जातंतूविज्ञान अशा अनेक विषयांच्या दृष्टिकोनातून निरिक्षणं-प्रयोग झालेत, होत आहेत आणि होत रहातील. मात्र हॅरीच्या प्रयोगांबद्दल अगदी तांत्रिक-तात्विक मतभेद असलेत तरी त्याच्या संशोधनामुळं मानसशास्राला अन् प्रेम या संकल्पनेच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली एवढं मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()