अनेक ऐतिहासिक मानवनिर्मित आश्चर्यांबाबत क्षणभरही विचार केला तरी डोळ्यांसमोर त्यांची विशिष्ट प्रतिमा उभी रहाते. ‘ताजमहाल’ म्हटलं की नुसती संगमरवरी सुंदर वास्तू नव्हे तर प्रेमाचं एक प्रतिक डोळ्यांसमोर तरळतं तसे इजिप्तचे पिरॅमिड्स महाकाय त्रिकोणी इमारतींपलिकडं अगणित गुढ अगम्य रहस्यांची जाणीव करून देतात. हेच अगदी आयफेल टाॅवरचंही..हा केवळ एक भलामोठा पोलादी सांगाडा न भासता फ्रेंच राज्यक्रांतीचं स्मरण आणि एकोणीसाव्या शतकातच्या उत्तरार्धतल्या त्यांच्या औद्योगिक प्रगतीचं प्रतिक म्हणून डोळ्यांसमोर उभा राहतो.पॅरिसची ओळख आणि जगभरातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला ‘आयफेल टाॅवर’ कुणाला माहित नाही? आज या टाॅवरची बांधकाम विषयक आणि वैज्ञानिक बाजू सांगतो.
‘गुस्ताव आयफेल’ या फ्रेंच स्थापत्य अभियंत्याच्या नावामुळं त्याला श्रेय मिळणं सहाजिक असलं तरी या टाॅवरच्या मुळ संकल्पनेमागं तो नव्हता. मुळ संकल्पना होती माॅरिस कोचलिन आणि एमिल नाॅगीर यांची. आयफेलच्या कंपनी अंतर्गत या जोडगोळीनं या टाॅवरच्या बांधकामासाठी विशेष परिश्रम घेतले.
१८८७ साली या दुकडीनं नियोजित जागतिक पॅरिस प्रदर्शनात आकर्षणाचं केंद्र आणि प्रदर्शनाचंप्रवेशद्वार असलेला आपल्या टाॅवरचा आराखडा सादर केला. प्रारंभी आयफेल व्यक्तीश: मुळात या आराखड्याविषयी प्रचंड साशंक होता. त्यानं यावर अधिक चिंतन आणि मंथन व्हावं असं सुचवत कोचलिन आणि नाॅगीर यांनी कंपनीचे मुख्य स्थापत्यरचनाकार ‘स्टिफन साॅवेस्त्रे’ यांच्याशी सल्लामसलत करावं असं सुचवलं.
स्टिफननं सजावटीच्या कमानी टाकत पहिल्या मजल्यावर काचेचा तंबू तयार करून या आराखड्याच्या सौंदर्यात भर टाकली आणि या प्रदर्शनात सर्वांचं लक्ष्य वेधून घेत सर्वोत्कृष्ट आराखडा म्हणून स्थान पटकवलं.
आता जी काही रचनाकृती दिसत होती ती बघून आयफेलचाही आत्मविश्वास वाढला अन् त्याच्या कंपनीनं मुख्य जागतिक प्रदर्शनात सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्यांच्या या पोलादी बांधकामाचा आराखडा इथंही विजेता ठरला.
अर्थात स्पर्धा आणि तिचे मापदंड यात यश मिळालं म्हणजे त्यांना लोकमान्यता मिळाली असं नव्हे किंबहुना पॅरिसकरांनी शहराच्या मधोमध उभा रहाणाऱ्या या लोखंडी सांगाड्याला प्रचंड विरोध केला. आंदोलनं झाली,याचिका दाखल केल्या गेल्या.
अनेकांच्या मते हे धुड त्यांच्या लाडक्या शहराच्या सौंदर्याला गालबोट लावणारं होतं.
सर्व विरोधाला न जुमानता दोन वर्षांनी या टाॅवरचं बांधकाम पुर्णत्वाला गेलं आणि ३१ मार्च १८८९ साली आयफेल टाॅवरचं औपचारिक उद्घाटन झालं.
तब्बल १८,००० तुकडे एकत्र करून १०,१०० टन वजनाचं आणि ६० टन रंग चढवलेलं ‘आयफेल टाॅवर’ नावाचं हे प्रचंड मोठं धुड शहराच्या मधोमध ऐटीत उभं राहिलं.
पुर्णत्वास गेलेला आयफेल टाॅवर हा आधुनिक स्थापत्यकलेचा प्रतिक ठरला.
वापरलेल्या धातूपासून बांधकाम कौशल्यापर्यंत आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेपासून त्याचा उपयोजित मुल्यापर्यंत अनेक गोष्टींनी संपुर्ण जगाचं लक्ष्य वेधून घेतलं..
जेव्हा हा टाॅवर बांधला गेला तेव्हा तो प्रायोगिक तत्वावर वीस वर्षे मुदतीपुरता राहिल असं ठरलं होतं. स्वत: आयफेल मात्र या टाॅवरच्या भविष्यातील शास्रोक्त वापराच्या शक्यतेमुळं त्याच्या दिर्घायुबद्दल आश्वस्त होता.
या टाॅवरचा आराखडा सादर करतांनाच त्यानं हा टाॅवर भविष्यात हवामाशास्त्रीय अभ्यासासाठी-खगोलशास्रीय निरिक्षणांसाठी-भौतिकी प्रयोगांसाठी ‘धोरणात्मक सोईस्कर बिंदू’ ठरेल असं भाकित वर्तवलं.
जागतिक प्रदर्शनात मिळालेल्या जबरदस्त यशामुळं या टाॅवरला विरोध करणाऱ्यांचा सुर कुठच्या कुठं विरून गेलाच पण त्याचं निव्वळ अस्तित्वही शहराची ओळख बनली.
आयफेलनं सांगितल्याप्रमाणं हा टाॅवर प्रयोगशाळा म्हणूनही वापरला जाऊ लागला.
हळूहळू यावर अनेक वैज्ञानिक उपकरणं बसवली गेली ज्यात वायुभारमापक-वायुगतीयंत्रमापक-विद्युतवाहक दंड अश्या अनेक उपकरणांचा समावेश होता.
या पलिकडं जाऊन दस्तुरखुद्द ‘गुस्ताव आयफेल’ टाॅवरच्या तिसऱ्या मजल्यावर खगोलशास्त्रीय आणि भौतिकीय निरिक्षण करत असे.
आयफेलला वायुगतिकिय अभ्यासाचं भयंकर वेड होतं आणि त्यानं इथं गुरुत्विय बलाचाही साकल्यानं अभ्यास केला.
त्यानं दुसऱ्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी केबलच्या मदतीनं स्वयंचलित व्यवस्था राबवण्याचा प्रयोग अन् प्रयत्न केला आणि यावर हजारो प्रयोग केले.
यासोबतच आयफेलनं या टाॅवरवर असंख्य प्रयोगांना प्रोत्साहन दिलं आणि एवढंच नाही तर टाॅवरच्या चारही खांबावर विज्ञानवादी मुल्यांचं प्रतिक आणि वैज्ञानिकांना श्रद्धांजली म्हणून एक दोन नाही विज्ञानाच्या विविध शाखेत काम करणाऱ्या तब्बल ७२ जणांची नावं कोरली.
आयफेलनं वायरलेस प्रसारणासाठी ॲंटेना बसवावा म्हणून टाॅवर खुला करून दिल्यामुळं इतिहासात पहिल्यांदाच कित्येक किलोमीटरचा परिसर प्रसारणाच्या कक्षेत आला.
या सगळया प्रपंचाचा तांत्रिक फायदा तर झालाच परंतू सैनिकी अभियांत्रिकीही नव्यानं विकसित झाली आणि त्याचा देशाच्या सुरक्षिततेसाठी प्रचंड फायदा झाला.
१९२१नंतर गाणी-मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित करण्यापासून प्रायोगिक तत्वावर अनेक कामं या टाॅवरमुळं शक्य झाली.
१९३५ उजाडलं तसं दुरचित्रवाणीवर दृकश्राव्य प्रसारणाही शक्य झालं आणि पुढं तर थेट उपग्रह वाहिन्याही आल्या.
प्रारंभी स्थानिकांनी झिडकारलेला आणि नंतर थेट पॅरिसचा मानबिंदू ठरलेला आयफेलचा हा टाॅवर आजही बारा महिने पर्यटक आणि अभ्यासकांसाठी खुला असतो.
गुस्ताव आयफेल यांच्या जन्मदिनी सहज !
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.