इस्रोचे चांद्रयान-३ हे उद्या, म्हणजेच १४ जुलै रोजी अंतराळात झेप घेणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा हा भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. यापूर्वी २०१९ साली चांद्रयान-२ च्या माध्यमातून असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला यश मिळालं नव्हतं.
इस्रोने या मोहिमेतून धडा घेत, यावर्षीच्या चंद्रमोहिमेत आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम लँडर हे सुरक्षितपणे चंद्रावर न उतरता, क्रॅश झालं होतं. यावेळी असं होऊ नये यासाठी काही उपाययोजना केल्या असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे.
मागच्या वेळी काय चुकलं?
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-२ वेळी झालेल्या काही चुकांची माहिती दिली. यामध्ये असणाऱ्या विक्रम लँडरचा वेग कमी करण्यासाठी पाच इंजिन बसवण्यात आले होते. मात्र या इंजिन्समुळे आवश्यकतेपेक्षा अधिक थ्रस्ट तयार केला. यामुळे विक्रम लँडर वेगाने वळाले, आणि नियोजित मार्गावरून दुसरीकडे गेले.
यानंतर दुसरी चूक ही झाली, की चंद्रावर लँडिंगसाठी अगदी कमी जागेची निवड करण्यात आली होती. चांद्रयान-२ साठी लँडिंग स्पॉट हा ५०० बाय ५०० मीटर एवढाच होता. हा लँडिंग स्पॉट शोधण्यासाठी विक्रमला आपला वेग वाढवावा लागला होता. या वाढलेल्या वेगामुळेच ते चंद्रावर क्रॅश होऊन तुटलं होतं.
काय केल्या सुधारणा?
इस्रोच्या प्रमुखांनी सांगितलं, की चांद्रयान-३ मोहिमेच्या वेळी सक्सेस-बेस्ड अप्रोच ऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईन तयार केलं आहे. यामध्ये चांद्रयान-२ वेळी झालेल्या चुका टाळण्यात येणार आहेत, तसेच आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
यावेळी लँडिंगसाठीचा स्पॉट हा ४.३ बाय २.५ किलोमीटर एवढा मोठा करण्यात आला आहे. तर, लँडरमधील इंधनाची क्षमताही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, लँडिंग स्पॉट शोधण्यासाठी वेळ लागला, तर पर्यायी लँडिंग स्पॉटपर्यंत लँडर नेता येईल. यामुळे लँडरला सुरक्षितपणे चंद्रावर उतरवणे शक्य होणार आहे.
भविष्यातील योजना
ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरेल. तसेच, जपानसोबत होणाऱ्या पुढच्या मून प्रोजेक्टसाठी हे एक मोठं पाऊल असणार आहे. जपानसोबतच्या या मोहिमेबद्दल चर्चा सुरू असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.