Indian Space Station Mission : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून इस्रोने मोठा विक्रम केला आहे. सोबतच, आदित्य एल-1 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यामुळे जगभरात सध्या इस्रोच्या वैज्ञानिकांची चर्चा सुरू आहे. यासोबतच इस्रोच्या पुढच्या मोहिमा काय असतील याबाबत सर्वांनाच कुतूहल निर्माण झालं आहे.
इस्रोचं संपूर्ण लक्ष सध्या आदित्य आणि गगनयान मोहिमांकडे आहे. आदित्य ही भारताची पहिली सौर मोहीम आहे. तर, गगनयान या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात मानव पाठवणार आहे. या मोहिमांनंतर इस्रो एक अतिशय मोठा प्रोजेक्ट हाती घेणार आहे.
इस्रो लवकरच अंतराळात भारताचं वेगळं स्पेस स्टेशन बनवण्याची मोहीम हाती घेणार आहे. सध्या अंतराळात एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, ज्याला 15 देशांनी मिळून बनवलं होतं. त्यानंतर चीनने स्वतःचं वेगळं स्पेस स्टेशन प्रस्थापित केलं. इस्रोची मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताचं स्पेस स्टेशन हे तिसरं असणार आहे.
स्पेस स्टेशन ही अंतराळात तयार करण्यात आलेली एक प्रयोगशाळा म्हणता येईल. याठिकाणी अंतराळवीर सहा-सहा महिने राहून विविध प्रकारचे संशोधन करतात. सध्या अवकाशात असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) एका वेळी कमीत कमी सात अंतराळवीर तरी असतातच. NASA, JAXA, ESA, CSA आणि ROSCOSMOS अशा विविध अंतराळ संस्थांनी मिळून ISS तयार केलं होतं.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे तब्बल 450 टन वजनाचं आहे, तर चीनचं स्पेस स्टेशन 80 टन वजनाचं आहे. इस्रो जे स्पेस स्टेशन बनवेल, ते सुमारे 20 टन वजनाचं असणार आहे. यामध्ये एका वेळी चार ते पाच अंतराळवीर राहू शकतील. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या LEO कक्षेमध्ये हे स्पेस स्टेशन प्रस्थापित केलं जाईल.
इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवान यांनी 2019 साली या स्पेस स्टेशनची घोषणा केली होती. गगनयान मोहीम झाल्यानंतर 2030 सालापर्यंत हे स्पेस स्टेशन उभारण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. गगनयान मोहिमेतून भारतीय अंतराळवीर LEO कक्षेतच जाणार आहेत. त्यामुळे स्पेस स्टेशनसाठीचा हा पहिला टप्पा म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.
भारताचं स्पेस स्टेशन तयार होण्यापूर्वीच अमेरिकेने यासाठी भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याचं कबूल केलं आहे. यासाठी NASA आणि ISRO या संस्थांमध्ये करार देखील झाला आहे. सर्व काही सुरळीतपणे पार पडल्यास, 2024 साली दोन भारतीय अंतराळवीर हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर देखील जाऊ शकतात.
चांद्रयान-3 मोहिमेच्या लाँचिंगपूर्वी पंतप्रधान मोदींनी अमेरिका दौरा केला होता. यावेळी भारताने आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली होती. यासोबतच नासा आणि इस्रोच्या करारानुसार, भारत चांद्रयान-3 चा डेटा अमेरिकेसोबत शेअर करणार आहे. तर, अमेरिका आपल्या अंतराळवीरांना प्रशिक्षण देणार आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.