कोल्हापूर : चार मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल आठशे वर्षानंतर २१ डिसेंबरला गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती अनुभवायला मिळणार आहे. आकाशामध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे रात्री नऊ वाजून १५ मिनिटांपर्यंत हा आविष्कार पाहता येणार आहे. या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो.
उत्तर गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि २१ किंवा २२ डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दोन्ही गोष्टींचा आनंद खगोलप्रेमींना घेता येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
सूर्यमालेतील पाचवा व सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि सहावा ग्रह शनी हे आपल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात.
गुरु ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीच्या ११ पूर्णांक ८६ वर्षे लागतात व स्वतः भोवती फिरण्यासाठी नऊ तास ५५ मिनिटे व २९ सेकंद एवढा वेळ लागतो. शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या २९ पूर्णांक ४६ वर्ष एवढा कालावधी तर स्वतः भोवती फिरण्यास दहा तास ३९ मिनिटे व २२ सेकंद एवढा वेळ लागतो.
हे दोन्ही ग्रह सूर्याभोवती फिरत असताना ते एका वेळेस अशा ठिकाणी येतात की पृथ्वीवरून पाहताना ते दोन ग्रहांऐवजी एक ग्रह अथवा दोन ग्रहांची जोडी असल्यासारखे वाटतात. १५ डिसेंबरपासून सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर दोन्ही ग्रह पश्चिमेकडे पहाता येतील. २१ डिसेंबरला दोन्ही ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ येतील. असा योग पंधरा मार्च २०८० पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेही प्रा. डॉ. कारंजकर यांनी सांगितले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.