रॉकेट तंत्रज्ञानाची म्हैसूरच जन्मभूमि! 1780-90 च्या दशकात ब्रिटिशांविरूद्धच्या युद्धात रॉकेटचा केला प्रभावी मारा

रॉकेटचा (Rocket) किंवा अग्निबाणाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागल्याचे ज्ञात आहे.
Rocket Technology
Rocket Technologyesakal
Updated on

रॉकेटचा (Rocket) किंवा अग्निबाणाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये लागल्याचे ज्ञात आहे. चीननंतर पहिल्यांदा भारतात रॉकेटचा वापर झाल्याचे ब्रिटिश मान्य करतात. या रॉकेटमधूनच पुढे अग्निबाण, मोर्टर, जेट इंजिन, क्षेपणास्त्र, मिसाईल, अवकाशात सोडण्यात येणारी विविध प्रकारची याने असा विकास झाल्याचे दिसून येते. भारतात पहिल्यांदा रॉकेटनिर्मितीचे श्रेय जाते म्हैसूरला. देशातीलच नव्हे, तर जगातील आधुनिक रॉकेट तयार करण्याचा मानही म्हैसूरलाच (Mysore) जातो.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हैदर अलीच्या राजवटीत म्हैसूर राज्यात विकसित करण्यात आलेले ते पहिले यशस्वी लोखंडी केस असलेले रॉकेट होते. हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या नेतृत्वाखाली म्हैसूरच्या सैन्याने १७८० आणि १७९० च्या दशकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध (British East India Company) युद्धात रॉकेटचा प्रभावीपणे वापर केला. ईस्ट इंडिया कंपनीसोबतच्या त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिशांना हे तंत्रज्ञान गवसले. त्याचा उपयोग करून नंतर त्यांनी १८०५ मध्ये ‘कॉन्ग्रेव्ह रॉकेट’चा विकास केला. त्यानंतर पहिल्या युरोपियन रॉकेटची निर्मिती केली.

म्हैसूर लष्करामध्ये (Mysore Army) नियमित रॉकेट चालविणारी एक तुकडीही होती, तिची सुरुवात हैदर अलीच्या काळात झाली. तुकडीत सुमारे १,२०० सैनिक होते. दुसरी अँग्लो-म्हैसूर लढाई ब्रिटिश कर्नल विल्यम बेलीच्या नेतृत्वाखाली झाली. त्यात टिपू सुलतान याच्याकडून यशस्वीरीत्या रॉकेटचा वापर झाला. १७८० मध्ये पोलिलूरच्या लढाईत एका भरकटलेल्या रॉकेटने बेलीच्या दारूगोळा भांडाराचा स्फोट झाला, असे मानले जाते. त्यामुळे लढाईत ब्रिटिशांचा पराभव झाला. रॉकेटने ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांच्या हालचालीवर मर्यादा आणल्या. रॉकेटमुळे म्हैसूरच्या घोडदळाला शक्ती मिळाली आणि या युद्धात ब्रिटिशांना पराभूत केले. मात्र, या लढाईत वापरलेली काही रॉकेट ब्रिटिशांनी ताब्यात घेतली. रॉकेट तंत्रज्ञानामध्ये त्यांनी रस घेतला. १९ व्या शतकात त्यांनी ते अधिक विकसित केले.

Rocket Technology
Sri M : 'परमऊर्जा समजण्यासाठी आंतरिक ऊर्जा चेतवावी'; पद्मभूषण श्री एम यांचे आवाहन

ब्लॅक पावडर प्रोपेलेंट वापर

टिपू सुलतानने या रॉकेटमध्ये लोखंडी नळ्या वापरल्या होत्या. लोखंडी नळ्यांमध्ये स्फोटक म्हणून ब्लॅक पावडर प्रोपेलेंट भरत. त्यामुळे जास्त शक्ती निर्माण होई. तसेच रॉकेट तब्बल दोन किलोमीटरचा (१.२ मैल) पल्ला गाठत. त्या दरम्यानच्या काळात असे रॉकेट युरोपमध्येही अस्तित्वात होते; परंतु त्यांना लोखंडी केस (नळी किंवा नलिका) नव्हती आणि त्यांचा दर्जा म्हैसूरच्या रॉकेटपेक्षा खूपच कमी होता. ते हॅमर केलेले मऊ लोखंडी रॉकेट क्रूड होते. तसेच या रॉकेटमध्ये कागदात स्फोटक पावडर बांधली जात होती. त्यामुळे जास्त अंतर्गत दबाव निर्माण होणे शक्य नव्हते. म्हैसूरकडे विविध आकारांची रॉकेट होती. सामान्यत: सुमारे आठ इंच (२० सेंमी) लांब आणि १.५ ते तीन इंच (३.८ ते ७.६ सेंटिमीटर) व्यासाच्या लोखंडाच्या नळ्या असत. त्या एका टोकाला बंद असत. हे रॉकेट बांबूला बांधलेले होते.

सुमारे चार फूट (एक मीटर) लांबी असे. लोखंडी नलिका ज्वलन कक्ष म्हणून काम करत असे. त्यात उच्च दर्जाचे पॅक केलेले ब्लॅक पावडर प्रोपेलेंट हे स्फोटक घालत. सुमारे एक पौंड (४५० ग्रॅम) पावडर वाहून नेणारे रॉकेट जवळजवळ १००० यार्ड (९१० मीटर) लांबपर्यंत जाऊन मारा करत असे. याउलट, युरोपमधील रॉकेट मोठा दाब घेऊ शकत नव्हते. लोखंडी केस नसल्यामुळे ते इतके अंतर गाठण्यास सक्षम नव्हते. १७९२ आणि १७९९ मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात या रॉकेटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.

टिपू सुलतानच्या आदेशानुसार त्याचा सेनापती मीर झैन-उल-अबिदिन शुश्तारी याने ‘फथुल मुजाहिद्दीन’ नावाची लष्करी तुकडी तयार केली. त्यामध्ये प्रत्येक तुकडीमध्ये (कुशून किंवा ब्रिगेड) २०० रॉकेटधारी सैनिक नियुक्त केले गेले. लोखंडी नळीचा (सिलिंडर) व्यास आणि लक्ष्यापर्यंतचे अंतर मोजलेल्या कोनातच रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय युद्धात चाकांवरील रॉकेट लाँचर्स वापरले गेले, जे जवळजवळ एकाच वेळी पाच ते दहा रॉकेट सोडण्यास सक्षम होते.

पाच हजार रॉकेटधारी सैनिक

१७९२ मध्ये तिसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान टिपू सुलतानने दोन रॉकेट युनिट्स मैदानात उतरवल्या होत्या. ६ फेब्रुवारी १७९२ च्या रात्री उत्तरेकडून कावेरी नदीच्या दिशेने पुढे जात असताना ब्रिटिश लेफ्टनंट कर्नल नॉक्स याच्यावर श्रीरंगपट्टणजवळ रॉकेटने हल्ला केला. नंतर टिपू सुलतानने सैन्यात सुमारे पाच हजार रॉकेटधारी सैनिक वाढविले होते. म्हैसूर रॉकेटचा उपयोग नागरी जीवनातील कार्यक्रमांसाठीही केला गेला. म्हैसूरच्या जेकोबिन क्लबने टिपू सुलतानकडे एक शिष्टमंडळ पाठवले होते. त्याचे स्वागत म्हणून ५०० रॉकेट सोडण्यात आली. सिटी मार्केटजवळील जुम्मा मशिदीजवळील संपूर्ण रस्ता आणि तारामंडलपेट (बंगळूर) हे टिपूच्या रॉकेटनिर्मिती प्रकल्पाचे केंद्र होते. तेथे त्याने प्रयोगशाळाही उभारली होती.

संकेत देण्यासाठीही वापर

चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यानही अनेक रॉकेटचा वापर करण्यात आला. ब्रिटिशांचे नेतृत्व कर्नल आर्थर वेलस्ली याने केले. तो नंतर फर्स्ट ड्यूक ऑफ वेलिंग्टन म्हणून प्रसिद्ध झाला. सुलतानपेठच्या लढाईत टिपूचा दिवाण पूर्णय्याकडून वेलस्लीचा जवळजवळ पराभव झाला होता; मात्र वेलस्लीने दुसऱ्या दिवशी मोठ्या ताकदीने नवीन हल्ला केला. मुख्य लढाईच्या १२ दिवस अगोदर म्हणजे २२ एप्रिल १७९९ रोजी म्हैसूरच्या रॉकेटधारींनी ब्रिटिश छावणीच्या मागील बाजूस हल्ला केला. त्याच क्षणी ६ हजार पायदळ आणि सैन्यदलाच्या ताफ्याने हल्ला सुरू झाल्याचे संकेत देण्यासाठी मोठ्या संख्येने रॉकेट डागले. मीर गोलाम हुसैन आणि मोहम्मद हुलेन मीर मिरन्स यांनी नेतृत्व केले. यावेळी फ्रेंच सैनिकही म्हैसूरकडून लढले.

दहा हजार रॉकेट सापडली

२ मे १७९९ रोजी श्रीरंगपट्टणवर झालेल्या निर्णायक ब्रिटिश हल्ल्याच्या वेळी टिपू सुलतानच्या किल्ल्यातील रॉकेटच्या मॅगझिनवर ब्रिटिशांनी गोळी झाडली, ज्यामुळे त्याचा स्फोट झाला आणि युद्धातून उठणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाच्या ‘कॅस्केड’सह काळ्या धुराचे प्रचंड ढग उठले. बेयर्डने ४ मे रोजी दुपारी किल्ल्यावरील अंतिम हल्ल्याचे नेतृत्व केले. त्याला पुन्हा ‘फ्युरियस मस्केट’ आणि ‘रॉकेट फायर’ यांची साथ मिळाली; परंतु याचा फारसा फायदा झाला नाही. मात्र, साधारण तासाभरात किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर टिपू धारातीर्थी पडला आणि युद्ध संपले. श्रीरंगपट्टणच्या पडझडीनंतर ६०० प्रक्षेपक, ७०० जिवंत रॉकेट आणि ९००० रिकामी रॉकेट सापडली. काही रॉकेटमध्ये सिलिंडरला छेद गेले होते, ज्यामुळे ते आग लावणाऱ्यांसारखे काम करू शकत होते. तर काहींमध्ये लोखंडी बिंदू किंवा स्टीलचे ब्लेड बांबूला बांधलेले आढळून आले. हे ब्लेड रॉकेटला जोडल्याने ते त्याच्या उड्डाणाच्या शेवटी खूप अस्थिर होत होते.

भविष्यात अतिशय प्रभावी ठरले

रॉकेट किंवा अग्निबाणाचा शोध प्राचीन चीनमध्ये लागल्याचे ज्ञात आहे; परंतु कालौघात ही कला लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय राजांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये विस्तारली. टिपू सुलतानला आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या अँग्लो-म्हैसूर युद्धात टिपूच्या सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटिश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्निबाण तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. परंतु, शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र तोफांपेक्षाही लांबवर संहार करत असल्याने भविष्यात ते अतिशय प्रभावी ठरेल, हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करून पुढील युद्धांमध्ये वापर केला.

Rocket Technology
Mohan Bhagwat : 'भोग-उपभोगामुळे पाश्चात राष्ट्रे विकृतीकडे चाललीयेत'; RSS सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान

शोध आणि विकास

२००२ मध्ये शिवमोग्गापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या नागारा येथील जुन्या विहिरीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी धातूच्या रॉकेटचा (कवच) साठा सापडला होता. यापैकी सुमारे शंभर गंजलेली दंडगोलाकार रॉकेट शिवप्पा नायक पॅलेस शासकीय संग्रहालयात ‘शेल’ म्हणून ठेवली. संग्रहालयाच्या कॅटलॉगमध्ये नोंदीशिवाय ती संग्रहित आहेत. २०१० मध्ये या कवचांचा टिपूच्या रॉकेटशी संबंध असल्याचे ओळखले गेले.

एप्रिल २०१७ मध्ये शिमोगा जिल्ह्यात वेगवेगळ्या आकारांची १०२ न वापरलेली रॉकेट सापडली. जुलै २०१८ मध्ये त्याच परिसरातील एका पडक्या विहिरीत आणखी ५०० रॉकेट आढळून आली. नोव्हेंबर २०१९ पर्यंत नागारामध्ये केलेल्या जीर्णोद्धारावेळी अशी ३ हजारहून अधिक रॉकेट मिळाली. ब्रिटिश रॉयल वूलविच आर्सेनलने १८०१ मध्ये म्हैसूरच्या रॉकेट तंत्रज्ञानावर आधारित लष्करी रॉकेट संशोधन आणि विकास कार्यक्रम सुरू केला. म्हैसूरमधून रॉकेटचे अनेक नमुने आणून विश्लेषणासाठी ते ब्रिटनला पाठवण्यात आले.

घन-इंधन रॉकेटचे त्यांचे पहिले प्रात्यक्षिक १८०५ मध्ये झाले आणि त्यानंतर १८०७ मध्ये शस्त्रागाराच्या कमांडंटचा मुलगा असलेला विल्यम कॉन्ग्रेव्ह याने रॉकेट तंत्रज्ञानाची उत्पत्ती आणि विकासाचे संक्षिप्त लेख प्रकाशित केले. नेपोलियन युद्ध आणि १८१२ च्या युद्धादरम्यान ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे ‘कॉन्ग्रेव्ह’ रॉकेटचा वापर केला होता. ते १८१४ च्या बाल्टिमोरच्या लढाईतदेखील वापरले गेले होते आणि त्यांचा उल्लेख ‘द स्टार-स्पॅन्ग्ल्ड बॅनर’मध्ये आहे. हे अमेरिकेचे (युनायटेड स्टेट्स) राष्ट्रगीत आहे.

रॉकेटनिर्मितीचे जनकत्व टिपू सुलतानकडे जाते. आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी टिपू सुलतानच्या आदेशान्वये सेनापती मीर झैन-उल-अबिदिन शुश्तारी याने ‘फथुल मुजाहिद्दीन’ नावाची लष्करी तुकडी बनविली होती. त्या प्रत्येक तुकडीमध्ये (कुशून किंवा ब्रिगेड) २०० रॉकेटधारी सैनिक नियुक्त करण्यात आले होते. लोखंडी नळीचा (सिलिंडर) व्यास आणि लक्ष्यापर्यंतचे अंतर मोजलेल्या कोनातच रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी सैनिकांना विशेष प्रशिक्षण दिले होते. याशिवाय युद्धात चाकांवरील रॉकेट लाँचर्स वापरण्याचेही तंत्र विकसित केले होते. त्या माध्यमातून एकाच वेळी पाच ते दहा रॉकेट सोडता येत असत.

sanjay.k.upadhye@esakal.com

(लेखक ‘सकाळ’ कोल्हापूरमध्ये उपसंपादक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com