पालकांनो, मुलं अभ्यास करत नाहीत? मग पुढील उपाय करा आणि मुलांना लावा अभ्यासाची गोडी 

know tricks about how to create interest of kids in studies
know tricks about how to create interest of kids in studies
Updated on

नागपूर ; "आम्ही तुमच्या वयाचे होतो त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो" हे वाक्य आपल्या लहान मुलांना म्हंटले नाही असे कोणतेच आई-वडील नसतील. आपल्या मुलांना पालक नेहमीच अभ्यास करण्याचे महत्व पटवून देत असतात. या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाची पद्धत आल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्षच उडाले आहे. मोबाईल, गेम्स, व्हिडीओ अशा गोष्टींमुळे मुलांना अभ्यासात गोडी राहिली नाहीये. अनेक पालक यामुळे त्रस्त आहेत. मात्र आता चिंता करू नका. तुमची मुलंही अभ्यास करत नसतील तर आम्ही आज तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. जाणून घ्या. 

अशी लावा मुलांना अभ्यासाची गोडी - 
 
मुलांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष द्या

सगळ्यांनाच सगळे विषय आवडतील असं नाही. काहींना गणितात गती असते तर काहींना इतिहासात. सगळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे, निदान दहावी होईपर्यंत तरी, हे जरी खरं असलं तरी तुमच्या मुलाचा असा कोणता आवडीचा विषय आहे, हे जाणून घेऊन त्याबद्दल त्याच्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्याला अधिक माहिती दिली, त्याला त्याबद्दल अजून वाचन करायला प्रोत्साहन केलं तर त्याला समजेल की अभ्यास हा काही फक्त शालेय पुस्तकाइतपतच मर्यादित नाही. त्यांच्या पण विचारांचा मान ठेऊन, त्यांची आवड जपून सिलॅबस मधला अभ्यास पण कसा गरजेचा आहे हे समजावून सांगून, त्यांच्या आवडी जपण्यासाठी तशी पुस्तकं घेऊन देण्याचं काम आपण करून करू शकतो.

मुलांना वाचनाची गोडी लावा

ज्या मुलांना वाचायला आवडतं त्यांना अभ्यासाची सुद्धा आपोआप गोडी लागते. वाचनाचे पुष्कळ फायदे असतात, वाचनामुळे मुलांचा शब्दसंच वाढतो, भाषा विकसित होते, संवाद कौशल्य वाढतं, एका जागी बसून लक्ष केंद्रित करून घ्यायची सवय आणि याचमुळे त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाला गती मिळते. वाचनामुळेच मुलांना विचार करायची सवय लागते आणि त्यांच्या विचारांना दिशा सुद्धा मिळते. अगदी लहानपणापासून मुलांना गोष्टी वाचून, पुस्तकातली चित्र दाखवली तर त्यांना सुरुवातीपासूनच वाचनाची गोडी लागते.

थोड्या मोठ्या मुलांबरोबर आपण स्वतः वाचत बसलो, त्यांना दिवसातला एक ठराविक वेळ वाचनासाठी आखून दिला आणि त्या वेळात आपण ही त्यांच्याबरोबर बसून वाचलं तर त्यांना वाचनाचं महत्व पटतं आणि सवय सुद्धा लागते. मुलांना त्यांच्या वयाला साजेशी गोष्टीची पुस्तकं भेट म्हणून देणं हा सुद्धा त्यांच्या मनात वाचनाबद्दल ओढ निर्माण करायचा एक प्रभावी उपाय आहे.

मुलांचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने घ्या

साधारण सहावी, सातवी पर्यंत मुलांचा अभ्यास घ्यायला लागतो. अभ्यास घेताना जर पालक मुलांसमोर बसले आणि त्यांना उत्तरं लिहून काढायला लावली किंवा धडे मोठमोठ्याने वाचायला लावले तर, मुलं अभ्यास करायला कंटाळा करू शकतात. म्हणूनच मुलांसाठी अभ्यास करायच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या पाहिजेत. स्पेलिंग पाठ व्हायला त्यांना रोज दिसतील असे आकर्षक तक्ते त्यांच्याकडूनच करून घेऊन त्यांच्या खोलीत लावता येतील किंवा त्यांच्या आवाजात पाढे रेकॉर्ड करून रोज त्यांना ऐकवता येतील.

कधी त्यांच्या मित्रमैत्रिणींना जमवून एकत्र अभ्यास करायची सवय लावता येईल. प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याप्रमाणेच त्यांची अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते. या पद्धतीतली तुमच्या मुलाला सगळ्यात सूट होणारी कोणती पद्धत आहे आणि या शिवाय ही तुम्ही इतर कोणत्या पद्धती वापरून मुलांना अभ्यासात गुंतवू शकता याचा विचार करून त्या गोष्टी करून बघता येतील.

मुलांना तुमच्या शिक्षणाच्या अनुभवांबद्दल सांगा 

मुलांना संभाषण आवडतं. त्यांना त्यांचं मत विचारलं तर त्यांना महत्व देतोय असं वाटून जबाबदारीची जाणीव येते. म्हणूनच तुमचे लहानपणीचे अनुभव त्यांना सांगा, त्यांच्या अनुभवांबद्दल विचारून संवाद साधा. याशिवाय ही त्यांच्या एखाद्या धड्यात रस दाखवून त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारून त्यांना बोलतं करा किंवा ते सोडवत असलेल्या एखाद्या गणिताबद्दल कुतूहल व्यक्त करून, त्याबद्दल प्रश्न विचारा म्हणजे त्यांना सुद्धा अभ्यास करायला हुरूप येईल.

मुलांच्या गेम खेळायच्या वेळेवर निर्बंध आणा

सतत टीव्ही बघून किंवा गेम खेळून मुलांना सुस्ती येते. खूप वेळ गेम खेळले तर त्यांना नंतर लक्ष एकाग्र करायला अवघड जातं आणि या गोष्टींची सवय लागली की सारख्या त्याच कराव्याशा वाटतात आणि वाचन, अभ्यास याची गोडी अजिबात लागत नाही आणि टीव्ही, गेम आजिबात नको म्हणलं तरी ते बरोबर नाही. कारण अशा एखाद्या गोष्टीला विरोध केला तर मुलं ती गोष्ट चोरून करायला बघतात आणि खोटं बोलायला शिकतात. या टिप्स लक्षात घेऊन, आपल्या मुलांच्या स्वभावानुसार, आवडीनुसार त्या अमलात आणल्या तर त्यांना अभ्यासाची गोडी लावणे सहज शक्य होऊ शकेल.

मुलांचं छोट्याशा गोष्टींसाठी सुद्धा कौतुक करा

मुलांना आईबाबांकडून सतत कौतुकाची अपेक्षा असते. लहान मुलं तर बऱ्याचदा काही गोष्टी केवळ आईबाबांनी ‘शाब्बास’ म्हणावं म्हणून करत असतात. आईबाबांनी कौतुक केलं की मुलांना नवा हुरूप येतो म्हणूनच मुलांची कितीही लहान गोष्ट असुदे त्याचं कौतुक करा! तुम्हाला त्यांचं कौतुक वाटतं हे त्यांना कळू द्या म्हणजे ते अजून जास्त कष्ट घ्यायला सज्ज होतील.

अगदी तुमच्या मुलाला एखाद्या विषयात रस नसेल आणि जेमतेम का होईना पण मार्क पाडून तो पास झाला असेल तरी त्याचं कौतुक करून बघा, पुढच्या वेळेला या नावडीच्या विषयात जास्त मेहनत तो घेताना तुम्हाला दिसतो की नाही.

मुलांना व्यवस्थितपणा शिकवा

मुलांना आवरावरीची सवय लावा. पसरलेलं अभ्यासाचं टेबल, न आवरली पुस्तकांची कपाटं बघितली की अभ्यास करायचा सगळा मूड कुठल्या कुठे पळून जातो. हेच जर पुस्तक छान मांडून ठेवली, कपाटात वस्तू नीट रचून ठेवल्या, त्यांच्या आवडीचं एखाद खेळणं अभ्यासाच्या टेबलवर ठेवलं, तर अभ्यास करताना फ्रेश वाटेल आणि नेहमी पेक्षा जास्त अभ्यास होईल. याचप्रकारे मुलांना वहीत व्यवस्थित लिहायची सुद्धा सवय लावली पाहिजे. छान सुवाच्च अक्षरातलं खाडाखोड नसलेलं किंवा कमी खाडाखोड असलेलं लिखाण बघितलं की बरं वाटतं. त्यांच्या व्यवस्थितपणाचं वेळोवेळी कौतुक करा, अक्षर नीट काढलं, एकसारखं लिहिलं तर त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांच्या आवडीचं पेन, पेन्सिल आणून द्या, घरच्या अभ्यासाला त्यांच्या आवडत्या कार्टूनच्या वह्या ठेवा.


संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.