Lambretta Scooter : परदेशी बनावटीतली 'इनोसेण्टी' स्कूटरने बाइकचं जग एकेकाळी चांगलंच गाजवलं. या इटालियन साच्यातल्या बाइकचं दालन भारतीयांना उपलब्ध झालं ते 'लॅम्ब्रेट्टा'च्या रूपाने.
सामान्य स्कूटरपेक्षा थोड्या लांबट, दणकट, उंच अशी हिची ठेवण बघताक्षणीच लक्ष वेधते. 150 सीसीची ही लॅम्ब्रेट्टा वजनालाही तशी जडच. पण, तसं असूनही इतर व्हिण्टेज गाड्यांपेक्षा तिचा परफॉर्मन्स उत्तम.तसं बघायला गेलं तर लॅम्ब्रेटाचा इतिहास दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत मागे नेतो. मात्र, युद्ध संपल्यानंतर एका इटालियन कंपनीने लॅम्ब्रेटा स्कूटर बनवण्यास सुरुवात केली.
इटलीतील सर्वात प्रभावशाली उद्योगपतींमध्ये फर्डिनांडो इनोसेण्टी यांचं मोठं नाव होतं. 1931 मध्ये त्यांनी मिलान शहरात 'इनोसेण्टी' नावाची कंपनी स्थापन करून एक मोठा कारखाना उघडला. या कंपनीत पाईप व इतर मशिन बनवण्यात आल्या. पण दुसऱ्या महायुद्धादरम्यान, इनोसेण्टीने युद्धात वापरल्या जाणार्या दारूगोळ्यासारख्या वस्तूही बनवल्या.
दुसऱ्या महायुध्दात इनोसेण्टी यांचा मिलानमधील कारखाना उद्ध्वस्त झाला. मात्र, इनोसेण्टीने तो पुन्हा सुरू केला. अमेरिकन सैनिकांची गाड्या पाहून कंपनीच्या मालकाने स्वस्त स्कूटर बनवण्याचा विचार केला. मग काय होतं 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षात लॅम्ब्रेटा स्कूटर पहिल्यांदाच जगाच्या नजरेसमोर आली. इटलीतील मिलानमधील लॅम्ब्रेट परिसरातून वाहणाऱ्या लॅम्बो नदीच्या नावावरून हे नाव देण्यात आलं होतं.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातही खासगी वाहनांकडे लोकांचा कल वाढू लागला. परंतु, सर्वसाधारण लोकांकडे लहान कार खरेदी करण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते. हा विचार करूनच ‘लॅम्ब्रेटा स्कूटर’ भारतात आली. मुंबई- आधारित एपीआय (ऑटो प्रॉडक्ट्स इंडिया) यांनी येथे लॅम्ब्रेटाचे प्रोडक्शन सुरू केले.
मध्यमवर्गात स्कूटर ठरली सुपरहिट
काही दिवसात लॅम्ब्रेटा स्कूटर भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबात सुपरहिट ठरली. परंतु 70 च्या दशकात जेव्हा इटलीमधील घरगुती कामगारांनी आर्थिक अडचणींमुळे आंदोलन सुरू केले. यानंतर 1971 मध्ये उत्तरप्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ‘स्कूटर इंडिया’ लखनौमध्ये पुनर्वसित करण्याची शिफारस केली.
भारतामध्ये आगमन
त्याच्या एका वर्षानंतर, 1972 मध्ये भारताने इटलीमधून या कंपनीचा उद्योग व यंत्रसामग्री, कागदपत्रे आणि ट्रेडमार्क खरेदी केले. यातून ‘स्कूटर इंडिया लिमिटेड’ या भारतीय ब्रँडचा उदय झाला.
8 एप्रिल 1973 रोजी, लखनौ शहरापासून सुमारे 16 किमी अंतरावर कानपूर रोडजवळ, 147.49 एकरांवर ‘स्कूटर इंडिया’ची पायाभरणी झाली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यावेळी भूमिपूजन केले. या ठिकाणी तीन चाकी ट्रक ‘विक्रम लॅम्ब्रो’ बनवण्याचा हेतू होता, परंतु ‘लॅम्ब्रेटा स्कूटर’ने उत्पादनाची सुरुवात झाली. वर्षाभरानंतरच युनिटने काम सुरू केले. त्यानंतर लवकरच ‘विजय डिलक्स अँड एक्स्पोर्ट’साठी ‘लॅम्ब्रेटा’ या नावाने कमर्शिअल उत्पादन सुरू झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.