पुणे: दिवाळी जवळ येत असून सध्या सर्वांची दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु झाली आहे. लॉकडाऊन असून देखील घराघरात खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. सणाच्या काळात नेहमी वाहन खरेदी मध्ये लक्षणीय वाढ होते. सणासुदीचे दिवस शुभ मानले जातात आणि म्हणूनच नवनवीन गोष्टींची खरेदी या काळात केली जाते. भारत सरकारने नुकतेच नवीन वाहनांसाठी प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने नवीन नियम लागू केले आहेत. BS-६ नॉर्म्स बंधनकारक करण्यात आले असून सरकार इलेक्ट्रिक गाड्यांवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. इलेक्ट्रिक गाड्या जास्तीजास्त वापरण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले असून त्याने प्रदूषणात मोठी घट होईल असेही म्हटले जात आहे त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने देखील सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडते आहे. आता सर्व वाहननिर्माते इलेक्ट्रिक गाड्यांकडे लक्ष केंद्रित करीत आहेत. दुचाकी वाहनांमध्ये बजाज, एथर, टीव्हीएस या सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील उत्तम इलेक्ट्रिक दुचाकींचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. मग या सणासुदीला इलेक्ट्रिक टू - व्हीलर घ्यायचा विचार करत आहात.? मग खालील पर्याय आहेत तुमच्यासाठी उत्तम.
१) एथर ४५०x
बंगलोर मधील स्टार्ट-अप कंपनी एथर ने एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांसाठी आणली आहे. ही एक स्पोर्टी परफॉर्मन्स देणारी इलेक्ट्रिक स्कूटर असून याआधी लाँच करण्यात आलेली एथर ४५० ही देखील अतिशय लोकप्रिय झाली होती आणि त्याला ग्राहकांकडून भरगोस प्रतिसाद मिळाला. एथर ४५०x हे याच स्कूटरचा स्पोर्टी अवतार आहे. २.९ kWh क्षमतेची बॅटरी यात असून एका संपूर्ण चार्ज मध्ये हि स्कूटर ६०-८५ किमी एवढे अंतर पार करू शकते. बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यास ५ तासांचा कालावधी लागतो. फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील उपलब्ध असून त्याने १ तासात बॅटरी ८० टक्के चार्ज होते. या स्कुटरचा टॉप स्पीड ८० किमी प्रतितास एवढा आहे.
किंमत :
एथर ४५०x - रुपये १.४९ लाख पासून
२) रिव्हॉल्ट ४०० आणि रिव्हॉल्ट ३००
मायक्रोमॅक्स हे नाव तर सर्वांना माहीतच असेल पण याचा इथे काय संबंध असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. मायक्रोमॅक्स या कंपनीने देखील इलेक्ट्रिक गाडी बनवण्याच्या शर्यतीत उडी घेतली असून दोन उत्पादने बाजारात आणली आहेत. रिव्हॉल्ट नावाने एक नवीन ब्रँड त्यांनी स्थापन केला असून त्याअंतर्गत दोन मॉडेल त्यांनी लाँच केले आहेत. रिव्हॉल्ट ४०० आणि रिव्हॉल्ट ३०० अशी या इलेक्ट्रिक बाइक्सची नावे आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये बॅटरी क्षमता आणि काही फीचर्स इतकाच फरक आहे. रिव्हॉल्ट ४०० मध्ये ३.२४ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ८० - १५० किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करते. बॅटरी १००% चार्ज होण्यास ४.५ तास इतका वेळ लागतो. ८५ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येतो.
रिव्हॉल्ट ३०० मध्ये २.७ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ८० - १८० किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करते. बॅटरी १००% चार्ज होण्यास ४.२ तास इतका वेळ लागतो. ६५ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येतो.
किंमत :
रिव्हॉल्ट ४०० - रुपये १.३० लाख पासून
रिव्हॉल्ट ३०० - रुपये १.११ लाख पासून
३) बजाज चेतक
बजाज हे दुचाकी वाहनांचा एक मोठा ब्रँड असून त्यांनी देखील एक जबरदस्त पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे . त्यांनी चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली असून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. एक उत्तम दिसणारी स्कूटर आणि त्याच बरोबर उत्तम परफॉर्मन्स अशी या गाडीची वैशिष्ठ्ये आहेत. बजाज चेतक मध्ये ३ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ८५ - ९५ किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करता येईल. बॅटरी १००% चार्ज होण्यास ५ तास इतका वेळ लागतो. ७८ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येईल. यामध्ये अर्बेन आणि प्रीमियम असे दोन व्हेरिअंट उपलब्ध असून दोन्हीच्या किमतीत फक्त ५००० रुपयांचा फरक आहे
किंमत :
बजाज चेतक - रुपये १.२० लाख पासून
४) टीव्हीएस I-Cube
टीव्हीएस हे दुचाकी वाहन निर्मात्यांमध्ये आणखी एक मोठे नाव असून त्यांनीदेखील इलेक्ट्रिक दुचाकी बनविण्यात उडी घेतली आहे. त्यांनी नुकतीच I-Cube ही गाडी बाजारात आणली आहे. टीव्हीएस I-Cube मध्ये ४.५ kWh क्षमतेची बॅटरी यात देण्यात आली असून ७५ किमी इतके अंतर एका संपूर्ण चार्ज मध्ये पार करता येईल. बॅटरी १००% चार्ज होण्यास ५ तास इतका वेळ लागतो. ७८ किमी इतका टॉप स्पीड या बाईक मध्ये गाठता येईल. बजाज चेतक ही टीव्हीएस I-Cube ची प्रतिस्पर्धी मानली जाते.
किंमत :
टीव्हीएस I-Cube - रुपये १.१५ लाख पासून
५) ओकिनावा आय - प्रेज
ओकिनावा हे इलेक्ट्रिक दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांमधील एक मोठे नाव आहे. त्यांनी अनेक पर्याय ग्राहकांसाठी बाजारात आणले आहेत. आय - प्रेज ही त्यांची नवीन गाडी असून त्यामध्ये ३.३ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. १०० टक्के चार्ज होण्यास या बॅटरीला ४ तास लागतात तसेच संपूर्ण चार्जमध्ये १६० किमी पर्यंत अंतर पार करता येते. ५८ किमी प्रति तासाचा टॉप स्पीड ही गाडी गाठता येईल. ऍपद्वारे कनेक्टटेड फीचर्स देखील या गाडीमध्ये मिळतात. या गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
किंमत :
ओकिनावा आय - प्रेज - रुपये १.२३ लाख पासून
इलेक्ट्रिक दुचाकी या दैनंदिन जीवनासाठी अतिशय उपयुक्त असून प्रति किलोमीटरचा खर्च अतिशय कमी असल्याने खिश्यावर देखील अधिक भार पडणार नाही. विशेष म्हणजे या सर्व दुचाकी घरातील इलेक्ट्रिक कनेक्शनवर देखील चार्ज करता येतात आणि सरकारकडून देखील अनेक ठिकाणी चार्जींग स्टेशन उभे करत आहेत. इलेक्ट्रिक तंत्रज्ञानात सध्या जोरदार प्रगती सुरु असून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांमध्ये देखील नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर भरगोस फीचर्स देखील मिळत असून नक्कीच येत्या काळात सर्व वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणार यात काही शंका नाही. मग हा सण प्रदूषणमुक्त करून एक उत्तम दुचाकी घ्यायची असेल तर हे पर्याय नक्कीच तुम्हाला फायद्याचे आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.