कृत्रिम बुद्धिमत्ता... पण कोठपर्यंत? 

artificial intelligence
artificial intelligence
Updated on

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी आयुष्य बदलून टाकले आहे. सॉफ्टवेअरवर आधारित ही व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी अनेक कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी नीतिमूल्यांवर परिणाम व बेरोजगारीसारखे प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (एआय) सध्या मोठी चर्चा आहे. यंत्रमानवांच्या निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेची परिमाणे आता बदलत चालली असून, मानवाच्या आयुष्यातील बहुतांश अंगांना तिने स्पर्श केला आहे. मी हॉटेलमध्ये काय खावे, ऑनलाइन कोणती पुस्तके खरेदी करावीत, बॅंकेचे कर्ज नक्की किती मिळेल, विशिष्ट आजारासाठी कोणती उपचारपद्धती वापरावी अशा सर्वच सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. यामध्ये मानवी आयुष्य सुखकर करण्याची क्षमता असल्याचे गेल्या काही वर्षांत सिद्ध झाले आहे. या गोष्टींची यादी वाढतच जाणार असून, त्यासाठी गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअर्सचा वापरही वाढणार आहे. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित "स्टार्ट अप' कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही होते आहे. त्याच्या जोडीला "अमेझॉन', "फेसबुक', "मायक्रोसॉफ्ट'सारख्या बड्या कंपन्यांनी या विषयातील संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे इंटरनेटमुळे झालेल्या क्रांतीपेक्षाही मोठी क्रांती होईल, असा अंदाज बांधला जात आहे. 
हे सर्व घडत असताना मानवी मूल्यांचे व त्यातून निर्माण होणाऱ्या बेरोजगारीसारख्या समस्यांवर कशी मात करणार, हा प्रश्‍न या क्षेत्रातील तज्ज्ञांना पडला आहे. गुगलच्या संशोधन विभागाचे संचालक पीटर नोर्विग यांनी या तंत्रज्ञानावर नियंत्रण असणारे समाजघटकच आपल्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग करून घेणार नाहीत ना, अशी भीती व्यक्त केली आहे. ""कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग भाषा, चित्र समजावून घेण्यापासून आजार ओळखण्यापर्यंतच्या कामांसाठी होत आहे. मात्र, हा उपयोग सर्व समाजातील घटकांना होण्यासाठी प्रयत्न करणे मोठे आव्हान आहे. गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअरमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे एखादे काम तसेच का केले गेले, याचे उत्तर मिळत नाही. ही व्यवस्था कशी काम करते, हे आत डोकावून पाहता येत नाही. आपण त्यावर केवळ विश्‍वास ठेवू शकतो. भविष्यात त्यावर अधिक लक्ष ठेवणे व हिशेब ठेवणे गरजेचे आहे,'' असे नोविंग यांनी स्पष्ट केले. हार्वर्ड लॉ स्कूलचे प्रोफेसर जोनाथन झिट्रेन म्हणतात, ""कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या गुंतागुंतीमुळे ते असुरक्षित असतात. त्यातून नीतिमूल्यांशी संबंधित काही प्रश्‍नही निर्माण होतील. ही व्यवस्था तपासण्यासाठी इंडस्ट्रीला अपेक्षित मापदंडांचा उपयोग होत नसल्याने त्यांच्या समाजातील सर्व स्तरांसाठीच्या वापरावरही मर्यादा आहेत.'' याचा पुढचा टप्पा म्हणजे "विचार करणारे' यंत्रमानव विविध कंपन्यांमध्ये वापरले जातील आणि त्यातून बेरोजगारीची समस्या निर्माण होईल, असेही संशोधक सांगतात. ऍपल आणि सॅमसंग या कंपन्यांनी 60 हजार कर्मचाऱ्यांच्या जागी यंत्रमानव घेण्याची केलेली घोषणा हे याचेच उदाहरण आहे. 
एकंदरीतच, जगभरातील तज्ज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाला मदत करणे, निर्णयक्षमतेचा वापर वाढणे एवढ्यापुरताच मर्यादित ठेवण्यावर जोर देत असून, त्याने मानवाला पर्याय ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. आपणही अशी अपेक्षा करायला हरकत नाही... 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.