महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईनच्या मेंदूची मृत्यूनंतर झाली होती तपासणी, खरंच काही मिळालं का?

no different things found in albert einstein brain nagpur news
no different things found in albert einstein brain nagpur news
Updated on

नागपूर : अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव कोणालाही नव्याने सांगायची गरज नाही. जवळपास प्रत्येक माणसाने हे ऐकलं असेल. आइन्स्टाईन यांनी विज्ञान क्षेत्रात दिलेलं योगदान  अमूल्य आहे. आइन्स्टाईनचा जन्म जर्मनीतील उल्म शहरात राहणाऱ्या एका ज्यू कुटुंबात 14 मार्च 1879 रोजी झाला. उल्म, जे आज जर्मनीची बाडेन-व्यूर्टेमबेर्ग राज्यात आहे. त्यावेळी व्यूर्टेमबेर्ग हे जर्मन साम्राज्याच्या राजशाहीचे शहर होते. पण अल्बर्ट आइनस्टाईन यांचे बालपण उलमऐवजी बवेरियाची राजधानी म्युनिक येथे गेले. त्यांच्या जन्मानंतर केवळ एक वर्षानंतर हे कुटुंब म्यूनिख येथे स्थायिक झाले. 

अल्बर्ट आईन्स्टाईन हे 'होनहार बिरवान के होत चीकने पात' या म्हणीनुसार आपलं आयुष्य जगत होते. भाषा वगळता प्रत्येक विषयात ते लहानपणापासूनच खूप हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. खासकरून विज्ञान विषयात लहानपणातच अल्बर्ट आइनस्टाईन विज्ञानाची पुस्तके वाचून एक ज्ञानी विद्यार्थी बनले होते. जर्मनीशिवाय ते शेजारी असेलेल्या स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या देशांचे नागरिकही बनले. 1914 ते 1932 या काळात बर्लिनमध्ये वास्तव्य करत असताना हिटलरकडून यहुद्यांचा द्वेष झाल्याचे समजल्यानंतर आइनस्टाईन यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे 18 एप्रिल 1955 रोजी त्यांनी प्रिन्सटन येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

1905 सुवर्ण वर्ष -
अल्बर्ट आइनस्टाइन हे केवळ 20 व्या शतकातील नव्हे तर सर्व इतिहासातील सर्वकालीन महान वैज्ञानिकांपैकी एक मानले जातात. 1905 हे त्याच्या एकत्रित कामगिरीचे सुवर्ण वर्ष होते. यावर्षी, त्यांचे प्रसिद्ध सूत्र (फॉर्म्युला) E = mc² शोध लागला होता. 'सैद्धांतिक भौतिकशास्त्र, विशेषतः प्रकाशाच्या विद्युतीय (इलेक्ट्रिकल) प्रभावासंबधीच्या  शोधासाठी त्यांना 1921 चे नोबेल पुरस्कार मिळाले.१७ मार्च १९०५ रोजी लावण्यात आलेल्या शोधाची नोंदणी त्यांनी 1905 मध्ये मध्ये स्वित्झर्लंडची राजधानी बर्नच्या पेटंट ऑफिसमध्ये केली होती. त्याच वर्षी 30 जून रोजी आइन्स्टाईन यांनी 'फिरत्या वस्तूंच्या विद्युतीय गतिशीलता' विषयी एक शोधनिबंध देखील प्रकाशित केला. या वर्षातच 20 जुलै रोजी त्यांनी ज्यूरिच विद्यापीठामध्ये डॉक्टरेट मिळविण्यासाठी एक शोधनिबंध प्रकाशित केला होता. त्यावेळी ते 26 वर्षांचे होते. 15 जानेवारी 1906 रोजी त्यांना डॉक्टरेट पदवी देखील मिळाली.

सापेक्षतेचा सिद्धांत -  
अल्बर्ट आइनस्टाईन यांना  नाव अमरत्व प्रदान करणारी गोष्ट म्हणजे त्यांचा सापेक्षता सिद्धांत. त्यांनी गतीच्या स्वरूपाचा अभ्यास केला आणि सांगितले की गती एक सापेक्ष अवस्था आहे. आइन्स्टाईनच्या म्हणण्यानुसार, विश्वामध्ये असे कोणतेही स्थिर पुरावे नाहीत, ज्याद्वारे मनुष्य 'परिपूर्ण वेग' किंवा पृथ्वीच्या कोणत्याही प्रणालीचा निर्णय घेऊ शकेल. बदलाच्या प्रमाणावर आधारित दुसर्‍या ऑब्जेक्टचा संदर्भ देऊन गतीचा अंदाज नेहमीच घेतला जाऊ शकतो. 1907 मध्ये प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या सिद्धांताला 'सापेक्षतेचा विशिष्ट सिद्धांत' म्हटले गेले.

आईन्स्टाईन म्हणाले की, सापेक्षतेचा हा विशिष्ट सिद्धांत प्रकाशित केल्यानंतर एक दिवस त्यांच्या मनात एक नवीन प्रश्न पडला. त्याच्या शब्दांत, 'मी बेर्न पेटंट ऑफिसमध्ये एका आराम खुर्चीवर बसलो होतो. तेव्हाच माझ्या मनात एक विचार आला, जर एखादी व्यक्ती कोणतीही अडचण न येता वरून खाली पडत असेल तर तो स्वत:ला वजनदार समजेल. मला या साध्या विचारानं गुंतवणून टाकलं. तेव्हापासून गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताकडे जाण्यास माझी सुरुवात झाली.', असे त्यांनी सांगितले.  

हिटलरची हुकूमशाही -
1932 मध्ये आईन्स्टाईन अमेरिकेत गेल्यानंतर जर्मनीवर हिटलरची हुकूमशाही 1933 मध्ये सुरू झाली. 10 मे 1933 रोजी हिटलरचे  प्रचार मंत्री  गोबेल्स यांनी सर्व प्रकारच्या ज्यू साहित्य सार्वजनिकरित्या जाळून टाकण्यासाठी एक मोहीम सुरू केली. या मोहिमेमध्ये आईन्स्टाईन यांची पुस्तकेही जाळली. 'जर्मन राष्ट्राच्या शत्रूंची' यादी तयार केली गेली, ज्यात आईन्स्टाईनला ठार मारणाऱ्यास पाच हजार डॉलर्स देण्याचे जाहीर करण्यात आले.

तोपर्यंत आइनस्टाईन अमेरिकेच्या प्रिन्सटन शहरात स्थायिक झाले होते. तिथे त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताचे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या नियमांशी जुळणारे, 'एकत्रित क्षेत्र सिद्धांत' (युनिफाइड फील्ड थिअरी) तयार करण्यात गुंतले. यासाठी, त्यांना 'ब्रह्मसूत्र' यासारख्या गणिताचे समीकरण गाठायचे होते, जे दोन सूत्रांना एकाच सूत्रात एकत्रित करून विश्वाच्या सर्व शक्तींचा अर्थ सांगू शकेल. त्यांनी मृत्यूपर्यंत यावर काम चालू ठेवले. परंतु, आजपर्यंत तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही किंवा इतर कोणत्याही वैज्ञानिकांना हे काम करता आलेले नाही.

'ब्रह्मसूत्र' शोध -
अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 1930 मध्ये बर्लिनमध्ये 'समग्र क्षेत्र सिद्धात'  हे ब्रह्मसूत्र 'शोधण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी त्यांनी त्याबद्दल आठ पानांचा लेखही लिहिला होता, जो त्यांनी कधीही प्रकाशित केला नाही. आतापर्यंत या लेखाची सात पाने सापडली होती, एक पान सापडले नाही. हे हरवलेले पान त्यांच्या 140 व्या जयंतीच्या काही दिवस आधी सापडले.

इस्राईलमधील जेरुसलेमच्या हिब्रू  विद्यापीठाने 13 मार्च रोजी  आइनस्टाइनशी संबंधित कागदपत्रांचा संग्रह विकत घेतल्याची बातमी आपण वाचली असेल. या संग्रहात सापडलेल्या 'समग्र क्षेत्र सिद्धांत' या त्यांच्या लेखाचे गहाळ पान दोनच आठवड्यांपूर्वी त्यांना प्राप्त झाले आहे. आपल्या लेखात, आइन्स्टाईन यांनी बर्‍याच हस्तलिखित समीकरण आणि आकृत्या वापरल्या आहेत. हा कागदपत्रांचा संग्रह जवळपास 110 पानांचा आहे. यामध्ये 1935 मध्ये त्याचा मुलगा हंस अल्बर्टला त्यांनी एक पत्रही लिहले आहे. या पत्राद्वारे त्यांनी जर्मनीमध्ये हिटलरच्या नाझी पार्टीच्या राजवटीबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. दुसरे पत्र देखील आहे, जे आइन्स्टाईन यांनी स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या  एका इटालियन अभियंता-मित्राला लिहिले होते.

मुलाला पत्र -
आईन्स्टाईनची पहिली पत्नी मिलेवा मारिच सर्बियातील होती. दोघांचीही बेर्न येथे त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एकमेकांशी ओळख झाली. त्यांना दोन मुले होती. हंस अल्बर्ट आणि एडवर्ड. लग्नाआधी दोघांनाही लायझरिल नावाची एक  मुलगी झाली होती. परंतु, या दोघांनी याबद्दल मौन बाळगले होते, त्यामुळे त्याविषयी यापुढे आणखी काही माहिती नाही. मुलगा हंस अल्बर्टला लिहिलेल्या पत्रात, आइन्स्टाईन यांनी जर्मन भाषेत लिहिले, 'प्रिन्सटन, 11 जानेवारी 1935. मी गणिताच्या अक्राळविक्राळ अशा राक्षसाच्या पंज्यामध्ये इतक्या वाईट रीतीने अडकलो आहे की मी कोणालाही वैयक्तिक पत्र लिहू शकत नाही. मी ठीक आहे, मी जगापासून अलिप्त राहून  काम करण्यात व्यस्त आहे. मी युरोपला जाण्याचा विचार करीत नाही, कारण तेथे असलेल्या समस्यांना तोंड देण्यास मी सक्षम नाही.'

अमेरिकन संग्रहाकडून कागपत्रे खरेदी - 
जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाच्या सल्लागार हानोख़ गूटफ्रौएन्ड यांनी माध्यमांना सांगितले की या संग्रहातील बहुतेक कागदपत्रे यापूर्वीच संशोधकांकडे  फोटोकॉपी किंवा नक्कल म्हणून उपलब्ध आहेत. काही प्रती चांगल्या आणि काही खराब होत्या. नवीन अधिग्रहीत संग्रह अद्याप अमेरिकन संग्रहाकडे होता. त्यांच्या 'समग्र क्षेत्र सिद्धांत' या लेखात फारच कमी शब्द आहेत, गणिताची अनेक सूत्रे आणि समीकरणे आहेत. हा संग्रह मिळविण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील हे सांगण्यात आलेले नाही.

अल्बर्ट आइनस्टाईन हे त्याच्या काळात जगातील सर्वात प्रख्यात आणि प्रशंसनीय यहूदी होते, परंतु त्यांना कधीही उच्च पदाची भूक नव्हती. 1948 मध्ये इस्राईलची ज्यू देश म्हणून स्थापना झाली तेव्हा अध्यक्ष होण्याचादेखील प्रस्ताव आइनस्टाईन यांना होता. त्यांनी तो स्वीकारला नाही. त्याऐवजी, त्यांनी आपल्या इच्छेनुसार लिहिले की त्याच्या सर्व कागदोपत्री वारशाच्या प्रती, मूळ प्रती नव्हे तर अक्षरे, लेख, हस्तलिखिते इत्यादी स्वरूपात जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात सापडल्या पाहिजेत. या कागदपत्रांवरून असे दिसून येते की अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्याने जर्मनीमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना आणि कुटुंबातील सदस्यांना केवळ पत्रच लिहिले नाही तर त्यांना जर्मनीतून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला.

बहिणीच्या नावाने लिहिलेल्या पत्राचा 30 हजार यूरोमध्ये लिलाव -
हिटलर सत्तेत येण्याच्या 10 वर्षांपूर्वी आइनस्टाईने अंदाज लावला होता की, जर्मनी आपल्याच लोकांसाठी किती धोकादायक ठरू शकतो. याच मुद्द्यांवर आधारीत त्यांनी 1922 मध्ये बहिणीला एक पत्र लिहिले होते. त्याच पत्राचा 30 हजार यूरोमध्ये लिलाव करण्यात आला. यहूदि यांचा तिरस्कार करण्याऱ्या जर्मन सहकाऱ्यांमध्ये मी ठीक आहे. मात्र, बाहेरच्या जगात मी कोण आहे हे माहिती नाही. हे पत्र जर्मनच्या कील नगर येथून लिहिले होते. त्यावेळी आइनस्टाइन  बर्लिनच्या विलहेल्म इस्टिट्युटमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या पत्रातून लक्षात येते की, उच्चशिक्षित जर्मनी देखील हिटरल येण्यापूर्वी आपल्या यहुदींचा किती तिरस्कार करत होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांची बहिणी माया 1939 मध्ये प्रिस्टनमध्ये पोहोचली. मात्र, नाझीने त्यांच्या पतीला जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे मायाने मृत्यूपर्यंत आइनस्टाइन यांच्यासोबत वास्तव्य केले.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या नावाने पत्र -
आइनस्टाईन यांनी दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी 1939 च्या ऑगस्ट महिन्यात शास्त्रज्ञ लेओ जिलार्द यांच्या म्हणण्यानुसार एका पत्रावर हस्ताक्षर केले होते. अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रैंकलिन रुजवेल्टच्या यांच्या नावे हे पत्र लिहिले होते. यामध्ये नाझी जर्मनी एक विनाशकारी नव्या प्रकारचा बॉम्ब तयार करत आहे. जवळपास तो बनवून देखील झाला असेल. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी देखील अशाचप्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अणुबॉम्ब बनवणाऱ्या 'मैनहटन योजने'ला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. हेच दोन बॉम्ब 6 आणि 9 ऑगस्ट 1945 ला जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकण्यात आले. यामुळे आइनस्टाइन यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी 16 नोव्हेंबर 1954 ला आपल्या जुन्या मित्राला पत्र लिहिले होते. त्यामध्ये या प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी खंत व्यक्त केली होती. 'राष्ट्रपती रुजवेल्ट यांना अणुबॉम्ब बनविण्यासाठी सल्ला देणाऱ्या पत्रावर मी स्वाक्षरी करून माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे.', असे त्यांनी या पत्रात नमूद केले होते.

आइनस्टाइनचे निधन -
आयुष्याच्या शेवटच्या दिवसात आइनस्टाइन यांनी 10 प्रसिद्ध शास्त्रज्ञांसोबत मिळून 11 एप्रिल 1955 ला 'रसेल-आइस्टाईन मेनीफेस्टो' या आव्हानात्मक पत्रावर स्वाक्षरी केली होती. यामध्ये सर्वांना निरस्त्रीकरणासाठी संवेदनशील बनण्यासाठी विनंती केली होती. मात्र, आइनस्टाइन दोन दिवसानंतर इस्त्राइलच्या स्वातंत्र्य दिवसानिमित्त एक भाषण लिहित होते, त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना 15 एप्रिलला प्रिन्सटन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 18 एप्रिलला वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

मृतदेहाचे परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांनी आइनस्टाइन यांचा मेंदू आणि डोळे काढून घेतले. त्याद्वारे मेंदूमध्ये काही वेगळेपणा आहे का? याचा शोध घेण्यात आला. त्यांच्या नातेवाइकांनी देखील यासाठी परवानगी दिली. मात्र, त्यांच्या मेंदूमध्ये काही वेगळेपणा दिसून आला नाही. त्यांच्या मेंदूचा मोठा भाग 'नॅशनल म्युझिअम ऑफ हेल्थ अँड मेडिसिन' येथे पाठविण्यात आला. तुम्हाला आइनस्टाईन यांच्या मेंदूचा भाग पाहायचा असेल तर तो आजही याठिकाणी पाहायला मिळेल.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.