- दिशा सावंत
आपण खगोलशास्त्रज्ञ बनावे असे अनेकांचे स्वप्न असते. पण करिअरला प्राधान्य आणि उपलब्ध सुविधा यांमुळे अनेकांचे हे ‘स्वप्न’ स्वप्नच राहते. मात्र, पुणे नॉलेज क्लस्टरने असा एक उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये तुम्ही दीर्घिकांची नोंद घेऊन विश्लेषण करू शकता. त्याचा थेट फायदा शास्त्रज्ञांना होणार आहे.
प्रत्यक्ष समस्येला तोंड देण्यासाठी विज्ञानाची कास धरावीच लागते. देशातील अशा समस्यांचा शोध घेऊन त्याला विज्ञानातून उत्तर शोधण्यासाठी पुणे नॉलेज क्लस्टर काम करते. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या वतीने पुणे नॉलेज क्लस्टरची (पीकेसी) स्थापना केली आहे. वैज्ञानिक संस्थांबरोबरच औद्योगिक, शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रातील घटकांना एकत्रित आणणे, ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत.
पीकेसी संस्था नागरिकांना नानाविध वैज्ञानिक उपक्रमांत सहभागी करून त्यांच्यातील कौशल्य विकास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत असते. त्यासाठी नागरिकांसाठी अनेक कार्यशाळा, परिसंवाद आणि व्याख्यानांचेही आयोजन केले जाते.
पीकेसी नागरिकांना वैज्ञानिक माहितीकोश (डाटासेट्स) निर्माण करण्याच्या कार्यातही सहभागी करून घेते. ज्यांचा थेट उपयोग वैज्ञानिक आपल्या संशोधनाच्या कामामध्ये करू शकतात. अशा प्रकारे नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या उपक्रमास ‘सिटिझन सायन्स उपक्रम’ म्हणून ओळखले जाते.
अशा उपक्रमांत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात आणि उत्साहाने आपला खारीचा वाटा उचलतात. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून अतिशय मौलिक माहितीकोशाची निर्मिती करण्यासाठी फायदा होतो. अशा उपक्रमांच्या माध्यमातून पीकेसीला विविध प्रकारच्या वैज्ञानिक ज्ञानाचे संवर्धन एकाच व्यासपीठावर करणे शक्य होऊ शकते, त्यासाठी हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे.
सिटिझन सायन्स उपक्रमाअंतर्गत ‘एक दशलक्ष आकाशगंगा’ उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाद्वारे नागरिकांना खगोलशास्त्रज्ञांशी संवाद साधता आला आहे. अवकाशातील अगणित दीर्घिकांची निरीक्षणे करत, महत्त्वाच्या वैशिष्ट्यांना टिपून, त्यांचा अभ्यास करण्यासाठी जे विद्यार्थी किंवा नागरिक इच्छुक आहेत, अशांची मदत उपक्रमात घेण्यात आली आहे.
साधारणपणे एका दीर्घिकेत (उदाहरणार्थ आपली आकाशगंगा) अब्जावधी तारे असतात. विश्वामध्ये अशा अब्जावधी दीर्घिका सापडतात. त्यांचे निरीक्षण खगोलशास्त्रज्ञ लांब पल्ल्याच्या दुर्बिणीच्या माध्यमातून तसेच अतिविकसित सीसीडी कॅमेऱ्यांनी करतात. अशा प्रगत वेधशाळांच्या माध्यमातून अब्जावधी दीर्घिकांच्या प्रतिमांची नोंद वैज्ञानिकांचे चमू सातत्याने घेत असतात.
दीर्घिकेची प्रतिमा जरी प्राप्त झाली तरी दिसण्यावरून तिचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. दीर्घिकांच्या प्रकारांची, दृश्य वैशिष्ट्यांची नोंद होणे अत्यंत आवश्यक असते. अशा निरीक्षणांमधून अनेकदा यापूर्वी नोंद न झालेल्या अपूर्व अशा नव्या वैशिष्ट्यांचे आकलन होऊ शकते.
अशा वैशिष्ट्यांची नोंद पारंगत खगोलशास्त्रज्ञांच्या माध्यमातून तसेच प्रशिक्षित व्यक्तींकडून केली जाते; परंतु या दीर्घिकांच्या माहितीकोशात सातत्याने भर पडत असल्यामुळे नानाविध वैशिष्ट्यांची नोंद घेणे मूठभर खगोलशास्त्रज्ञांसाठी अत्यंत आव्हानात्मक असते.
सध्या उपलब्ध असणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) तंत्रदेखील तुलनेने तितकेसे सुधारित नाही. अशा परिस्थितीमध्ये अभ्यासाअंती जो काही डाटा उपलब्ध होतो, त्याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करणे आणि तो समजून घेणे हे खगोलशास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरते.
एक दशलक्ष आकाशगंगा हा उपक्रम झूनीव्हर्स (https://www.zooniverse.org/) सारख्या सिटिझन सायन्स व्यासपीठातून प्रेरणा घेऊन विकसित करण्यात आला आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वैज्ञानिक डाटासेट्सचे विश्लेषण जगभरातील नागरिकांतर्फे केले जाते. बंगळूरच्या भारतीय तारभौतिकी संस्थान (Indian Institute of Astrophysics)चे प्राध्यापक डॉ. सुधांशु बर्वे तसेच प्रसिद्ध वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा.डॉ. अजित केम्भवी यांच्या अभिनव विचारातून हा उपक्रम जन्माला आला असून, माझ्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर, भोपाळ)मधील पदव्युत्तर विद्यार्थी अथर्व बागूल, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईमधील पदवीपूर्व विद्यार्थी अनिश देशपांडे तसेच आयसर, तिरुपतीमधील पदव्युत्तर विद्यार्थिनी निकिता बालोधी या विद्यार्थ्यांचाही यात महत्त्वपूर्ण सहभाग आहे. कदीर पठाण यांनी ऑनलाईन व्यासपीठाची निर्मिती आणि विकसन केले आहे.
डॉ. केम्भवी या उपक्रमाविषयी आपले मत व्यक्त करताना म्हणतात, ‘‘पीकेसीच्या ‘एक दशलक्ष आकाशगंगा’ उपक्रमातर्फे नागरिकांना अत्याधुनिक खगोलशास्त्रीय संशोधनात मोलाची कामगिरी पार पाडता येईल. या प्रक्रियेत त्यांची ओळख नावीन्यपूर्ण शास्त्रीय पद्धतींशी होईल आणि हा अतिशय प्रोत्साहनात्मक अनुभव असेल.’’
पीकेसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया नागराज म्हणतात, ‘‘वैज्ञानिक संशोधनात नागरिकांचा सहभाग सक्षम करणे हे पीकेसीचे ध्येय आहे. अतिविकसित प्रयोगशाळांमधून विज्ञान सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात असे उपक्रम अग्रेसर ठरतील. या उपक्रमाची सुरुवात खगोलशास्त्रीय डाटासेटने झाली असली तरी भविष्यात नानाविध प्रकारच्या वैज्ञानिक डाटासेट्सचे आकलन नागरिकांकरवी करण्याची पीकेसीची महत्त्वाकांक्षा आहे.’’
नागरिकांच्या योगदानातून निर्माण झालेल्या माहितीकोशातून शास्त्रज्ञांना एआय अल्गोरिदम्स निर्माण आणि विकसित करण्यात मोलाची मदत मिळेल. अशा अल्गोरिदम्सचा उपयोग महाकाय आणि अधिकाधिक वैज्ञानिक डाटासेट्सच्या आकलनासाठी केला जाईल.
disha.sawant@pkc.org.in (लेखिका पुणे नॉलेज क्लस्टर मध्ये कार्यक्रम व्यवस्थापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.