Probiotics : बहुपयोगी आरोग्यवर्धक प्रोबायोटिक्सचा शोध ; पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेत ‘स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस’ जीवाणूवर संशोधन

बदललेल्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस दुर्धर आजार आणि सहव्याधींचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांचा विचार करता शास्त्रज्ञ आता जैविक औषधांवर संशोधन करत आहेत.
Probiotics
Probioticssakal
Updated on

पुणे : बदललेल्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस दुर्धर आजार आणि सहव्याधींचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक औषधांच्या दुष्परिणामांचा विचार करता शास्त्रज्ञ आता जैविक औषधांवर संशोधन करत आहेत. सध्या प्रोबायोटिक्स अर्थात शरीराला हितकारक जैविक घटकांवर जगभरात संशोधन चालू असून, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेने बहुपयोगी आरोग्यवर्धक प्रोबायोटिक्सचा शोध घेतला आहे.

आंबवलेल्या पदार्थांत जीवनसत्त्वे, प्रतिजैविके, शिवाय सजीव मित्रजंतू मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे पदार्थ ‘प्रोबायोटिक्स’ अर्थात शरीराला हितकारक जैविक घटकांनी युक्त असे असतात. सध्या निरोगी पचनसंस्थेसाठी प्रोबायोटिक्स घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आघारकर संस्थेतील जैवऊर्जा विभागातील शास्त्रज्ञ डॉ. निलम कापसे आणि संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर यांनी ‘स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस’ या जीवाणूच्या एमसीसीओ २०० या उपप्रकारावर संशोधन केले आहे. हा प्रोबायोटिक्स पचनसंस्थेतील आम्लयुक्त परिस्थितीतही यशस्वीपणे टिकाव धरतो, तसेच आतड्यांना अपायकारक सूक्ष्मजीवांपासून दूर ठेवत असल्याने अनेक रोगांपासूनही बचाव होत असल्याचे प्रयोगशाळेतील संशोधनात समोर आले आहे. हायटेक बायोसायन्सेस इंडिया लिमिटेडच्या साहाय्याने हे संशोधन करण्यात आले. डॉ. राघवेंद्र गायकेवरी, डॉ. शिल्पा वाघ यांचा प्रामुख्याने सहभाग होता. नुकताच एमडीपीआय मायक्रोऑर्गनिझम या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

या प्रोबायोटिक्सची वैशिष्ट्ये

१ पचनसंस्थेत तग धरणे :मानवी पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणावर आम्ल असते. त्यामध्ये बऱ्याचदा हे मित्र जीवाणू टिकाव धरू शकत नाहीत. मात्र, शास्त्रज्ञांनी शोधलेला हा मित्र जीवाणू पचनसंस्थेत टिकाव धरत असल्याचे सिद्ध झाले. तसेच आतड्यांवर घट्ट चिकटत अपायकारक जीवाणूंना हा जीवाणू जागा देत नाही. पर्यायाने पोटात मित्र जीवाणूंची संख्या वाढते.

२ पोषक पदार्थांची फॅक्टरी ः हा प्रोबायोटिक्स पोषक पदार्थांची जणू फॅक्टरीच आहे. फोलेट (जीवनसत्त्व बी ९)ची निर्मिती करतो. जो नवजात बालकांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

३ हृदयासाठी आरोग्यवर्धक : शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणाऱ्या या प्रोबायोटिक्सचा हृदयाशी निगडित अनेक विकारांत फायदा होतो. तसेच याचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे प्रयोगशाळेतील शोधातून पुढे आले आहे.

शास्त्रज्ञांनी नक्की काय केले?

जीवाणूंच्या जनुकीय अभ्यासातून प्रभावी ठरणारे प्रोबायोटिक्स निश्चित करण्यात आले

  • ‘स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस एमसीसीओ २००’ नावाचा जीवाणू प्रभावी असल्याचे सिद्ध

  • प्रयोगशाळेत त्याची वाढ करत ‘इनव्हिट्रो’ विश्लेषण करण्यात आले

  • मानवी पचनसंस्थेतील कृत्रिम वातावरण निर्माण करत जीवाणूची वाढ अभ्यासण्यात आली

  • जनुकीय विश्‍लेषणाच्या आधारे या प्रोबायोटिक्सचे गुणधर्म निश्चित करण्यात आले.

प्रोबायोटिक्सची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये ९४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल. आम्ही शोधलेल्या प्रोबायोटिक्सचे दुष्परिणाम नाहीत. तसेच जीवनशैलीशी निगडित आजारांवर ते उपयोगी ठरेल. प्रयोगशाळेतील संशोधनानंतर वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातील.

- डॉ. नीलम कापसे,

शास्त्रज्ञ, आघारकर संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.