कोल्हापूर - भारतात दर वर्षी 219.15 मेट्रिक टन इंधन आयात केले जाते. त्याची किंमत 90 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी म्हणजे 5.62 लाख कोटी इतकी होते. त्यातील 70 टक्के इंधन हे ऍटोमोबाईलमध्ये वापरले जाते. सर्वाधिक इंधन आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन दशकात भारताची इंधनाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1970-71 मध्ये पाच दशलक्ष मेट्रिक टन इतका इंधनाचा वापर होत होता. तो 2006-07 मध्ये 45 दशलक्ष मेट्रिक टन इतका झाला.
भारतातील इंधनाचा वाढता वापर विचारात घेता त्याचे पर्याय शोधण्याची गरज भासू लागली आहे. भविष्यात इंधनाचा तुटवडा जाणवणार हे निश्चित आहे. त्यासाठी आर्थिक तसेच पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इंधनाचा शोध घेतला जात आहे. भाजीपाल्यातील तेल आणि प्राण्यांतील चरबीपासून बायोडिझेल मिळवले जाऊ शकते; पण अन्न सुरक्षेचा विचार करता हे एक मोठे आव्हान आहे.
बायोडिझेल संदर्भात चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी नुकताच एक शोधनिबंध सादर केला आहे. त्यामध्ये जी. धरणी, डी. मगेश पीटर, जी. टी. मॅरी लीमा, टी. एस. कुमार, के. त्रिपाठी, ए. जोसेफाईन, आर. किरुबगरन आणि एम. ए. आत्मानंद या संशोधकांनी समुद्री सूक्ष्म एकपेशीय वनस्पती क्लोरिला व्हल्गॅरिसपासून बायोडिझेलचे उत्पादन घेतले आहे. तसेच, हे बायोडिझेल दुचाकी आणि चारचाकी गाड्यांमध्ये वापरण्यायोग्य असल्याचेही त्यांनी प्रयोगाअंती सिद्ध केले आहे. सल्फरविरहित व कार्बन मोनो ऑक्साईड, हायड्रोकार्बन आदीचे किमान उत्सर्जन यातून होते. यामुळे करण्यात आलेले हे संशोधन भावीकाळात खूपच उपयुक्त ठरणारे असे आहे. सूर्यप्रकाशात या सूक्ष्म एकपेशीय वनस्पतीचे उत्पादन घेऊन बायोडिझेल उत्पादनाचा खर्चही कमी करता येऊ शकेल, असे मत या संशोधकांनी व्यक्त केले आहे.
बायोडिझेलसाठी आवश्यक घटक
क्लोरिला व्हल्गॅरिसमध्ये असणारे फॅटी ऍसिड मिथिल इस्टर (फेम)च्या घटकांच्या प्रमाणावरून बायोडिझेल इंधनाची गुणवत्ता ठरते. फेमच्या प्रमाणावरूनच या सूक्ष्म एकपेशीय वनस्पती बायोडिझेलचे उत्पादन देऊ शकते, हे निश्चित करण्यात आले. क्लोरिला व्हल्गॅरिसमध्ये पालमिटीक ऍसिड 45.54 टक्के, पालमिटोलिक ऍसिड 31.10 टक्के, असे प्रमाण आढळते. तसेच सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड 58.37 टक्के इतके आढळते. इंधनाची गुणवत्ता सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडच्या प्रमाणावरूनच वाढत जाते.
इतकी आहे औष्णिक कार्यक्षमता
पेट्रोलियम डिझेलची औष्णिक कार्यक्षमता 32.42 ते 39.77 टक्के इतकी आहे. तर क्लोरिला व्हल्गॅरिसपासून तयार केलेल्या बायोडिझेलची औष्णिक कार्यक्षमता 32.42 ते 37.15 टक्के इतकी आहे. यावरून मायक्रोअल्गीपासून तयार केलेले बायोडिझेल हे पेट्रोलियम डिझेलला उत्तम पर्यायी इंधन ठरू शकते, असा दावा या शोधनिबंधात संशोधकांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.