सध्या लहान वयातच मुलांना मोबाईल घेऊन देण्याचं प्रमाण वाढलं आहे. अगदी स्वतःचा मोबाईल नसला, तरी मुलांना गप्प बसवण्यासाठी म्हणून पालक स्वतःचा मोबाईल मुलांना देतात. यामुळे मुलांना सोशल मीडियावर सहज प्रवेश मिळतो. लहान मुलांवर सोशल मीडियाचा दुष्परिणाम होत असल्याचं अनेक वेळा स्पष्ट झालं आहे. यामुळेच फ्रान्स सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
आता १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मीडिया वापरासाठी पालकांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. फ्रान्स सरकारने गुरूवारी याबाबतचा कायदा मंजूर केला. लहान मुलं सायबर अत्याचाराला बळी पडू नयेत यासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे.
फ्रान्सचे डिजिटल ट्रान्झिशन मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी याबाबत माहिती दिली. यासोबतच, हा कायदा शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा असे निर्देश त्यांनी फ्रान्सच्या संसद सदस्यांना दिले आहेत. त्यामुळे नेमकं कोणत्या तारखेपासून हा कायदा लागू होईल याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
सध्याचा कायदा कमकुवत
फ्रान्समधील सध्याचा सोशल मीडियाबाबतचा कायदा केवळ वैयक्तिक डेटाच्या वापरासंबंधी आहे. मात्र, सायबरस्टॉकिंग, सायबर बुलिंग, अनअटेनेबल ब्युटी स्टँडर्ड्स, पॉर्नोग्राफी, सोशल मीडियाचे व्यसन अशा बऱ्याच गोष्टी लहान मुलांसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे, यासाठी आणखी कडक कायदा आवश्यक असल्याचं मत फ्रान्समधील खासदारांनी व्यक्त केलं होतं.
लहानपणापासून व्यसन
फ्रान्सच्या नॅशनल कमिशन फॉर टेक्नॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील १० ते १४ वर्ष वयाच्या निम्म्याहून अधिक मुलांकडे स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम किंवा टिकटॉक अकाउंट आहे. मात्र, आता नवीन कायद्यानुसार १५ वर्षांपेक्षा लहान मुलांना सोशल मीडिया अकाउंट सुरू करण्यासाठी पालकांची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे.
कंपन्यांना होणार दंड
पालकांच्या परवानगी व्यतिरिक्त एखाद्या मुलाने सोशल मीडिया अकाउंट सुरू केले, तर ते बंद करण्याची मागणी पालक करू शकतील. सोबतच आपलं मूल सोशल मीडियावर किती वेळ आहे, यावरही पालक निर्बंध ठेऊ शकतील. जर कंपन्यांनी या कायद्याचं उल्लंघन केलं, तर त्यांना मोठा दंड होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.