Stephen Hawking : जेव्हा जगातील महान वैज्ञानिकाने 'टाईम-ट्रॅव्हलर्स'साठी पार्टी ठेवली होती...

जर जग परीकथांचा हात आयुष्यभर धरुन ठेऊ शकतं तर वैज्ञानिकांनी 'काल प्रवासी' अर्थात टाईम ट्रॅव्हलर्सचा हात धरून ठेवला (किंवा किमान तसा प्रयत्न केला) तर काय हरकत आहे?
Stephen Hawking Party
Stephen Hawking PartyeSakal
Updated on

Stephen Hawking's Time Traveller Party : स्टीफन हॉकींग! 'बस नाम ही काफी है' या प्रकारात जे लोकं येतात त्यातले हे विज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रणी. तुम्हाला विज्ञान अतिपरिचित असो किंवा मग विज्ञानाच्या जगाशी तुमची तोंड ओळख असो, स्टीफन हॉकींग हे नाव कधीच ऐकलं नाही असा नमुना दुर्मिळच ठरु शकतो. हे असं म्हणण्याचं कारण एवढंच की संपूर्ण शरीरात कार्यरत असलेल्या एकमेव गालातल्या स्नायूच्या मदतीने अख्ख्या जगाशी शेवटपर्यंत संवाद साधू शकणारा हा व्हीलचेअरला जखडलेला अवलिया हे मानवजातीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतिक आहे. अशी कालातीत प्रसिद्धी लाभलेले वैज्ञानिक तसे विरळाच आणि त्यातूनही स्वतः जिवंत असताना त्यांच्या हयातीत प्रसिद्ध पावलेले मोजायला तर एकाच हाताची बोटं पुरेशी ठरतील!

स्टीफन हॉकींग (Stephen Hawking) बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच! मज्जातंतूंच्या अतिशय दुर्धर रोगाने अगदी उमेदीच्या वयातच त्यांच्या शरीराला विळखा घातला. अगदी डॉक्टरांनी हात टेकले. "हा मुलगा तरुणपणीच मृत्यूमुखी पडणार" हे निदान वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांच्या हाती आलं होतं. ALS म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारात शरीरातील विविध कृती नियंत्रित करणारे मज्जातंतू हळूहळू आपोआप नाश पावू लागतात. अखेरीस कोणताही अवयव मेंदूला नियंत्रित करता येत नाही. (Stephen Hawking Disease)

अशाही परिस्थितीवर मात करून अख्ख्या जगाला 'काळ' ही संकल्पना समजावून सांगणाऱ्या, कृष्ण विवरांच्या रचनेशी ओळख करून देणाऱ्या आणि शेकडो शोधनिबंध प्रकाशित करणाऱ्या प्रचंड बुद्धिमत्तेचे धनी होते हॉकींग! आता प्रसिद्धी आणि अफाट बुद्धिमत्ता असलेल्यांनी जगाला बालीश वाटतील अशा कल्पनांना आपल्या हृदयात स्थान देऊ नये असं थोडीच असतं! जर जग परीकथांचा हात आयुष्यभर धरुन ठेऊ शकतं तर वैज्ञानिकांनी 'काल प्रवासी' अर्थात टाईम ट्रॅव्हलर्सचा (Time Traveler) हात धरून ठेवला (किंवा किमान तसा प्रयत्न केला) तर काय हरकत आहे?

Stephen Hawking Party
Explained : केमिस्ट्रीचा नोबेल मिळाला ते 'क्वांटम डॉट्स' नेमके काय आहेत? त्यांचा आपल्याला फायदा काय? वाचा सविस्तर

आपल्या मनात दडलेल्या कल्पनारम्य जगाकडे डोळे विस्फारून पाहणाऱ्या लहान मुलाला न्याय देण्याचा हॉकींग यांनी केलेला प्रयत्न म्हणजे त्यांची 'टाईम ट्रॅव्हलर्स पार्टी'! ही जगातील अशी एकमेव पार्टी असेल ज्यात डेकोरेशन, अन्न, पेयपानाची सोय वगैरे सगळं उपलब्ध होतं फक्त एकाच गोष्टीची कमी होती ती म्हणजे पाहुणे! पार्टीला एकही पाहुणा उपस्थित नव्हता याचं कारण असं की पार्टीची निमंत्रण पत्रिका ही पार्टी होऊन गेल्यानंतरच वाटण्यात आली होती! (Stephen Hawking Time Traveler Party)

"जर काळातून मागे प्रवास करणं खरंच शक्य असेल तर मला आशा आहे की माझी ही निमंत्रण पत्रिका कित्येक वर्षे टिकून राहील आणि एखाद्या टाईम ट्रॅव्हलरच्या हाती पडेल जेणेकरून तो टाईम ट्रॅव्हल करुन या पार्टीत सहभागी होईल!" हे हॉकींग यांचे या पार्टीबद्दलचे उद्गार होते. अर्थातच कुणीही पार्टीला आलं नाही.

कदाचित टाईम ट्रॅव्हलर्सना जगातल्या अतिशय महान वैज्ञानिकाला भेटायची इच्छा झाली नसेल. किंवा टाईम ट्रॅव्हल करणं कसं अशक्य आहे हे स्वतः हॉकींग यांनी सिद्ध केलेलं आहे हेही त्यामागचं कारण असू शकतं! किंवा मग, असंही असू शकतं, की एखाद्या टाईम ट्रॅव्हलर पर्यंत ही निमंत्रण पत्रिका पोहोचलीच नाही. या संपूर्ण पार्टीचा व्हिडिओही रेकॉर्ड करण्यात आला होता.

भौतिकशास्त्रावर भरभरून प्रेम करणाऱ्या या माणसाने जगाला आयुष्यावर कसं प्रेम करायचं हे शिकवलं. आयुष्याची जवळपास पन्नास वर्ष ALS शी झुंज देण्यात गेली. हात पाय काम करायचे बंद झाले, आवाज गेला कारण घशातील स्नायूंचं काम बंद पडलं, बोटं चालायची थांबली, गालातला एक स्नायू फक्त मेंदूशी जोडलेला राहीला. त्याच्या हालचाली करुन त्याद्वारे संगणकीय मेसेज पाठवत त्यांनी जगाशी आपला संवाद सुरुच ठेवला.

Stephen Hawking Party
Isaac Newton : जादूटोण्याच्या मार्गाला लागला होता प्रसिद्ध वैज्ञानिक न्यूटन; शोधत होता 'परीस'.. पण का?

हॉकिंगने आपल्यातील "चलो खुलके जीते है!" वाला अंदाज कधीही सोडला नाही! विज्ञानाच्या क्लिष्ट अंतरंगात विहार करतानाच सोबतच अगदी चित्रपट, मालिकांमध्ये पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावण्याची संधी सोडली नाही! २०१८ मध्ये त्यांच्या मृत्युपश्चात जेव्हा त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम ठेवला गेला तेव्हा केंब्रिज विद्यापीठाने २०३८ पर्यंत जन्माला आलेल्या सर्वांना प्रवेश खुला ठेवला होता! परंतु सारे उपस्थित २०१८च्या आधीच जन्मलेले होते हा दुर्दैवविलासच म्हणावा लागेल!

- मैत्रेयी बांदेकर

(लेखिका 'टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, मालवण' येथे केमिस्ट्रीच्या शिक्षिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.