आज या उत्तूंग व्यक्तीमत्वाचा आणि लोकाभिमुख वैज्ञानिकाचा म्हणजेच डॉ.वसंत गोवारीकर यांचा स्मृतीदिन, विनम्र अभिवादन !
पुण्यात त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मात्र कोल्हापुरच्या कोष्टी गल्लीत गेलं आणि त्यांचे बाबा पेशानं अभियंता (Engineer) असले तरी त्यांना आवड मात्र वाचनाची होती. त्यांच्या या घरात काही पुस्तकं नव्हे तर पुस्तकांचा अक्षरश: खजिनाच होता त्यामुळे आपसुकच त्यांना वाचनाची गोडी लागली. या पुस्तकांमधूनच त्यांना वेगवेगळी प्रयोगशील माणसं भेटत गेली, याच वाचन प्रवासात त्यांना भेटला ‘हेनरी फोर्ड’ “आपणही मोटारीचा भलामोठ्ठा कारखाना काढूया” या भन्नाट अशा भेटीनंतर त्यांचं बालमन स्वप्नरंजनात रंगून जात असे. स्वप्नं सगळीच मुले रंगवतात पण या महाशयांनी बालवयातच ‘मोटार’ बनवण्याचा फक्त ध्यास घेतला असं नव्हे तर एक छोटीशी मोटार (Motor) तयार करून ती गल्लीत फिरवून देखील दाखवली.
तेव्हापासूनच “एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर केवळ स्वप्नं बघून चालत नाही तसा ध्यास घ्यावा लागतो आणि तद्नुषंगाने कृती कार्यक्रम आखावा लागतो” हा गुरूमंत्र त्यांना त्या वयातच गवसला. कोल्हापुरात शालेय शिक्षण-महाविद्यालयीन शिक्षण आणि पाठोपाठ इथल्याच राजाराम महाविद्यालयात एमएस्सीची पदवी मिळविल्यानंतर रसायन अभियांत्रिकी हे शिक्षण घेण्यासाठी ते थेट लंडनला रवाना झाले. तिथल्या बर्मिंगहॅम विद्यापीठाने (University of Birmingham)
१९५९ ते १९६७ या कालावधीत त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेटची पदवी मिळवली आणि लागलीच हार्वेलस्थित अॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंट अन् पाठोपाठ समरफिल्ड रिसर्च स्टेशन ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशन येथे संशोधनात्मक काम केलं. या दरम्यान त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या परीक्षांसाठी बाह्यपरीक्षक म्हणून काम पाहिले सोबत परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेकविध वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले.
संशोधन आणि विज्ञानविषयक साहित्य या दोन्ही क्षेत्रात ढिगभर अनुभव घेतांना ते तिथं अगदी रममाण झाले होते अन् मनात लंडनमध्येच संशोधन क्षेत्रात काम करण्याचा मानसही पक्का होत होता, तेवढ्यात इस्रोचे तत्कालिन रत्नपारखी संचालक डॉ. विक्रम साराभाईंच्या चाणाक्ष नजरेने त्यांना हेरले. सक्षम वैज्ञानिक म्हणून स्वयंप्रेरणेने एखादे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची त्यांची अजोड क्षमता लक्षात घेऊन साराभाईंनी त्यांच्यावर अग्निबाण अर्थात मिसाईलसाठी लागणारे इंधन तयार करण्याची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला मिसाईलसाठी लागणारे घनइंधन विकसित करण्यासाठी ते इस्रोत ‘प्रॉपेलंट इंजिनिअर’ या पदी रुजू झाले. १९६७ ला केरळस्थित ‘थुंबा’ येथील एका पडिक चर्चमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बनावटीच्या मिसाईलसाठी लागणारे घनइंधन तयार करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली अन् इथूनंच पुढं जगातील सर्वोत्तम इंधन बनवलं.
पडिक चर्चचं पुढं भव्य वास्तूत रूपांतर झालं अन् तिथं संशोधन आणि विकसन विभागही स्थापित झाला. इथं त्यांनी प्रॉपेलंट इंधन कॉम्प्लेक्स-अमोनियम परक्लोरेट प्लांट असे वेगळे विभागही बनवले. येथील ‘सॉलिड प्रॉपेलंट स्पेस बूस्टर प्लांट’हा जगातील सर्वांत मोठं घनइंधन तयार करणारा विभाग ठरला त्यामुळे खऱ्या अर्थाने भारताच्या अवकाश प्रॉपेलंट तंत्रज्ञानाचे पितृत्व त्यांना जाते. या सगळ्या कार्यकर्तृत्वामुळे १९७९ ला त्यांची विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या संचालकपदाच्या कारकिर्दीत एसएलव्ही-३ प्रकल्प सुरू झाला आणि भारताचा पहिला उपग्रह पृथ्वीभोवतालच्या कक्षेत स्थिर केला गेला. १९८३ ला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एसएलव्ही-३ हा प्रकल्पही यशस्वीरित्या पूर्ण झाला. १९८६ ते १९९३ या कालावधीत ते भारतीय शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार या पदावर कार्यरत होते.
या कालावधीत त्यांनी तब्बल चार पंतप्रधानांसाठी हे काम केलं. विज्ञान फक्त प्रयोगशाळेत न राहता ते जनमानसात रुजावं-प्रत्येक भारतीयाचा दृष्टिकोन विज्ञानवादी असावा हे त्यांचं स्वप्न होतं आणि याच प्रेरणेतून २८ फेब्रुवारी हा दिवस देशात ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जावा, असे आवाहन त्यांनी केले.
१९८७ पासून एखादी मध्यवर्ती वैज्ञानिक संकल्पना घेऊन दरवर्षी देशभरात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात-विज्ञान प्रदर्शन भरवली जातात-व्याख्यानं, परिसंवाद आयोजित केले जातात. सर्व वयोगटात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा-वृद्धिंगत व्हावी या दृष्टिनं एक ना अनेक कार्यक्रम राबवले जातात. ‘राष्ट्रीय बालविज्ञान काँग्रेस’ हा देखील त्यांनी सुरू केलेला एक अत्यंत कल्पक असा कार्यक्रम. शाळकरी बालवैज्ञानिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे फक्त आनंदाची नव्हे तर ज्ञानसंवर्धनाची मोठी पर्वणी असते.
शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वसामान्यातही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी त्यांनी एन.सी.एस.टी.एस.च्या जाळ्याची देशव्यापी घडी बसवली आणि आकाशवाणी-दूरदर्शन-स्वयंसेवी गट-स्वयंसेवी संस्था अश्या देशभरातील जवळपास पन्नासेक संस्थांना एकत्र घेऊन देशात वैज्ञानिक चळवळ रुजवण्याच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. १९९० ला इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा इथं पार पडलेल्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भुषवले.
शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वसामान्यातही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी त्यांनी एन.सी.एस.टी.एस.च्या जाळ्याची देशव्यापी घडी बसवली आणि आकाशवाणी-दूरदर्शन-स्वयंसेवी गट-स्वयंसेवी संस्था अश्या देशभरातील जवळपास पन्नासेक संस्थांना एकत्र घेऊन देशात वैज्ञानिक चळवळ रुजवण्याच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. १९९० ला इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा इथं पार पडलेल्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भुषवले.
१९९३ ते १९९५ या कालावधीत भारत सरकारनं त्यांची एका खतांविषयीच्या एका प्रकल्पावर एकसदस्यीय समिती गठित केली आणि २००५ ला त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सर्वार्थानं ऐतिहासिक अश्या ‘द फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया’ या प्रचंड मोठ्या ग्रंथाचे काम पुर्णत्वास गेले. नैऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासंबंधीचे अचूक आराखडे बांधण्याचे तंत्रज्ञान आणि पद्धत त्यांनी विकसित केल्याने आजही आपण मे महिन्यात आगामी मॉन्सूनचं भाकीत वर्तवू शकतो त्यामुळे मॉन्सूनचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रारूपाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. १९९५ ते १९९८ या तीन वर्षात त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद भुषवले.
इस्रोचे ‘सतीश धवन डिस्टिंग्विश्ड प्राध्यापक’ म्हणून इस्रोतील तरुण शास्त्रज्ञांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले तसेच इंफाळस्थित मणिपाल विद्यापीठाच्या कोर्टावरही त्यांची नियुक्ती झाली होती. १९९३ला स्थापित भारत सरकारच्या शुगर टेक्नॉलॉजी मिशनच्या सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. 'द अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे २००४ ला मिसाईलच्या इंधनासंबंधी त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल 'आर्यभट्ट’ या अत्यंत मानाचा पुरस्कारासोबतच त्यांना अनेकविध संस्थांची सुवर्णपदकं-मानाच्या पदव्या-पद्मश्री-पद्मभूषण हे मानाचे पुरस्कारही मिळालेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.