हे टायर्स जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले. तो ही जगप्रसिद्ध झाला. तो होता 'जॉन बॉयड डनलप'.
मध्यंतरी मी एक व्हिडिओ बघितला, ज्यात हाय टेन्शन वायरचा करंट बसून एक माकड खांबावरनं कोसळलं. दुसऱ्या माकडानं आधी बघ्यांकडे मदतीचा धावा केला अन् कुणीच पुढं येत नाही हे बघून बाजूच्या गटारीतलं पाणी ओंजळीत नेऊन अर्धमेल्या माकडाला पाजलं आणि तरीही त्यात चैतन्य येत नाही हे बघून अगदी प्रशिक्षित डॉक्टरप्रमाणं त्याच्या छातीवर जोर देत म्हणजे अगदी प्रॉपर सीपीआर देत त्याला पुढच्या पाच मिनिटात थेट जिवंत केलं.
माकडच ते, काय कळतं त्याला? कितीशी समजं? काय अक्कल असणार? गरज आहे या गोष्टींची? अर्थातच आहे. पण याआधी मनात ‘करुणा’ असायला पाहिजे. माकडात ती होती. स्वयंघोषित हुशार प्राणी असलेल्या गंमत बघणाऱ्या माणसात ती नव्हती. सगळी अक्कल-सगळं प्रशिक्षण-सगळं विज्ञान केरात. काय म्हणता? विज्ञानाला कशाला केरात घालतोस? थांबा एक गोष्टच सांगतो.
गोष्ट आहे ‘त्याची’. तो तसा सहृदयी माणूस होता, प्राण्यांवर त्याचं अतोनात प्रेम त्यामुळे त्याने ‘व्हेटर्नरी सर्जन’ हा पेशा स्वीकारला होता. रिकाम्या वेळेत आपल्या लहान मुलाला सायकल शिकवणं आणि बागेत फिरायला घेऊन जाणं हे त्याचे आवडते छंद. नेहमीप्रमाणं बागेत गेला असताना मुलगा त्याच्या तीनचाकी सायकलवर धडपडत होता आणि तो कौतुकानं ते दृश्य बघत होता. बाजूच्याच बाकाशेजारी व्हिलचेअरवर बसलेली एक वृद्धा बागेतली सुंदर फुलं न्याहाळत होती.
“आजे काय एवढं बारकाईनं बघतेस गं. काय एवढं विशेष आहे त्यात?” त्यानं वृद्धेला सहज विचारलं. “बाळा मी या फुलात निसर्ग बघते, त्याची कमाल बघते. बघ ना किती प्रकारचे रंग भरलेत त्यानं या फुलात. सगळे वेगवेगळे. जणू काही थोडेसे आपल्या सारखेच. आपणही जसे गुण-अवगुणांच्या वेगवेगळ्या छटांनी भरलेले असतो तसे.”
वृद्धेचे मार्मिक बोल त्याला आतवर स्पर्शून गेले. आता तो बागेत आल्यावर नेहमी आजीबाईशी गप्पा करू लागला किंबहुना आजीची व्हिलचेअर ढकलत तिच्याशी गप्पा मारणं त्याचा जणू छंदच झाला. बाजूला मुलाची सायकल आणि इकडं आजीची व्हिलचेअर. यावेळी ‘मैफील’ चांगलीच रंगत होती.
एके दिवशी गप्पांमध्ये त्याच्या लक्षात आलं की उंचसखल जमीन अन् ओबडधोबड लोखंडी चाकांमुळे आजीबाईला व्हिलचेअरवरून नेतांना झटके बसत अन् सायकलस्वार मुलाचीही जवळजवळ तिच गत असे. “काय करावं बुवा जेणे करून हे धक्के-झटके कमी होतील?” तो चिंतन करू लागला. सायकल-व्हिलचेअर यांची रचना बदलली तर? जमिनीला समपातळीत प्लेन केलं तर? काय करावं? उपाय काही सापडेना. तेवढ्यात त्याची नजर रबरावर पडली.” हे लवचिक आहे. याचा उपयोग होऊ शकतो का ?” तो मनोमन विचार करू लागला.
‘विचार राहूदेत’ म्हणत त्यानं रबराचे तुकडे व्हिलचेअर आणि सायकलच्या चाकांवर चिकटवले. थोडं शॉक ॲबसॉर्प्शन होत झटके अर्थातच कमी झाले. त्यामुळे मुलाची धडपड कमी तर झालीच पण आजीबाईची झटक्यांमुळं होणारी अंगदुखीही थांबली. तिनं त्याला तोंडभरून आशीर्वाद दिला” तू खूप खूप मोठा होशील.”
आजीबाईचा आशीर्वाद खरा ठरला काही दिवसातच पेश्यानं ‘व्हेटर्नरी सर्जन’ असलेल्या त्यानं हवा भरलेल्या रबरी चाकांचा व्यवसाय सुरू केला, ज्यांना आजकाल आपण टायर्स म्हणतो. हळूहळू उद्योगधंदा वाढला. त्याचे हे टायर्स जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले. तो ही जगप्रसिद्ध झाला. तो होता 'जॉन बॉयड डनलप'. आणि त्याचे रबरी चाकं म्हणजे वर्ल्ड फेमस ब्रॅंड ‘डनलप टायर्स!’ आज आपलं जीवन-संपुर्ण जग या चाकांनी गतीमान केलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सायकल असो वा विमान. चक्का मंगताच हैं!.
अर्थात नंतर यात अनेक प्रयोग होत गेले. खरं तर डनलप पुर्वीच वायवीय चाकाचं पेटंट कुणीतरी घेतलं होतं पण त्याचा प्रत्यक्ष उपयोग पहिल्यांदा डनलपनं केला कारण त्याच्याकडं केवळ ज्ञान नव्हतं तर त्याचा उपयोग ‘कुणाचा तरी त्रास कमी व्हावा’ यासाठी धडपड करण्यासाठी मनात जी ‘करुणा’ असते ती त्याच्या ठायी होती.
डनलपच्या प्रेरणा फारशा आर्थिक कधीच नव्हत्या त्यामुळं त्याच्या संशोधनाचा ‘ब्रॅंड इस्टॅब्लिश’ पलीकडं काय फायदा झाला? हा संशोधनाचा विषय असू शकतो पण त्याच्या स्मरणार्थ तिथलं सरकार दहा पौंडाच्या नोटेवर त्याचं चित्र छापतं हेच या व्यक्तीचं अल्टिमेट यश.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.