Department of Technology Simcard Block : भारतात वाढत्या फेक कॉल्स आणि टेलिमार्केटिंग फसवणुकीवर लगाम लावण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) मोठे पाऊल उचलले आहे. देशातील तब्बल १.७७ कोटी सिम कार्ड्स बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून, या कार्ड्सचा वापर फसवे कॉल्स करण्यासाठी करण्यात येत होता. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत जवळपास ७ कोटी फेक कॉल्स रोखण्यात दूरसंचार विभागाला यश आले आहे.
दूरसंचार क्षेत्रातील वापरकर्त्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, दूरसंचार विभाग आणि ट्राय (TRAI) यांनी एकत्रितपणे फेक कॉल्सवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्यात ट्रायने नवीन धोरण राबवले आहे, ज्यामुळे आता ऑपरेटर लेव्हलवरच मार्केटिंग आणि फेक कॉल्स थांबवता येणार आहेत. यामुळे फेक कॉल्ससाठी व्हाइटलिस्टिंगची गरज भासणार नाही.
दूरसंचार विभागाने त्यांच्या अधिकृत हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, दररोज साधारणतः १.३५ कोटी फेक कॉल्स रोखले जात आहेत. विभागाने १.७७ कोटी फेक टेलिमार्केटिंग साठी वापरण्यात आलेली सिम कार्ड्स बंद केली आहेत. तसेच, सुमारे १४ ते १५ लाख मोबाईल क्रमांकांचा शोध घेतला आहे जे फेक कॉल्ससाठी वापरले जात होते. वापरकर्त्यांच्या तक्रारीनंतर विभागाने त्वरित कारवाई करत ७ कोटी फेक कॉल्स ब्लॉक केले आहेत.
दूरसंचार विभागाची ही मोहीम येथेच थांबणार नसून, पुढेही ते या समस्येवर कठोर उपाययोजना करतील. तंत्रज्ञानाने जरी आपले जीवन सोपे केले असले तरी त्याचा गैरवापरही वाढला आहे. त्यामुळे फेक कॉल्स आणि फसवणूक थांबवण्यासाठी आता नेटवर्क लेव्हलवरच एसएमएसमधील URL किंवा APK लिंक ब्लॉक केल्या जातील. त्यामुळे वापरकर्त्यांना सुरक्षित आणि त्रासमुक्त दूरसंचार सेवा मिळेल.