‘अन् आताही ती फिरतेय’ हे छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं...

“पृथ्वी ब्रम्हांडाचे केंद्र तर नाहीच पण तिच सुर्याभोवती फिरते आणि हो ‘E pur si muove’ अन् आताही ती फिरतेय.” असं सांगत गॅलिलिओ गॅलिली’ (Galileo Galilei) तत्कालीन सर्व विचारांना छेद दिला.
Galileo Galilei’
Galileo Galilei’Esakal
Updated on
Summary

गॅलिलिओ गॅलिली या महान शास्त्रज्ञाचा आज स्मृतीदिन आहे.

एका प्रसिद्ध चित्रकारानं आपल्या वैज्ञानिक मित्राचं काढलेलं एक जगविख्यात पुरातन पेंटिंग आहे ज्यात तुरूंगात बसलेला एक वैज्ञानिक शुन्यात बघतांना दाखवलाय. आज या चित्रातल्या वैज्ञानिकाचीच गोष्ट सांगणार आहोत.

१९११ साली हे पेंटिंग जेव्हा रिस्टोर करण्यात आलं तेव्हा कळलं की या पेंटिंगमधला वैज्ञानिक शुन्यात नव्हे तर जिथं बघतोय तिथं एक वाक्य लिहिलंय ‘E pur si muove’ अर्थात ‘अन् आताही ती फिरतेय’. चित्रकार होता बर्तोलोमे मुरिलो (Bertolome Murillo) अन् त्यानं ज्या मित्राचं चित्र काढलं तो होता दस्तुरखुद्द ‘गॅलिलिओ गॅलिली’(‘Galileo Galilei’)

‘अन् आताही ती फिरतेय’ हे वरवर साधं वाटणारं छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं, त्याच्या आयुष्याचं सार होतं, विद्रोही बुद्धीमत्तेचं द्योतक होतं, मध्ययुगीन कॅथलिक चर्च (Catholic Church) पृथ्वीला ब्रह्मांडाचं केंद्र मानायचं (center of the universe) पण त्याचं हे मत त्यांच्या एकदमच उलट होतं. “पृथ्वी ब्रम्हांडाचे केंद्र तर नाहीच पण तिच सुर्याभोवती फिरते आणि हो ‘E pur si muove’ अन् आताही ती फिरतेय.”

Galileo Galilei’
Nikola Tesla : एडिसननं बल्बचा शोध लावला खरं, पण तुमच्या घरात उजेड पाडला तो या अवलियानं!

आजही अंधश्रद्धेचं एक वेगळं मार्केट आहे तेव्हा तर थेट ‘अंधारयुग’ होतं. अगदी त्या काळात गॅलिलिओ सुर्य-चंद्र-तारे यांच्याबद्दल बोलत होता. त्यांच्यातील अंतर मोजायचा प्रयत्न करत होता..

त्यानं ‘टेलीस्कोप’ (Telescope) शोधत ज्युपिटर (Jupiter) ग्रहाचे लो-कॅलिस्टो-युरोपा-जेनिमेड नामक चार उपग्रह शोधले होते. सिलॅटोन-कंपास यांचाही शोध लावला होता. इटलीतील पीसा इथं जन्माला आलेल्या गॅलिलिओचं पहिलं प्रेम होतं ‘गणित’. तो तर एवढंही म्हणायचा निसर्गाची कुठली भाषा असेल तर ती म्हणजे ‘गणित’. तो फक्त ‘गणिती’ मणुष्य नव्हता तर तत्वज्ञ-भाष्यकार-अभियंता अन् संशोधकही होता.

सुरूवातीच्या काळात गॅलिलिओचा कल वैद्यकशास्राकडं होता त्यानं पीसा विद्यापीठात त्यासाठी औपचारिक प्रवेशही घेतला पण तो हा अभ्यासक्रम पुर्ण करू शकला नाही किंबहुना हि वॉज ड्रापआऊट. बुद्धिमत्तेसोबत थोडं सर्किट असणं कम्पल्सरी असतं. अर्थात सरसकटीकरण करत नाही पण हे नेहमी घडून आलेलं दिसतं. वैद्यकशास्त्रातील बाय चॉईस घवघवीत अपयशानंतर त्यानं युटर्न घेत पुनःश्च हरिॐ केला आणि ‘गणित’ अभ्यासायला सुरूवात केली. सामान्य परिप्रेक्ष्यात हे लोकं ‘सर्किट’ वाटले तरी तसं नसतं तर्क-बुद्धिप्रामाण्यवाद-प्रयोग ही लाईन ते सोडत नाहीत.

Galileo Galilei’
ग्रेगर मेंडेल : जनुकशास्त्राचे जनक

प्रत्येक गोष्टीकडं चिकित्सक दृष्टिकोनातून बघण्याच्या त्यांच्या सवयीमुळं ते अपयशातूनही काहीतरी शोधून काढतात-शिकतात. वैद्यकिय शिक्षणावेळी त्यानं एकदा वाऱ्यानं हलणारं ‘झुंबर’ बघितलं. सोबत अनेक लोकं ते बघत होते पण याच्या एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे हलणारं झुंबर डावीकडं जायला जितका वेळ घेतं तितकंच उजवीकडं जायलाही.

झालं... घरी येऊन त्यानं दोन ‘लोलक’ (Pendulum) बनवले एक छोटा आणि एक मोठा अन् त्यांना फिरवलं. सारखाच अनुभव आला.हे देखील त्या झुंबराप्रमाणं दोन्ही बाजूला जायला सारखाच वेळ घेत होते..

‘गणित’ त्याचं पहिलंवहिलं प्रेम होतंच ओघानं भुमितीशीही चांगली दोस्ती होती..

“बस्स..बाबा मला नकोय मेडिकलची डिग्री..मला गणित आणि तत्वज्ञान शिकायचंय” त्यानं त्याच्या बाबांना मनमोकळेपणानं सांगून टाकलं..

अर्थात ‘बाजूवाले कपूरसाब’ फक्त आपल्याकडंच असतात असं नाही. अब्बा नहीं माने. पण शेवटी बापाला मुलाच्या इच्छेविरुद्ध फारसं जाता येत नाही.

‘हो नाही’ करत शेवटी ते राजी झाले पण आपल्या याला काही ‘आंद्रे इस्तवान’ होता आलं नाही. घड्याळ बनवण्यात पठ्ठ्या सपशेल अपयशी ठरला. ‘कुठलंही अपयश किंवा अगदी यशही शेवटचं नसतं’ किंबहुना जे सतत प्रयत्नरत असतात त्यांनाच अपयश जास्त चाखावं लागतं.

त्यानं पीसा विद्यापीठात ॲरिस्टॉटलच्या अनेक सिद्धांतांची पिसं काढली. ॲरिस्टॉटलनं त्याचा गुरू प्लेटोला काऊंटर केलं होतं पण त्याला काऊंटर करणारं कुणी पैदा झालं नव्हतं. अगदी ‘ॲरिस्टॉटलवर टिका म्हणजे थेट बायबलवर टिका’ असं समीकरण त्या काळी झालेलं होतं कारण ॲरिस्टॉटल ‘चर्च’ची भाषा बोलायचा तो ही ‘पृथ्वी या ब्रम्हांडाचं केंद्र आहे’ या मताचा होता. एवढंच नाही तर ‘हेच अंतिम सत्य आहे’ हे देखील त्यानं घोषित करून टाकलं होतं.

गॅलिलिओनं ॲरिस्टॉटलच्या या विचारांना खुलेआम आव्हान देत ॲरिस्टॉटलही माणुसच आहे तो चुका करू शकतो अशी पुस्तीही जोडली आणि आपल्या या विधानाच्या पुष्ट्यर्थ पीसाच्या झुकत्या मनोऱ्यावर एक प्रयोगही करून दाखवला. ॲरिस्टॉटल म्हटला होता की,” एकाच वेळी एक जड आणि एक हलकी वस्तू उंचावरून खाली सोडल्यास हलकी वस्तू आधी जमिनीवर पडेल.”

गॅलिलिओला लोकांनी रोखलं पण ऐकेल तो गॅलिलिओ कसला? पठ्ठ्यानं पीसाच्या मनोऱ्यावर चढून एक जड आणि एक हलका असे दोन वेगवेगळ्या वजनाचे गोळे खाली फेकले दोन्ही एकाच वेळी जमिनीवर पडले.

“च्याऽऽ मारी ॲरिस्टॉटलभैय्या कैसे गलत हो सकते हैं?” लोकं बुचकळ्यात पडली पण गॅलिलिओनं त्यांची तोंडं बंद केली होती.

१५८८साली त्याला फ्लोरेन्स ॲकॅडमीनं निमंत्रित केलं. त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी होती. त्यानं तिथं गणित आणि तत्वज्ञान यांचा मिलाफ साधत भयंकर सुंदर असं भाषण दिलं. याआधी ‘गणित’ लोकांसाठी प्रचंड नीरस प्रकरण होतं त्यानं ते रोचक करून दाखवलं. यानंतर ज्या पीसा विद्यापीठाचा तो ड्रॉपआऊट विद्यार्थी होता, वयाच्या पंचविसाव्या वर्षी तो तिथं गणिताचा प्राध्यापक झाला. त्याच्या सरळसोट विचार मांडण्याच्या पद्धतीमुळं फार दिवस तो तिथं टिकला नाही हा भाग वेगळा.

पुढं भाऊंनी केप्लरच्या ‘समु्द्रातील भरती-ओहोटी चंद्रामुळं येते’ सिद्धांताला आव्हान दिलं. ‘छ्याऽऽ हे पृथ्वी गोल फिरल्यामुळं होतंय’ त्यानं आपलं मत मांडलं. यासाठी त्यानं ‘कटोऱ्यात पाणी’ ठेऊन प्रयोग केला जो पुरता फसला. गॅलिलिओचं म्हणणं यावेळी चुक ठरलं. केप्लर वॉज राईट. चुका सगळ्यांकडून होता पण चर्चा झाली पाहीजे प्रयोग होत राहिले पाहिजे हे अनेकांना यातून कळलं. गॅलिलिओच तो. तो प्रयोग करत राहिला. त्याला खूप नवनव्या गोष्टी शिकायच्या होत्या, शोधायच्या होत्या त्यानं असंख्य रेखाटनं काढली. त्याला मेणबत्ती आणि काचेपासून रिफ्लेक्टर बनवायचं होतं, वस्तू उचलण्यासाठी लिफ्ट बनवायची होती, टुईनवन कंगवा कम चमचा बनवायचा होता, चांगला पेन बनवायचा होता, थर्मामीटर बनवायचं होतं पण आर्थिक कारणानं त्याचे अनेक प्रकल्प रखडले.

तो प्रेमातही पडला त्याला तिन मुली झाल्या पण त्यानं लग्न केलं नाही. यावर ‘प्रेम आहे बस्स’ एवढाच त्याचा तर्क. आजही या गोष्टीला समाजमान्यता नाही, तेव्हाचं सोडाच. पर्यायानं पुढं जाऊन त्याच्या एकाही मुलीचं लग्न झालं नाही. त्याचा आयुष्यातील अधिकाधिक वेळ लोकांना ‘तुम्ही जे म्हणताय तसं ते अजिबात नाहीये’ हे समजवण्यातच गेला. काळाच्या पुढं असणाऱ्यांना आपलं म्हणणं समजवण्यात फारसं यश मिळतं असं नाही, ते गेल्यानंतर त्यांचे पुतळे उभे रहातात ही गोष्ट वेगळी. कोपर्निकसनं त्याच्या आधीच पृ्थ्वीच्या फिरण्याबद्दल अर्थात ‘Heliocentric Theory’बद्दल बोललं होतं पण असं म्हणतात चर्चच्या भितीमुळं त्यानं ते लिहून ठेवलं नाही पण गॅलिलिओनं ते डंके की चोट पर बोललं- लिहिलं-लोकांपर्यंत पोहोचवलं.

गॅलिलिओनं यावर एक पुस्तकच लिहिलं. पुस्तकाचं नाव होतं ‘Dialogue’ धर्माच्या तथाकथित ठेकेदारांना थेट आव्हान देणारं-बायबलच्या एकदम विरोधात. चर्चवाल्यांना हे प्रचंड खटकलं. त्यांनी त्याच्याविरुद्ध थेट कोर्टात दावा ठोकला. ‘जे लिहिलंय ते चुकीचं आहे’ हा कबुलीजबाब देण्यासाठी त्याला राजधानी ‘रोम’ इथं बोलवण्यात आलं.

१६३३च्या फेब्रुवारी महिन्यात तो तिथं पोहोचला. सगळे धर्ममार्तंड त्याचा खाली मान घालून ‘माफीनामा’ ऐकायला उत्सुक होते तो बोलायला उभा राहिला. “मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे अन् संपु्र्ण दाव्यांनिशी ठाम आहे.” त्यानं आत्मविश्वासपुर्वक न्यायालयात जबाब दिला.

‘इतनी जुर्रऽऽत?’ त्याला तुरूंगात डांबण्यात आलं.

‘झटका मिळाला की सुधारेल गडी’ ही या धर्माच्या ठेकेदारांची अटकळही त्यानं फोल ठरवली.

“याला आयुष्यभर नजरकैदेत ठेवावं” या आदेशासोबतच ‘Dilogue’सह त्याच्या प्रत्येक प्रकाशनावर कायमचे निर्बंध लावण्यात आले.

१६४२ साली तो हे जग सोडून गेला. पण जेव्हा त्याचं प्रेत त्याच्या इच्छेनुसार त्याच्या बाबांच्या शेजारी दफन करण्यासाठी १७३७ साली पुन्हा काढलं तेव्हा त्याच्या एका चाहत्यानं त्याची आठवण म्हणून त्याच्या हाताचं एक बोट काढून घेतलं. हे बोट आजही फ्लोरेन्सच्या एका संग्रहालयात ठेवलंय जे आजही रोमकडं इशारा करतं जिथं त्याच्यावर ‘खरं बोलण्यासाठी’ गुन्हा दाखल झाला होता.

तो गेल्यानंतर तब्बल तीनशे वर्षांनी ३१ ऑक्टोबर १९९२ ला पोप जॉन पॉल यांनी चर्चची चूक मान्य केली. सगळ्या जगानंच काय अगदी अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंग यांनीही त्याला ’Father of Modern Science’ म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.