Edwin Howard Armstrong : कहाणी रेडिओ तयार करणाऱ्या अवलियाची...

जगभरात खाजगी एफएम वाहिन्यांचं प्रचंड मोठं जाळं पसरलंय. तंत्र-मंत्र सगळं बदललं तरी ‘एफएम’ दिवसातून एकदा कुठंतरी भेटतोच.
Edwin Howard Armstrong
Edwin Howard Armstrongesakal
Updated on
Summary

जगभरात खाजगी एफएम वाहिन्यांचं प्रचंड मोठं जाळं पसरलंय. तंत्र-मंत्र सगळं बदललं तरी ‘एफएम’ दिवसातून एकदा कुठंतरी भेटतोच.

आयुष्यात सगळ्यात आधी बघितलेलं गॅजट म्हणजे रेडिओ (Radio). रेडिओवरचे कार्यक्रम ऐकतांना गायक-वादक आणि त्यांच्या बाजूला निवेदक आत बसलेत असंच वाटायचं. वेगवेगळ्या सिग्नेचर ट्यून्स-जिंगल्स-उद्घोषणा-जाहिराती अगदी तोंडपाठ होत्या. तंत्रज्ञान झपाटयाने बदलत गेले आणि टिव्हीनं रेडिओला झाकोळून टाकलं. आधी रेडिओवर अमुकतमुक मेगाहर्ट्जवरून ‘शुभरात्री’ ऐकू आलं की घर झोपी जायचं नंतर टिव्हीनं हा वेळ अंमळ पुढं ढकलला,आता मोबाईल (Mobile) फोनमुळं लोकं फारशी झोपतही नाहीत.

मोबाईल फोनवरून आठवलं. रेडिओ आज अगदी मोबाईलमध्येही आहे. प्रवासातही तो मनोरंजन (Entertainment) करतो. माझ्या शहरातून हिंडण्याच्या आठवणीही याच्याशी निगडीत आहेत. रेड एफएम-बीग एफएम-मिर्ची म्हटलं की पुण्याचे (Pune) कानेकोपरे आठवतात, विविधभारती-रेडिओसिटी म्हटलं की, नाशिकचा (Nashik) गंध जाणवतो तर एफएम गोल्ड-इश्क एफएम-फिवर यासोबत वारेमाप वाहिन्या म्हटलं की मुंबईची (Mumbai)उब जाणवते. पेनड्राईव्ह घरी राहिला किंवा डिटेक्ट नाही झाला की प्रवास सुंदर करण्याची जबाबदारी एफएमची (FM). एफएम बोले तो रेडिओसिटी-मिर्ची सुननेवाले अल्वेज खुश-रग रग में रग रग में-ब्ला ब्ला ब्ला हे सारं म्हणजे मनोरंजनाचा निव्वळ कहर.

Edwin Howard Armstrong
एक हात गमावलेल्या टेनिसपटूची प्रेरणादायी कहाणी;पाहा व्हिडिओ

आज या एफएमची (FM) गोष्ट सांगतो. न्युयॉर्कमधल्या चेल्सियावासी जॉन आणि एमिली या मध्यमवर्गीय धार्मिक दाम्पत्याच्या घरी तो जन्माला आला. तिन्ही लेकरांमधला तो सगळ्यात थोरला. वयाच्या आठव्या वर्षी त्याला मज्जाविकारानं घेरले, यामुळे त्याला समवयस्क मुलांसारखे शाळेत जाऊन शालेय शिक्षण (School education)घेता आलं नाही. त्याची घरीच शिकवणी होत असे. शाळेत जात नसल्याने त्याला वेळ बराच मिळायचा. गडी बसल्या बसल्या एकामागून एक पुस्तकांचा फडशा पाडे. विज्ञान विषयक पुस्तकांसोबतच त्याच्या वाचनाचा परिघ दिवसेंदिवस विस्तारत होता. एकेक नवनवीन माहिती-ज्ञानाचा खजिना तो वाचून अक्षरश: भारावूनच जात असे. मायकेल फॅरेडे-गुग्लिएल्मो मार्कोनी या लोकांबद्दल त्याला विशेष आदर वाटू लागला. मग सुरू झाले प्रयोग. त्यानं बिनतारी संदेशांच्या बाबतीतले प्रयोग अर्थातच घरातूनच सुरू केले आणि सोबत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला.

याच कालावधीत मार्कोनी (Marconi) आणि फेसेन्डेन (Fessenden)यांनी आपल्या बिनतारी लहरींच्या माध्यमातून होणारी संदेश आणि आवाज यांची करामत दाखवली. ‘वायरलेस’ या शब्दाची जागा आता ‘रेडिओ’अर्थात लॅटिन भाषेतला ‘प्रकाशकिरण’या शब्दानं घेतली. कोलंबियामध्ये ‘प्युपिन’नावाच्या एका नावाजलेल्या प्राध्यापकाकडून त्याला बरंच काही शिकायला मिळालं. तो शिकत-वाचत-खटाटोप करत राहिला. असंच घरी काहीतरी खुडबूड करत असतांना त्याला त्यानं बनवलेल्या उपकरणाद्वारे अचानक दूरवरच्या रेडिओ स्टेशनचे कार्यक्रम एकदम स्पष्टपणे ऐकायला आले. त्यानं आनंदानं झोपी गेलेल्या बहिणीला उठवून ते प्रक्षेपण ऐकवलं. त्यानं केलेल्या खटाटोपातून शोध तर लागला होता पण भाऊ अत्यंत सावध होता. कुणी नोंदी वाचेल म्हणून हा मनुष्य काही लिहूनही ठेवत नसे. त्याला आधी या संशोधनाचं पेटंट घ्यायचं होतं पण पैसे आणायचे कुठून? तब्बल १५० डॉलर्स लागणार होते आणि त्याला माहित होतं ‘अब्बा नहीं मानेंगे’ अन् झालंही तसंच वडिलांनी स्पष्ट ‘पैसे नाहीत’ म्हणून सांगितलं.

त्याच दरम्यान जुगाड सुरू होता पण ‘चतुर रामलिंगम’सगळीकडेच असतात. दुसऱ्यानंच त्याच्या या उपकरणाचं पेटंट मिळवलं. हा त्याच्याशी भांडलाही पण वेळ निघून गेली होती. गुरूदेव मायकेल फॅरेडे यांच्यासारखं यालाही केवळ गणिती समीकरणात रस नव्हता. थेट प्रयोग करणं यासारखी एक्सायटिंग गोष्ट (Exciting thing) नाही पण याच्याकडं फॅरेडेप्रमाणं लेखनाची शिस्त नव्हती. रडत रखडत कसं तरी हा संशोधनाविषयीचे अहवाल लिहायचा. त्यानं डेव्हिड सारनॉफच्या मदतीनं अनेक संशोधनं केली. या दोघांनी मिळून ‘पोर्टेबल’ (Portable) रेडिओ बनवला. दरम्यानच्या काळात त्यांची सचिव असलेल्या मुलीशी त्याचं सुत जुळलं अन् तो तिच्यासोबत विवाहबद्धही झाला. बायकोशी झालेल्या चर्चेनंतर त्यानं पुन्हा पेटंटसाठी लढा सुरू केला. तोंडी असल्या तरी यांच्या नोंदी जुळत होत्या तर समोरच्याकडे लेखी नोंदणी असूनही त्या उपकरणाच्या संशोधनाशी जुळत नव्हत्या. तो केस जिंकला. निकाल त्याच्या बाजूनं लागला.

Edwin Howard Armstrong
JRD Tata : टाटा मीठापासून ते टायटनपर्यंत इंडस्ट्रीज उभ्या करणाऱ्या जेआरडींची कहाणी

समोरचा या केसमध्ये जवळपास कर्जबाजारी झाला. त्याला माफ करून पेटंट घ्यावं किंवा पैश्याच्या रुपात परतावा (Refund) मिळावा हे दोन पर्याय असतांना यानं काय करावं? यानं सगळ्यांना दिसावं म्हणून घराच्या गच्चीवर चक्क पेटंट क्रमांक लिहिलेला झेंडा लावला. झालं, प्रतिस्पर्धी भडकला.’हम तो डुबे, अब तुमको भी ले डुबेंगे सनम’ म्हणत, त्यांनी उच्चन्यायालयात दावा ठोकला. इथं काय व्हावं? एक दिनमें हालात बदल गए, जिन्दगी बदल गयी, ओ भईऽऽ. निर्णय याच्या विरोधात गेला. प्रतिस्पर्धी जिंकले. बाजी पलटली. आता यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. इथं तारीख पे तारीख मिलती रहीं लेकीन जजसाब इन्साफ नहीं मिला. खटला तब्बल १० वर्षे चालला अन् तो हरलाही. तो नैराश्याच्या गर्तेत गेला अन् त्यानं ‘इन्स्टिट्यूट ऑॅफ रेडिओ इंजिनियर्स’नं त्याला दिलेलं मानाचं सुवर्णपदक त्यांना एका जाहीर कार्यक्रमात परत केलं. संस्थेनं ‘पुरस्कार वापसी’नाकारली. समारंभासाठी आलेल्या हजारो अभियंत्यांनी त्याला स्टॅंडिंग ओव्हेशन दिलं.

खटला हरला तरी पठ्ठ्यानं धीर सोडला नाही. त्या काळात रेडिओवरचे कार्यक्रम फक्त ‘एएम’म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन या तंत्रावर चालायचे. आवाजात खरखरही प्रचंड ऐकू यायची, तशी आजही येते. यावर उपाय शोधण्याविषयी त्यानं संशोधन सुरू केलं. त्यानं बरंचसं चिंतन केलं त्यातून एक गोष्ट लक्ष्यात आली की वेगवेगळे कार्यक्रम निरनिराळ्या ‘फ्रिक्वेन्सी’ वरून पाठवता येतील. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती वेळा बिनतारी लहर वर-खाली होते तो आकडा.

उदा.हा आकडा साधारण ३०० ते ३३० असेल तर आपल्या कानांना या पट्ट्यांमधल्या लहरींचा आवाज ऐकू येतो. तो आकडा हेन्रिटझ हटर्झच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘हटर्झ’मध्ये मोजतात. मग अशा उपलब्ध असलेल्या सगळ्या आवाजांच्या लहरींच्या पट्ट्यांचे छोटे छोटे विभाग करून त्या प्रत्येक विभागातून वेगळा कार्यक्रम प्रसारित केला तर? मग आपल्या घरातल्या रेडिओचं बटण फिरवून आपण त्यातल्या हव्या त्या फ्रिक्वेन्सीवरचा कार्यक्रम निवडू शकू अशी ही कल्पना त्याच्या डोक्यात आली.

Edwin Howard Armstrong
अणु संरचनेचा शोध लावणारे भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर यांची कहाणी

सुरुवातीला सगळे या कल्पनेला हसले, काहींनी हरलेल्या खटल्यामुळे 'गडी सटकलाय' अशी अटकळही बांधली. पण त्यानं जिद्दीनं याच कल्पनेचा पाठपुरावा केला आणि ‘एफएम रेडिओ’ला जन्म दिला. १९३५ साली त्यानं जेव्हा लोकांना प्रात्यक्षिक दिलं तेव्हा एएम रेडिओच्या तुलनेत याचा एफएम खूप स्पष्ट ऐकू येत असल्यामुळे पब्लिक वेडी झाली. यानंतर त्यानं ‘एफएम’ तंत्रावर बरंच काम केलं, ज्यासाठी त्याला अनेक मानसन्मानही मिळाले. पण पेटंट्सवरून चालणाऱ्या कोर्टकचेरीतून त्याची सुटका झाली नाही. सच्च्या-प्रामाणिक माणसाला भौतिक गोष्टींत फारसा रस नसतो. मात्र कामाची एक ‘नशा’असते, ज्यामुळे आजुबाजूची अनेक लोकं कळत नकळत दुखावली जातात, त्यामुळे अनेकांशी त्याचं न्यायालयात जाऊन धडकावं इतकं वाजलं.

डोक्यात संशोधन-विचार त्यात कोर्टकचेऱ्या-वकिल-पैसे हळूहळू तो नैराश्याच्या गर्तेत फसत गेला आणि एक दिवस नेहमीप्रमाणे कोर्टात जात असतांना त्याने छानपैकी कोट-हॅट हा आपला पेहराव केला. आदल्या रात्री लिहिलेली दोन पानी चिठ्ठी खिश्यात ठेवली आणि तळमजल्यावर जाण्याऐवजी तेराव्या मजल्यावर जाऊन स्वत:ला झोकून दिलं. त्यानं आत्महत्या केली. स्वत:ला कायमचं संपवलं. त्याच्या बायकोनं त्याच्या पश्चात न्यायालयीन लढा सुरू ठेवला अन् शेवटी निकाल त्याच्या बाजूनं लागला. पण तो गेला होता. आता जगभरात खाजगी एफएम वाहिन्यांचं प्रचंड मोठं जाळं पसरलंय. तंत्र-मंत्र सगळं बदललं तरी ‘एफएम’ दिवसातून एकदा कुठंतरी भेटतोच. एफएमचा बुद्धिमान जनक एडविन हॉवर्ड आर्मस्ट्रॉंग (Edwin Howard Armstrong) यांचा आज जन्मदिन त्यांना विनम्र अभिवादन !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()