अणुभट्टीच्या जन्मदात्याची, आण्विक युगाच्या शिल्पकाराची कहाणी

दुसऱ्या जागतिक महायुद्धात पहिल्या अणुबॉम्ब निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली
Enrico Fermi
Enrico Fermiesakal
Updated on
Summary

दुसऱ्या जागतिक महायुद्धात पहिल्या अणुबॉम्ब निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

विज्ञानविश्वात आजवर अनेकोत्तम संशोधक होऊन गेलेत. न्युटन, आईन्स्टाईन यांच्यासारखे सैध्दांतिक पातळीवर अलौकिक बौद्धिक क्षमता असलेले प्रज्ञावंत होऊन गेलेत. तसेच फॅरेडे, रदरफर्ड यांच्यासारख्या प्रयोगवादी मंडळींनीही इथे आपला अमीट असा ठसा उमटवला. यातील काही मोजके मंडळी मात्र सैद्धांतिक आणि प्रायोगिक दोन्हीही पातळीवर तितकेच रमले. आज याच श्रेणीतल्या एका संशोधकाची गोष्ट सांगतो. गोष्ट आहे अणुभट्टीच्या जन्मदात्याची-आण्विक युगाच्या शिल्पकाराची एनरिको फर्नींची (Enrico Fermi).

इटलीची राजधानी रोम इथे रेल्वे मंत्रालयातील कर्मचारी अल्बर्टो आणि प्राथमिक शिक्षिका आयडा या दाम्पत्याच्या पोटी एनरिकोंचा जन्म झाला. थोरला भाऊ ग्युलियो आणि बहिण मारिया यांच्या सोबतीने त्यांचे बालपण तसे छानपैकी मजेत चालले होते. ग्युलियोच्या नादाने यांनाही मोटर-विद्युत उपकरणे-मेकॅनिकल खेळणी यांचा नाद लागला होता. तिघे भावंडे दिवसभर ‘हे बनव ते बनव’यात गुंतून जात. रुढार्थानं धार्मिक नसले तरी आजी आजोबांच्या आग्रहाखातर त्यांचा बाप्तिस्माही झाला. सगळे काही सुरळीत चालू असताना घश्याला संसर्ग झाल्याचे निमित्त झाले आणि या शस्त्रक्रियेदरम्यान थोरला भाऊ ग्युलिओ दगावला.

Enrico Fermi
JRD Tata : टाटा मीठापासून ते टायटनपर्यंत इंडस्ट्रीज उभ्या करणाऱ्या जेआरडींची कहाणी

या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. जणु काही सगळे जगच उध्वस्त झाले. कश्यातच मन रमेना. ‘दिवसभर शुन्यात बघत बसणे’हाच दिनक्रम झाला. शेवटी यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी अनेकविध पुस्तके आणून देत त्यांना वाचनासाठी उद्युक्त केले आणि हळूहळू का होईना पुस्तकांशी त्याची गट्टी जमत गेली, त्याचं मन थोडं थोडं रमू लागले. भौतिकशास्त्राच्या काही पुस्तकांनी तर त्यांना अक्षरश झपाटून टाकले. स्थानिक शाळेत शालेय शिक्षण पुर्ण करत असताना मानाची शिष्यवृत्ती पटकावत त्यांनी ‘पिसा’विद्यापीठात प्रवेश मिळवला आणि तिथून ते भैतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवूनच बाहेर पडले.

चारेक वर्षातच सांख्यिकीय नियम मांडत त्यांनी सांख्यिकीय यांत्रिकी या विषयात मुलभूत असे योगदान दिले. “कुठल्याही परमाणुत उपस्थित दोन इलेक्ट्रॉनच्या चारही क्वांटम संख्या एकसमान नसते” या पॉलीच्या अपवर्जित सिद्धांताला गती आणि उर्जेच्या परिक्षेपात मांडून त्यांनी ‘प्रायोगिक’ पातळीवर आणून ठेवले. सोबतच विद्युतगतीविज्ञानातल्या समस्यांवर काम करताना किरणांची गती अभ्यासत निव्वळ प्रायोगिक पातळीवर सुरू असणाऱ्या अनेक प्रयोगांची ‘सैद्धांतिक’ मांडणी केली. न्युट्रॉनद्वारे किरणोत्सर्ग प्रेरित करत असताना त्यांना आढळले की, आण्विक केंद्र संथ न्युट्रॉन सहजपणे पकडतात.

संथ न्युट्रॉन असलेल्या थोरियम आणि युरेनियम यांचा भडिमार करत नवीन घटक मिळवून त्यांनी एक नवीन समीकरणच रुढ केले. एका बाजूला सखोल सैद्धांतिक अभ्यासातून थेट प्रयोगाकडे आणि दुसरीकडे सरळ प्रयोग करून सिद्धांत मांडण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे १९३८ ला ”न्युट्रानच्या विकिरणामुळे नवनवे किरणोत्सारी घटक निर्माण होतात. हे जेव्हा सप्रयोग-सप्रमाण साध्य करण्यासाठी” त्यांना भौतिकशास्त्रातल्या या भरिव योगदानाबद्दल ‘नोबेल’ जाहिर झाला.

Enrico Fermi
भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची कहाणी

दुसऱ्या जागतिक महायुद्धात पहिल्या अणुबॉम्ब निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि मॅनहॅटन प्रकल्पात मोठमोठ्या भौतिकशास्रज्ञांचे नेतृत्वही केले. सोविएतनं जेव्हा बॉम्बचा सगळे हस्ते वापर सुरू केला. तेव्हा मात्र त्यांनी एकुणच बॉम्बनिर्मितीवर नैतिक आणि तात्विक प्रश्न उपस्थित केले. उत्कृष्ट संशोधक असण्यासोबतच ते तितकेच उत्कृष्ठ शिक्षकही होते. गणित, भौतिकशास्त्र आणि मेकॅनिक्स हे विषय शिकवण्यासाठी तर ते अर्ध्या रात्री तयार असत.

फ्लोरेन्स विद्यापीठात त्यांनी काही काळ अध्यापन केले. रोम विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्र, कोलम्बिया विद्यापीठाच भौतिकशास्त्र शिकवताना ‘नोबेल’सोबत त्यांना फ्रॅंकलिन, ह्युजेस, मॅक्स प्लॅन्क या पदकांसोबत इतरही अनेक मानसन्मान मिळाले. त्यांचे संपुर्ण आयुष्य भौतिकशास्त्राला समर्पित होते.

अगदी आयुष्याच्या मावळतीलाही त्यांनी यातून क्षणभर उसंत घेतली नाही. किंबहुना या कालावधीत स्वत:ला वैश्विक किरणांच्या रहस्यमय उगमाच्या अभ्यासात स्वत:ला झोकून दिले. आपल्या अचुक अंतप्रेरणेने केलेल्या संशोधनामुळे त्यांनी विज्ञानविश्वाचा चेहरामोहराच बदलवून टाकला. प्रचंड नरसंहार करणारी शस्त्रास्त्रे बनली तसे जीवनावश्यक वैद्यकिय संशोधनही शक्य झाले. विज्ञान हे राजकारण आणि समाजकारण यांच्याशी अजूनच घट्ट जोडले गेले. सैंद्घांतिक आणि प्रायोगिक भौतिकशास्रावर लिहिलेली त्याची संख्यअसंख्य पुस्तके आजही विज्ञानविश्वातल्या वाटसरुंसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतात. १९४२ ला आजच्याच दिवशी एनरिको फर्नी यांनी शिकागो विद्यापीठात जगातला पहिला कृत्रिम आण्विक साखळीचा यशस्वी प्रयोग करत आधुनिक आण्विक युगाची दारं उघडली होती त्या निमित्ताने सहज!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.