जगाला बास्किन रॉबिन्स देणारा आईस्क्रीम निर्माता 'आयर्विन रॉबिन्स' यांची कहाणी

आज या जोडगोळीतील आयर्विन रॉबिन्स यांच्या जन्मदिनी सहजच!
Irvine Robbins
Irvine Robbinsesakal
Updated on
Summary

आज या जोडगोळीतील आयर्विन रॉबिन्स यांच्या जन्मदिनी सहजच!

मानवी इतिहास जितका जुना तितकाच मानवाच्या प्रयोगांचा इतिहास. प्रयोग दरवेळी प्रयोगशाळेतच होतात असे नाही किंबहुना अख्खं जगच एक मोठ्ठी प्रयोगशाळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विज्ञानविश्वातल्या संख्य असंख्य संशोधक-वैज्ञानिक मंडळींनी आपलं जीवन जितकं सहजसोपं केलं तितकंच एक ना अनेक प्रयोगशील लोकांनी ते मजेशीरही केलं. आता हेच बघा ना ऋतू कुठलाही असो आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते म्हणजे होते. मोजकेच मंडळी असतील जे आईस्क्रीमला पहिल्या झटक्यात नाही म्हणतील. चला आज आईस्क्रीमचीच गोष्ट सांगतो.

आईस्क्रीमला शंभर दोनशे नव्हे हजारो वर्षांचा मोठ्ठा इतिहास आहे. आईस्क्रीमची पहिली नोंद सीरियातल्या ख्रिस्तपुर्व १७८० ला एका भित्तीशिल्पावर प्राचीन लिपीत केलेली आढळते. या नोंदीनुसार मारीच्या राजानं थेट बर्फ साठवण्यासाठी गोदाम बनवलं होते. जिथे डोंगरावरून आणून बर्फ साठवला जाई.

इराणमध्येही ख्रिस्तपुर्व ५००ला थंडीत तेथील स्थानिक बर्फाचा साठा करत अशी नोंद आढळते ज्यांना ते ‘यख्चल’ असे संबोधते. इराणी भाषेत यख म्हणजे बर्फ आणि चल म्हणजे खड्डा. ते या बर्फाला वर्षभर पुरवत आणि द्राक्षाच्या रसासोबत ते खात.

Irvine Robbins
अणुभट्टीच्या जन्मदात्याची, आण्विक युगाच्या शिल्पकाराची कहाणी

जगज्जेता सिकंदर आणि निरो हे मंडळीही आईस्क्रीमचे चाहते होते. सिकंदर मध आणि फुलांच्या पाकळ्यांचा अर्क यांच्यापासून बनवलेले आईस्क्रीम खात असे तर फ्रेंच शासक निरोला फळांच्या रसाचे आईस्क्रीम भयंकर आवडायचे. सहाव्या शतकात चिनी राजा तेंग याने आईस्क्रीमध्ये दुधाचा पहिल्यांदा वापर केला.

या पठ्ठ्याने आपल्या मुदपाकखान्यात ९० लोकं फक्त आईस्क्रीम बनवायला ठेवले होते. चिनमध्येच राजकुमार झांगहुयीच्या थडग्याजवळील एका भित्तीचित्रात काही महिला आईस्क्रीम खातांना रंगवल्यायेत. सुप्रसिद्ध इटालियन व्यापारी मार्को पोलोने बाराव्या शतकात आईस्क्रीमची पाककृती पुर्वेकडून पश्चिमेकडे नेली.

इ.स.१५३३ ला इटलीची राजकन्या फ्रेंच राजकुमार दुसऱ्या हेनरीसोबत विवाहबद्ध झाली आणि सोबत माहेरून काही खानसामेही घेऊन गेली. जे बर्फाच्या विविध पाककृती अर्थात आईस्क्रीम बनवत. १६६० ला पॅरिसच्या एका कॅफेनं दुध-साय-दही-अंडी यांच्यापासून बनवलेले आईस्क्रीम प्रचलित केलं.

ब्रिटिश शासक दुसऱ्या चार्ल्सनं एकदा आईस्क्रीम चाखलं आणि तो या पदार्थाच्या प्रेमातच पडला. त्याने हे बनवणाऱ्या स्वयंपाकास याची पाककृती गुप्त ठेवण्याचा मोबदला म्हणून आजन्म सेवानिवृत्ती वेतन अर्थात पेन्शन लागू केली. १७४४ ला ऑक्सफोर्डच्या इंग्रजी शब्दकोषात आईस्क्रीम हा शब्द पहिल्यांदा प्रकाशित झाला.

Irvine Robbins
JRD Tata : टाटा मीठापासून ते टायटनपर्यंत इंडस्ट्रीज उभ्या करणाऱ्या जेआरडींची कहाणी

इंग्लंडहून क्वेकर चळवळीदरम्यान अमेरिकेत जाऊन पोहोचलेल्या मंडळींनी सोबत आईस्क्रीमही नेले. अंकल सॅमनं तिथे नेलेल्या या पदार्थाची चव हळूहळू अमेरिकेने मंडळींच्याही जिभेवर रेंगाळली. बेंजामिन फ्रॅंकलिन-जॉर्ज वाशिंगटन-थॉमस जेफरसन यांसारखे दिग्गजही आईस्क्रीमचे चाहते झाले. १८५१ ला बर्फांची गोदाम ‘उष्णतारोधक’ बनली तसे आईस्क्रीमचं उत्पादनही प्रचंड वाढले. अमेरिकेतील बाल्टिमोरचा दूग्ध व्यापारी जेकब फसेल याने मोठ्या प्रमाणात आईस्क्रीमचे उत्पादन सुरू केले तसे ते सर्वसामान्यांपर्यंतही पोहोचले. इंग्लंडच्या ॲग्नेस मार्शलने इ.स.१८८५ ते १८९४ या कालावधीत आईस्क्रीम या विषयावर एक दोन नाही तब्बल चार पुस्तकं लिहिली ज्यांची विक्रमी विक्री झाली. यात जेकबने आईस्क्रीम बनवतांना लिक्विड नायट्रोजन वापरण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

१८७४ ला रॉबर्ट ग्रिन याने ‘आईस्क्रीम सोडा’ ही नवी रेसिपी शोधून काढली आणि विसावं शतक उजाडेपर्यंत बाजारात ‘आईस्क्रीम संडे’आलं.

आता यात फळं आणि सुकामेवाही मिसळता येऊ लागला. १९०४ ला भरलेल्या ‘सेंट लुईस’ जागतिक महोत्सवात सिरियन विक्रेता अर्नेस्ट हॅम्वी पापडीत घालून पेस्ट्री विकत होता आणि आईस्क्रीमचे कप संपल्याने त्याने एकाला त्याच पापडीचा कोन बनवून दिला आणि तयार झाला आईस्क्रीम कोन.

Irvine Robbins
भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची कहाणी

विसाव्या शतकाच्या मध्यावधीत रेफ्रीजरेशनचं तंत्रज्ञान आले, तसे मनामनातील आईस्क्रीम घराघरात पोहोचले. जगभर अनेक ब्रॅंड्स विकसित झाले यातीलच एक आघाडीचं नाव म्हणजे ‘बास्किन्स-रॉबिन्स’ बास्किन आणि रॉबिन्स नावाचे दोन आईस्क्रीमवेडे एकत्र आले आणि हा उद्योग उभा राहिला असं नाही.

तुम्ही कोरी, क्युरी या दाम्पत्यांच्या गोष्टी वाचल्यात, ॲडिडास आणि प्युमा या श्यु ब्रॅंड्सचे मालक बंधुद्वयी रुडी-एडिची गोष्ट वाचली, गूगल-याहू बनवणाऱ्या मित्रांच्या गोष्टी वाचल्या पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल ‘बास्किन-रॉबिन्स’ चक्क ‘जिजा-साला’ होते. बहुतांश वेळा ढोबळ मानपान किंवा फारसं न पटणाऱ्या या नात्यात फारसं काही सकारात्मक निष्पन्न होत नसतांना बर्टन बास्किन आणि आयर्विन रॉबिन्स या दोघांनी मात्र सगळे समज खोटे ठरवत आपल्या जोडगोळीचं नाव अजरामर केलं. रॉबिन्स हा एका दुग्धव्यावसायिकाचा मुलगा शाळा सांभाळून अधूनमधून आपल्या कुटूंबाच्या आईस्क्रीमच्या व्यवसायाला हातभार लावायचा.

दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान तो सैन्यात दाखल झाला आणि युद्ध संपल्यावर त्यानं कॅलिफोर्नियातील ग्लेंडेल इथं ‘स्नोबर्ड’ नावाचे आईस्क्रीमचे दुकान सुरू केले. दरम्यानच्या काळात त्याची बहिण ‘शर्ली’ हिचं बास्किनशी लग्न झाले. याच्याही डोक्यात आईस्क्रीमचेच खुळ होते, त्याने पॅसाडेनात रॉबिन्सच्या दुकानाची शाखा उघडली. सगळे आलबेल होते पण मेहनत वाटली जात होती-पैसे वाटले जात होते अन् अजून मोठं व्हायचं तर काहीतरी ‘वेगळं’ करणं आवश्यक होते. हे ‘वेगळं’ असणंच मुख्य अडसर आहे, यावर एकमताने शिक्कामोर्तब करत दोघांनी एकत्र यायचे ठरवले आणि आपल्या दुकानांचे ‘एकीकरण’ केले.

Irvine Robbins
जेनेटिक कोडवर विशेष संशोधन करणाऱ्या 'डॉ. हरगोविंद खुराणा' यांची कहाणी

आता प्रश्न उभा ठाकला नाव काय द्यावं? आपलंच देऊया, पण कुणाचं आधी असावं? या बहाद्दरांनी चक्क ‘नाणेफेक’ केली, त्यात बास्किन जिंकला आणि जन्माला आले ‘बास्किन-रॉबिन्स’रेस्ट इज हिस्ट्री. बास्किन-रॉबिन्समधलं B-R यातील अर्धं Bअर्थात 3 आणि Rची दांडी । ‘गुलाबी’ ठेवत त्यांनी नावातूनच “आम्ही ‘31’ फ्लेवर पुरवतो” अशी जाहिरात केली असली तरी प्रत्यक्ष फ्लेवरची संख्या हजारात आहे. एकदा या दोघांच्या बायकांनी आईस्क्रीममध्ये बदाम साखर आणि वरून कॅरामेल टाकून बघितलं ज्याची चव भन्नाट जमून आली आणि जन्म झाला एका वेगळ्याच फ्लेवरचा आणि वेगवेगळ्या संयोजनात्मक प्रयोगांचा. एकानं त्यांचा हा प्रयोग चाखून बघत तो वापरला अन् जोरदार आईस्क्रीम विक्री सुरू केली, पण यांना कळताच यांनी थेट त्याच्यावर खटलाच भरला. यांच्याशी पंगा घेणं त्याला भयंकर महागात पडलं. या द्वयीचे प्रयोग अविरत सुरू होते. वेगवेगळी चव चाखू इच्छिणाऱ्या चोखंदळ ग्राहकांसाठी त्यांनी प्लॅस्टिकच्या छोट्याश्या ‘गुलाबी’ चमचाची योजना केली, यामुळे आईस्क्रीम क्लासकडून मासपर्यंत पोहोचले. ही कल्पना भन्नाट यशस्वी झाली ग्राहकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

एकट्या अमेरिकेत त्यांच्या अडिच हजार आणि जगभरात इतरत्र जवळपास आठेक हजार शाखा आहेत. ग्राहकाची मागणी-कालानुरूप बदल-सातत्यानं प्रयोग यामुळे त्यांनी आपले नाव आजही टिकवून ठेवण्यात यश मिळवलेय. न्युयॉर्क शाखेतल्या त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या नावे एका मिनिटात सर्वाधिक वेगवान आणि तीन हजाराहून अधिक स्कूप भरण्याचा गिनेस विश्वविक्रम आहे. बहुतेक वेळी विशेषत: नात्यात व्यवसाय वाढला-उत्पन्न वाढलं की हेवेदावे सुरू होत वाटा वेगवेगळ्या होतात, पण देशाच्या सीमा ओलांडत आंतरराष्ट्रीय यश मिळवलं तरी ‘बास्किन-रॉबिन्स’ची युती आजही अभेद्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()