अणु संरचनेचा शोध लावणारे भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर यांची कहाणी

संशोधनाबद्दल तब्बल ९ वर्षांनी का होईना त्याला थेट ‘नोबेल’ मिळाला
Niels Bohr
Niels Bohr esakal
Updated on
Summary

आज नील्स बोहर यांचा स्मृतीदिन असल्यामुळे त्यांना विनम्र अभिवादन

Summary

आज विज्ञानविश्वात आईन्स्टाईनच्या खालोखाल सगळ्यात मोठं नाव असलेल्या एका शास्त्रज्ञाची गोष्ट सांगतो. त्याचा जन्म ‘कोपनहेगन’ इथं एका उच्चविद्याविभुषित कुटूंबात झाला. व्याकरणाचे प्राध्यापक असलेले आजोबा आणि शरीरक्रियाशास्राचे प्राध्यापक असलेले बाबा यांच्या छत्रछायेत ज्ञान-विज्ञानाचं बाळकडू त्याला आपसुकच मिळाले होते, परंतु बुद्धिमान असण्यासोबतच तो संवेदनशिल-मनमिळाऊ आणि प्रचंड बोलक्या स्वभावाचा होता. थोरली बहिण जेनी आणि धाकटा भाऊ हराल्ड यांच्या सानिध्यात त्याचं बालपण सर्वसामान्य मुलांप्रमाणेच मजेत चालले असताना त्यांच्या बाबांकडे येणाऱ्या प्रज्ञावंतांच्या चर्चा ऐकणे ते गेल्यानंतर त्यावर काथ्याकूट करणे या तिकडीचा आवडीचा दैनंदिन छंद झाला होता.

Niels Bohr
सॅक्सोफोनची निर्मिती करणाऱ्या 'अडॉल्फ सॅक्स' यांची कहाणी

विशेषत: आपल्याकडे अनेकदा “मोठी माणसं बोलत असली की बोलू नये, लहानांनी तिथं थांबू नये” याकडे कटाक्ष असतो पण यांच्या घरी असं नव्हते. या मुलांना ही सगळी चर्चा ऐकण्याची मोकळीक होती. आठवड्याकाठी फुटबॉल खेळणे-उन्हाळ्याच्या सुटीत आजी आजोबांसोबत गावाला जाणे-विविध विषयांचं वाचन करणं-त्यावर गप्पा मारणे असे सारे त्यांचे बालपण खऱ्या अर्थानं श्रीमंत होते. भावंडांपेक्षा याला मात्र एक वेगळी खोड होती. वस्तूंना हात लावून बघणं-त्या कश्या काम करतात याचा कार्यकारणभाव शोधणं हे त्याच्या आवडीचे छंद. लाकूड आणि लोखंड ही त्याची आवडती खेळणी. घरी बसल्या बसल्या अनेक वेळा त्याचं सुतारकाम आणि लोहारकाम एकत्र सुरू असायचे.

Niels Bohr
जेनेटिक कोडवर विशेष संशोधन करणाऱ्या 'डॉ. हरगोविंद खुराणा' यांची कहाणी

या त्याच्या उद्योगाने एक मात्र झालं हळूहळू का होईना तो तंत्रकुशल होत गेला. घरच्यांची घड्याळं दुरूस्त करणे सायकल रिपेअर करणे या सगळ्या उद्योगात अनेकदा ‘करायला गेला गणपती झाला मारुती’असंही व्हायचं. बाकी मंडळी त्याच्याबद्दल तक्रार करायचे पण त्याचे बाबा मात्र तक्रारकर्त्यालाच दाटवायचे, "या मुलाला माहितेय तो काय करतोय, त्याला जे हवं के करू द्या बरं". वयाच्या सातव्या वर्षी गॅमलहोमच्या लॅटीन शाळेत तो दाखल झाला. नवीन शैक्षणिक धोरण येण्यापुर्वीचा त्याचा शेवटचा वर्ग. शाळेतलं वातावरण औपचारिक आणि शिस्तबद्ध असलं तरी त्याला काही अडचण नव्हती. तसंही पुस्तकापलिकडचं जग तो घरी समजावून घेतच होता.

वर्गात सगळ्या विषयात अव्वल, प्रत्येक परिक्षेत पहिला क्रमांक असला तरी ‘हस्ताक्षर आणि भाषा’ या प्रांतात त्याचा अंमळ गोंधळ होता. ‘हे त्याचं अपयश होतं-शिक्षकांचं होतं की शिक्षणव्यवस्थेचं होतं?’ ठाऊक नाही पण निबंध-वर्णनात्मक गोष्टी लिहिण्यात त्याची तारांबळ उडायची अनेकदा लिहिलेला मजकुर विनोदीही वाटायचा. एकदा परिक्षेत ‘माझी सहल’ या निबंधात त्यानं ‘मी आणि माझा भाऊ बंदरावर चालत गेलो तिथं आम्ही काही जहाज बघितले आणि आम्ही घरी परतलो” झालं. संपला निबंध. गुण तर मिळालेच नाहीत ‘हा तुझा निबंध?’ म्हणत शिक्षकही तापले. ‘अजून काय पाहिजे?’ काय चुकलं? याला अजूनही उमगेना. असंच एकदा परिक्षेत एक प्रश्न आला, "नैसर्गिक बलाचा घरगुती वापर लिहा" यानं काय उत्तर लिहावं?, "नैसर्गिक बल घरात वापरता येत नाही" शिक्षकानं पुन्हा एकदा कपाळावर हात मारून घेतला.

Niels Bohr
'एक्स-रे' चा शोध लावणाऱ्या विल्यम रॉंटजेन यांची कहाणी

वरच्या वर्गात गेल्यानंतर गणित-भौतिकशास्त्र हे विषय जसे अभ्यासात आले, तशी याची बौद्धिक चमक अजूनच उजळून निघाली. पुस्तकात नसलेलं-परीक्षेत विचारलं न जाणारं ज्ञान तो अवांतर वाचनातून-प्रयोगातून मिळवू लागला. त्याला टाचण काढायची सवय जडली. खाजगी चर्चेत मित्रांशी बोलतांना तो पुस्तकातल्याही चुका सांगायचा. ‘बरं यावर परिक्षेत काही विचारलं तर रे?’ कुणी तरी त्याला हळूच विचारायचं “ते तसं नाहीये असं आहे” असं लिहिन तो शांतपणं उत्तर द्यायचा. अर्थात गुण तर मिळायचे नाही पण हा गडी “माझं काय चूकलं” म्हणत शिक्षकांना भंडावून सोडायचा. एकदा तर तोंडी परिक्षेत उत्तर द्यायला सहा मिनिटांचा अवधी असतांना पठ्ठ्या त्यातली पाच मिनिटं विचार करत बसला आणि वेळ संपत आल्यानंतर “या प्रश्नाची उकल अनेक तर्‍हेनं करता येईल पण नक्की कोणती पद्धत अवलंबावी यावर विचार करतोय” एवढंच बोलला.

‘हा मंदये की हुशार?’ शिक्षक द्विधा झाले तितक्यात त्यानं एका पाठोपाठ एक अश्या अनेक खोलवर आणि शास्त्रशुद्ध पद्धती सांगितल्यानंतर त्याला लेखी परीक्षेत नापास करणारे शिक्षक आता मात्र बेशुद्ध व्हायचे बाकी राहिले. पुढं रुदरफोर्डनं १९११ ला आपला बुद्धीमान शिष्य हेनरी मोस्लेच्या जोडीला ‘याला’ घेत अणुरचनेचं-अणुगर्भाचं सुस्पष्ट चित्र विज्ञानविश्वात मांडले. रुदरफोर्डचं अणूविषयक केलेलं मॉडेल आणि प्लांकचं क्वांटम मॉडेल एकत्र करून ‘यानं’ नवंच सुधारीत मॉडेल विकसित करत १९१३ ला थेट अणु संरचनेच्या मुलभूत सिद्धांताचा शोध लावला. ते मॉडेल म्हणजे ‘बोहर मॉडेल’ आणि ते शोधणारा हा अवलिया म्हणजे नील्स बोहर.

Niels Bohr
'रिहॅबिलिटेशन मेडिसिन’ विकसित करणाऱ्या डॉ. रस्क यांची कहाणी

नील्सनं सांगितलेल्या अणुसिद्धांताच्या रचनेमुळे रसायनशास्त्र-विद्युतशास्त्र आणि अणुरचनेच्या मुलभूत सिद्धांतांचे प्रारंभी फारसं स्वागत झालं नसलं तरी या संशोधनाबद्दल तब्बल ९ वर्षांनी का होईना त्याला थेट ‘नोबेल’ मिळाला. एकदा एका वैज्ञानिक परिषदेत भाषण देताना कुणीतरी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्याने त्यांने काडेपेटीतील काड्या मुद्दाम खाली सांडल्या आणि त्या काड्या गोळा करता करता आठवून हसत हसत उत्तर दिलं तर एकदा एका सभेत आईन्स्टाईनविषयी बोलतांना त्याला आपले अश्रु अनावर झाले. असा हा प्रचंड बुद्धिमान आणि तितकाच संवेदनशिल वैज्ञानिक विज्ञानविश्वात कायमच उठून दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.