१९५७ ला आजच्याच दिवशी अमेरिकेतील लॅंकेस्टर इथं हॅमिल्टन वॉच कंपनीनं जगातलं पहिलं इलेक्ट्रिक घड्याळ लॉंच केलं होतं त्या निमित्तानं सहज हा आढावा!
‘नववर्ष’(New Year) परवा सुरू झालं असलं तरी: नवं वगैरे काही नसतं. सुर्याला अजून एक प्रदक्षिणा पुर्ण झाली एवढंच. माणूस इथं नव्हता तेव्हापासून पृथ्वी फिरतेय अन् यापुढं कधी नसला तरी ती अशीच फिरत असेन. हे फक्त ‘निसर्गचक्र’ बाकी माणसाच्या कल्पना. असे काही विचार ऐकण्यात आले.
तात्रिंकदृष्ट्या हे सगळं बरोबर असलं तरी जन्मलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला काळाचा केवळ एक तुकडा आलेला असतो त्यामुळे त्याला याचं थोडं गणित राखण्यासाठी कॅलेंडर-घड्याळ-नववर्ष वगैरे ही साधनं लागतात. सुरुवातीला माणसाला काळवेळाबद्दल केवळ दिवस आला गेला, रात्र आली गेली एवढीच समज होती आता तो सेकंदाच्या एका अंशाचाही विचार करु शकतो-करतो. अर्थात ही जाणीव होणं, हा सगळा प्रवास घडणं काही एकदोन दिवसात झालं नाही. लाखो वर्षे गेलीत तेव्हा कुठं माणूस आज जिथं दिसतोय तिथं येऊन पोहोचला. हे सगळं असलं तरी ‘काल' या संकल्पनेचा संपूर्ण उलगडा अद्यापही झालेला नाहीये पण हाती असणारा वेळ मात्र मर्यादित असतो, हे जेव्हा माणसाच्या लक्षात आलं तेव्हा जन्म झाला ‘घड्याळाचा’(Watch) कालमापक यंत्र अर्थात घड्याळाचा शोध इतका सहजासहजी लागला नव्हता. जळती मेणबत्ती-तेवत्या समईत उरलेलं तेल-घटिकापात्र -सरकती वाळू ते मनगटी घड्याळ (Wrist watch) अर्थात रिस्टवॉच असा हा लाखो वर्षांचा भला मोठ्ठा प्रवास आहे. चलो, आज घड्याळाचीच गोष्ट सांगतो.
इतिहासात घड्याळाच्या वापराचा उल्लेख सर्वप्रथम इ.स.पू. ३५००ला झालेला आढळतो. उन्हात पडलेल्या सावलीच्या लांबीवरून वेळ दाखवणारं हे घड्याळ भारत (India), चीन (China) आणि इजिप्तमध्ये प्रचलित होतं. इ.स.पू. ६०० ला ग्रीस इथं ‘अनाक्झीमँडर’ (Anaximander)
या संशोधकाने सावलीवरुन वेळ दाखवणारे पहिलं धातूचे घड्याळ बनवले पण या घड्याळ्याचा ड्रॉबॅक म्हणजे यात फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यानचाच वेळ कळत असे. रात्रीचं मोजमाप करण्यासाठी इ.स.पू. १५०० ला एका विशिष्ट वेगाने जळणार्या मेणबत्त्यांचा वापर केला जाऊ लागला अन् याच दरम्यान वाळूच्या घड्याळंही आली.
१५२० ला जगाला वळसा घालण्याच्या उद्देशाने निघालेल्या ‘फर्डिनांड मॅगेलान’याने आपल्या सोबत वाळूची १८ घड्याळे नेल्याची नोंद आढळते. त्यावेळी वाळूच्या घड्याळाप्रमाणे पाण्याचंही घड्याळ प्रचलित होतं. प्लेटोनं पाण्याच्या घड्याळाचा ‘अलार्म’ म्हणून वापर केला होता. इंग्लंडचा राजा किंग अल्फ्रेड पहिला याने ६ मेणबत्त्यांच्या मदतीनं २४ तास वेळ दाखवू शकेल असं एक यंत्र बनवल्याचाही उल्लेख आढळतो. या यंत्रातील प्रत्येक मेणबत्ती १२ इंच ऊंच होती आणि ही मेणबत्ती १ इंच जळण्यासाठी २० मिनिटं लागत असत. अर्थातच १ मेणबत्ती गुणिले ४ तासांचा वेळ या हिशेबाने ६ मेणबत्त्या २४ तासांचा वेळ दाखवत असत.
पहिलं यांत्रिक घड्याळ निर्माण होण्यासाठी तब्बल अकरावे शतक उजाडावे लागले. पोप सिल्व्हिस्टर दुसरा यानं दहाव्या शतकात पहिलं यांत्रिक घड्याळ बनवलं. चरखे-वजन-घंटेचा वापर करून बनवलेलं हे यांत्रिक घड्याळ जगभरात वापरले जाऊ लागले. १५९४ ला गॅलिलियोने कालमापनासाठी लंबकाचा वापर केला आणि घड्याळांच्या जगात खऱ्या अर्थानं क्रांतीची सुरवात झाली. गॅलिलियोनं “लंबकाची एक नियमित फेरी पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ हा लंबकाच्या गोळ्याचे वस्तुमान बदललं तरीही तेवढाच असतो” हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. ‘ख्रिस्तीयन हायगेन' या शास्त्रज्ञानं मात्र या सूत्राचा वापर घड्याळ बनवण्यासाठी करता येईल हे हेरलं. वर्ष होतं १६५७चे. या तत्वावर आधारित एक यांत्रिक घड्याळ त्याने बनवले. हे घड्याळ आधीच्या घड्याळांपेक्षा जास्त अचूक असलं तरीही घेऊन फिरण्यासारखं मात्र नव्हतं. १५०५ ला जर्मनीतल्या ‘पीटर हेनलेन’ या कुलूप दुरूस्त करणाऱ्या एका कारागीरानं खिश्यात बाळगता येईल असं घड्याळ अर्थात ‘पॉकेट वॉच’ बनवलं. या पॉकेट वॉचमध्ये लंबकाऐवजी बॅलन्स स्प्रिंगचा वापर केला होता. बॅलन्स स्प्रिंगचा वापर केल्याने या घड्याळाची अचूकता त्याकाळी सर्वाधिक होती त्यामुळे हे घड्याळ विशेषत: दर्यावर्दी मंडळींमधे खूपच लोकप्रिय ठरले.
याच प्रणालीचा वापर करून पुढं अधिकाधिक अचूक घड्याळे बनवली जाऊ लागली, पण या घड्याळात एक त्रुटी होती ती म्हणजे या घड्याळांना एका विशिष्ट वेळेनंतर चावी द्यावी लागायची. १७७० ला अब्राहम लुईस ब्रेग्युएट या संशोधकाने सेल्फ वाईंड होणारं पहिले घड्याळ बनवले. वीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत मनगटी घड्याळ आले पण कुणास ठाऊक कसा?कदाचित बांगड्या किंवा आभुषणांमुळे असेल मनगटी घड्याळ केवळ स्त्रियांसाठी असतात असा एक समज दृढ झाला. दरम्यान पहिल्या महायुद्धाचे पडघम वाजले आणि युरोपियन सैनिक वेळ बघताना सोयिस्कर व्हावे म्हणून खिशातील घड्याळ मनगटावर बांधू लागले आणि जगभरातील सैनिकात मनगटी घड्याळाचा वापर सोईचा असल्यानं पॉप्युलर झाला. मनगटी घड्याळ बनवण्यासाठी काचमणी अर्थात क्वार्ट्झ या पदार्थाचा वापर केला जाऊ लागला. या स्फटिकाला विद्युत प्रवाह मिळाला की तो एका विशिष्ट वारंवारतेने हालचाल करायचा आणि ही वारंवारता एका विद्युत सर्किटच्या मदतीने मोजली जायची. हेच सर्किट पुढं मोटर नियंत्रित करायची आणि मोटर पुढं घड्याळाचे काटे.
मनगटी घड्याळं हळूहळू जनसामान्यातही प्रचलित झाले. १९०८ ला रोलेक्सची सुरुवात झाली. १९२५ला पॅटेक फिलिप याने पहिले ‘कॅलेंडर’ दाखवणारं घड्याळ बनवलं. १९२७ ला रोलेक्सनं आपलं पहिलंवहिलं ‘वॉटरप्रूफ’घड्याळ बाजारात आणलं. त्यांनी एका जलतरणपटूला हातात हे घड्याळ हातात बांधून त्याला इंग्लिश खाडी पार करायला सांगत खाडी पार करून परतल्यावरही हे घड्याळ अगदी योग्यपणे काम करत असल्याचे दाखवून देत अतिशय रंजक असं मार्केटिंग तंत्र अवलंबले आणि पुढच्या चार वर्षातच म्हणजे १९३१ मध्ये त्यांनीच स्वत:चं पहिलं सेल्फ वाईंडिंग घड्याळ बाजारात आणले. १९६७ ला घड्याळांच्या इतिहासातील अचूकतेचा सगळ्यात महत्त्वपुर्ण टप्पा गाठला. सेसीयम मूलद्रव्याच्या अणुच्या ९,१९२,६३१,७७० इतक्या आंदोलनांसाठी अर्थातच ऑसिलेशन्स साठी लागणारा वेळ म्हणजे १ सेकंद हे जागतिक एकक ठरवण्यात आलं.
पुढं याच मूलद्रव्याचा वापर करून आण्विक घड्याळं तयार झाली. भारतात मनगटी घड्याळांची सुरुवात केली ती एचएमटी या ब्रँडने. १९६१ ला सुरु झालेल्या या घड्याळ कंपनीचे उद्घाटन थेट तत्कालीन भारतीय पंतप्रधानांनी केले होते. या घड्याळाने भारतीयांना वेडच लावले. नोकरीत पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे घड्याळ भेट दिलं जाऊ लागले. वरपक्ष हुंड्यात घड्याळ मागू लागला. १९८० उजाडलं तसं टायटनची घड्याळंही बाजारात आली आणि एचएमटीच्या एकाधिकारशाहीला धक्का बसला आणि या टायटनने आकर्षकतेवर भर देत भारतीय बाजारावर आपलं वर्चस्व स्थापित केलं. आता फक्त गरजेसाठी वापरल्या जात असलेल्या ‘घड्याळ’ या गोष्टीचं रुपांतर चैनीच्या वस्तूमध्ये झालं. महागडी विदेशी घड्याळं बाजारात यायला लागली. राडो-सिटीझन-फॉसिल या कंपन्यांनी आकर्षक डिझाईन्स आणत ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं.
नाजूक आणि सुंदर नक्षीकाम आणि घड्याळ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे महागडे धातू यामुळे स्वीस घड्याळं तर जगभरात सर्वाधिक लोकप्रिय ठरले. या घड्याळांची किंमत आजही जास्त असते. आताशा मनगटी घड्याळात फक्त वेळच नव्हे तर हृदयाचे ठोके-भौगोलिक स्थान-व्यायाम करताना खर्च झालेल्या कॅलरीज हे सुद्धा सहज बघता येतं. अॅपल-सॅमसंगसारख्या कंपन्यांनी बनवलेल्या स्मार्ट घड्याळांनी बाजारात आपलं स्थान निर्माण केलंय. कमी वजनीसोबतच उपयोजित मुल्यामुळे ही घड्याळं आता लोकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. घड्याळ हे केवळ एक 'कालमापक यंत्र' नसून एकुणच मानवाच्या प्रगतीचे यथार्थ दर्शन घडवून आणणारं एक प्रतिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.