Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Used Car Buying Tips: सध्या दसरा-दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर जुनी वाहने खरेदी केली जातात. मात्र, रिसेल वाहन खरेदी करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कारची स्थिती आणि कागदपत्रे अशा दुहेरी ॲंगलने कार घेताना काळजी घ्यावी लागते.
Used Car Buying Tips
Used Car Buying TipsSakal
Updated on

अनिल सुचिता जमधडे

Used Car Buying Tips: दारात चारचाकी वाहन असावे, असे मध्यमवर्गीयाचे स्वप्न असते. नवीकोरी कार खरेदी करणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणूनच सेकंड हँण्ड (प्रीओन्ड) कार घेण्याची क्रेझ वाढत आहे. सध्या दसरा-दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर जुनी वाहने खरेदी केली जातात. मात्र, रिसेल वाहन खरेदी करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कारची स्थिती आणि कागदपत्रे अशा दुहेरी ॲंगलने कार घेताना काळजी घ्यावी लागते.

नोकरी, मेहनत करून चार पैसे हातात आले, की आपल्याकडेही कार असावी, त्यात कुटुंबीयांना बसवून देवदर्शनाला अथवा पर्यटनाला जावे, अशी अनेकांची इच्छा असते. मग साधारण सेकंड हँड वाहनाचा शोध सुरू होतो. नवीन कार घेणे प्रत्येकाच्याच खिशाला परवडेल असे नाही, त्यामुळे प्री-ओन्ड कारचा अत्यंत चांगला पर्याय आज सहज उपलब्ध आहे. सध्या शहरात प्री-ओन्ड वाहनांचे मोठे मार्केट उभे राहिलेले आहे. वाहन बाजार तसेच वाहन खरेदी-विक्री केंद्रांचा सध्या अक्षरशः सुळसुळाट झालेला आहे. मात्र, वापरलेले वाहन खरेदी करताना त्याची काळजीही घेण्याची खरी गरज आहे. आपण नव्याने वाहन चालवायला शिकला असाल, तर प्री-ओन्ड कारचा पर्याय फायदेशीर आहे. वारंवार वाहन चालवून एकदा का हात साफ झाला, की मग नवीन वाहन घेण्यास काहीच हरकत नाही. दुसरा भाग म्हणजे, आपल्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत, रोज या वाहनातून किती जण किंवा किती किलोमीटर प्रवास करणार आहेत, याचा सारासार विचार करूनच हॅचबॅक, सेडान, एमपीव्ही किंवा एसयूव्हीपैकी कोणते वाहन घ्यायचे हे ठरवणे आवश्यक आहे. या शिवाय दररोजचा प्रवास किती होणार आहे, याचा विचार करूनच डिझेल किंवा पेट्रोल इंजिनवर चालणारे वाहन घ्यावे. साधारण रोजचा प्रवास किमान शंभर ते दोनशे किलोमीटरचा होणार असेल तर डिझेल इंजिनवरील वाहन योग्य आहे. मात्र, किलोमीटर मर्यादित असतील तर पेट्रोल इंजिनचेच वाहन घ्यावे. कारण पेट्रोल इंजिनाचे मेंटेनन्स कॉस्ट तुलनेने खूप कमी असते.

Used Car Buying Tips
Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

अपघातग्रस्त कार कशी ओळखाल?

सेकंड हँड वाहन बाजारात अनेक वेळा अपघात झालेली वाहने डागडुजी करून विक्रीसाठी आणलेली असतात. हा धोका अधिक असतो, त्यामुळेच प्री-ओन्ड कार घेताना ती तपासून घ्यायला हवी. कंपनीकडून मूळ कार तयार होताना तिची बॉडी अनेक ठिकाणी रिव्हेटने किंवा लेजरने सील केलेली असते. पण, अपघात झालेली कार पुन्हा तयार करताना त्याला वेल्डिंगच केलेले असते. हे ओळखण्यासाठी कारचे फ्रंट आणि रिअर बॉनेट उघडून त्यांच्या कोपऱ्यांवर असलेले रिव्हेट सील तसेच दरवाजाच्या आजूबाजूला असणारे रबर काढून त्याखालील रिव्हेट सील आणि बूट स्पेसमध्ये स्पेअर व्हील ठेवलेल्या जागेसह त्याखालील रिव्हेट सील तपासायला हवेत. अपघात झालेला असेल तर त्या ठिकाणी केलेले वेल्डिंग, डेंटिंग, पेंटिंग सहज दिसू शकते. एखाद्या मेकॅनिकला सोबत घेऊन ही तपासणी केली तर अधिक फायदेशीर ठरते.

योग्य सस्पेन्शन

जुनी कार आधी कोणी आणि कशा पद्धतीने वापरलेली आहे, हे सांगणे तसे कठीण असते. मात्र, रफ ड्रायव्हिंग झालेले असेल तर कारच्या सस्पेन्शनवरून ते ओळखता येऊ शकते. टेस्ट ड्राइव्ह घेताना अशा कारच्या सस्पेन्शनमधून आवाज येऊ शकतात. ते तपासण्यासाठी कार जाणीवपूर्वक खड्ड्यांतून न्यावी किंवा ओबडधोबड रस्त्याने चालवावी. कार थांबलेली असताना सस्पेन्शन भार देऊन दाबून बघावे. ते उसळी मारून पूर्ववत होत असेल तर सस्पेन्शन खराब झालेले आहे, असे समजावे. सस्पेन्शनवर दाब दिल्यावर ते लगेचच पूर्ववत व्हायला हवे.

ठेवता येतो विश्वास

मारुती, ह्युंदई किंवा अन्य काही कंपन्याचे ट्रुव्हॅल्यू शोरूम्स आहेत. याठिकाणी वाहन घेताना काही अंशी विसंबून राहता येते. कारण या कंपन्या वाहने खरेदी करताना सर्व तपासणी करून घेतात आणि विक्री करताना सर्व दुरुस्ती करून वॉरंटीही देतात. तसेच जी परिस्थिती आहे, त्याची सर्व कल्पना वाहन खरेदी करणाऱ्याला देतात. वाहन नावावर करून देण्याची जबाबदारीही या कंपन्या घेतात.

इकडे बारकाईने द्या लक्ष

व्हेइकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), इन्शुरन्स, पीयूसी, आधीचे कर्ज असल्यास बँक एनओसी तपासून घ्यावी.

आरसीवर चेसिस आणि इंजिन क्रमांक लिहिलेला असतो, तोच नंबर कारच्या चेसिसवर आणि इंजिनवर आहे, याची खात्री करावी.

वाहन घेताना फॉर्म २८, २९, ३० वर स्वाक्षऱ्या घ्याव्यात, वाहनावर कर्ज असेल तर फॉर्म नं. ३५ वर स्वाक्षरी घ्या, सोबतच बॅंकेच्या एनओसीवरही वाहन मालाकच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात.

जुन्या मालकाचे आधार, पॅनच्या कॉपीसोबत सेल्फ ॲटेस्टेड स्वाक्षऱ्या घ्याव्यात

वाहनाच्या दोन्ही चाव्या, ओरिजनल आरसी, इन्व्हाइसही जुन्या मालकाकडून ताब्यात घ्यावे.

जुनी कार घेताना शक्यतो संपूर्ण पेमेंट ऑनलाइन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.