व्हॉटसअॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. नुकतंच यावर डिजिटल पेमेंटची सुविधा सुरु झाली आहे. सध्या गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या अॅपवरून डिजिटल पेमेंट केले जाते. सोशल मीडिया मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉटसअॅपने पेमेंटचं फीचर लाँच केलं आहे. व्हॉटसअॅपचे 40 कोटी युजर्स असून त्यापैकी 2 कोटी युजर्सना या सुविधेचा वापर करता येत आहे. तुम्हालाही ही सुविधा वापरण्यास मिळत असेल तर याबाबत काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.
व्हॉटसअॅप नंबर बँक खात्याला लिंक हवा
व्हॉटसअॅप पेमेंट करण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट आणि त्याला लिंक असलेला मोबाइल नंबर असायला हवा. त्यानंतर तुमचं बँक खातं अॅड करावं लागेल. तेव्हा तुम्हाला युपीआय पिन सेट करावा लागतो. जर तुमच्याकडे आधीपासूनच युपीआय पिन असेल तर त्याचाही वापर करता येतो.
युपीआयवर करता येते पेमेंट
गुगल पे, फोन पे, भीम अॅप प्रमाणेच व्हॉटसअॅप पेमेंट सुविधा युपीआयवर चालते. यासाठी व्हॉटसअॅप वॉलेटमध्ये तुम्हाला पैसे ठेवता येत नाही. तुमच्या खात्यातून थेट पैसे पाठवता येतात. जेव्हा तुम्ही पेमेंटसाठी रजिस्टर कराल तेव्हा व्हॉटसअॅप एक फ्रेश युपीआय आयडी तयार होईल. तुम्ही अॅपमध्ये पेमेंट्स सेक्शनवर जाऊन हा आयडी पाहू शकता.
इतर अॅप्ससोबत करता येतो वापर
ज्याच्याकडे युपीआय़ आयडी आहे त्या प्रत्येकाला तुम्ही व्हॉटसअॅप पेमेंट करू शकता. जर व्हॉटसअॅपवर समोरच्या व्यक्तीचं पेमेंटसाठी अकाउंट रजिस्टर नसेल तरी त्यालाही पैसे पाठवता येतात. यासाठी व्हॉटसअॅप “enter UPI ID" चा पर्याय देतो. तुम्ही हे पैसे भीम अॅप, गुगल पे, फोन पे किंवा इतर युपीआय आयडी वापरून पैसे पाठवू शकता.
युपीआय वापरासाठी मर्यादा
युपीआयसाठी देवघेव करण्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत आहे. व्हॉटसअॅपसाठीसुद्धा ही मर्यादा लागू आहे. युपीआय ही एक मोफत सेवा असून यावर व्यवहारांसाठी कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. युपीआय अॅप्स तुम्हाला लोकांच्या बँक अकाउंटवर, आयएफएससी कोड रजिस्टर करून पैसे पाठवण्यास परवानगी देतो. मात्र ही सुविधा अद्याप व्हॉटसअॅपवर नाही.
फक्त भारतातच सुविधा
व्हॉटसअॅपच्या या सुविधेचा वापर फक्त भारतीय बँक अकाउंटला लिंक असलेल्या भारतातील फोन नंबरसाठीच केला जाऊ शकतो. अनेक लोकांकडे आंतरराष्ट्रीय व्हॉटसअॅप नंबर आहेत. हे लोक व्हॉटसअॅप पेमेंट वापरू शकणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.