नागपूर : व्वा यार, त्याची तर बातच न्यारी. काय बोलतो तो आणि वागणं एवढं साधं आहे ना, एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल असे उद्गार आपण बरेचदा ऐकतो. त्यावेळी आपल्याबद्दलही कुणी असे बोलावे, असे वाटते. परंतु ते मिळविणे सोपे नसते. त्यासाठी कमालीचा संयम, दुसऱ्यांप्रती चांगली भावना आणि शत्रूंवरही प्रेम करण्याची तयारी असावी लागते.
लोकांना "इम्प्रेस" करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचे आहे? मग काही गुण तुमच्यात असलेच पाहिजे. बरेचदा असे होते की, तुम्ही एखाद्याला भेटता आणि ती व्यक्ती तुमच्या अगदी कायम स्मरणात राहते. तुमच्या असे लक्षात येईल की, अशी बरीच माणसे आहेत. अशा लोकांबद्दल सगळे सतत चांगलं बोलत असतात आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील असतात.
मग आपल्यालाही असे वाटत राहते की, आपल्या बाबतीत असे होत असेल का, आपण कोणाच्या लक्षात राहत असू का? हो असेल तर ती आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, आणि नसेल तर तुम्ही ती कला नक्कीच आत्मसाद करून घ्या. स्वतःमध्ये काही चांगले बदल करून काही जुन्या सवयी सोडून काही नवीन सवयी लावून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व सुधारू शकता. जेणेकरून लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. तुम्ही नेहमी त्यांच्या आठवणीत राहाल आणि तुमच्याबद्दल त्यांच्याकडून चांगलाच विचार केला जाईल.
मदत करा, पण परतफेडीची अपेक्षा करू नका
तुम्ही लोकांना मदत करा, पण लोकांकडून कुठलीही अपेक्षा करू नका. स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्या हसण्यावारी न्यायची तयारी ठेवा. आपल्याला असं वाटलं की आपण जर परफेक्ट असू तर लोकांच्या लक्षात राहू. परंतु आपली चूक मान्य करणे आपल्याला कमीपणा वाटतो आणि आपण ते लपवायला जातो. यामुळे होतं काय की आपण एकतर आपल्या चुका मान्य करत नाही. दुसऱ्याने ती दाखवली तर आपण नाकारतो.
स्वतः बोलण्यापेक्षा इतरांना संधी द्या
जर आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल केल्या, आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती मान्य केली तर त्यात आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. लोकांना इम्प्रेस करायच्या नादात आपण त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा आपली स्टेप लावतो. आपण काय काय केलं, कसं केलं आपल्याला आत्तापर्यंत आयुष्यात काय मिळालं, काय नाही मिळालं आयुष्यात तिथवर पोहोचायला आपण कितीक खाचखळगे पार केले, हे सांगत बसण्याच्या नादात आपण समोरच्याला बोलायला वावच देत नाही, यापेक्षा जर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपण समोरच्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल विचारलं तर त्यांना ते आवडेल.
स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा, पण आपले मत इतरांवर थोपू नका
आपण मांडलेल्या मुद्यावर कुणी काही सुचवले तर लगेच आपण आपले मत बदलतो. परंतु असे होता कामा नये. आपले निर्णय एवढे ताकदीचे असावे की ते एखाद्याने ते बदलण्याचा प्रयत्न केला तर आपणास आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे. परंतु हे करताना आपले विचार दुसऱ्यांवर थोपवू नका. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन जे बरोबर असेल ते त्या व्यक्तीला पटेल, रुचेल अशा पद्धतीने समजावून सांगा.
राग, चिडचिड नुकसानदायीच
‘राग किंवा चिडचिड’ यामुळे सर्वाधिक नुकसान स्वतःचेच होते. समोरचा कितीही चुकला, आपल्याला कितीही कमी-जास्त बोलला तरी त्यावर आपली जी प्रतिक्रिया असते तीच आपल्या स्वभावाची ओळख असते. एकदा तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. कितीही राग आला तरी शांत राहणंच हिताचं असतं. राग आल्यावर स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे. एखाद्याचा राग आला तर त्या क्षणी त्याच्याजवळ न जाता शांतपणे विचार करून मग त्या व्यक्तीशी बोलावे.
छंद जपा आणि त्याबद्दल बोलाही
तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर समोरच्याला तुमचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आवडीनिवडीबद्दल समोरच्याला सांगून, त्याची त्याबद्दलची मतं जाणून घेणे महत्वाचे आहे. तुम्हाला गाण्याचा छंद असेल तर तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोलत असाल तर समोरच्याला ती गोष्ट नक्की लक्षात राहील. यासोबतच सर्वांशी आदराने वागणे गरजेचे आहे.
संकलन / संपादन : अतुल मांगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.