इलेक्ट्रिक वाहनांसाठी विमा कंपन्या विविध प्रकारचे ‘कव्हर्स’ ऑफर करतात; मात्र, सामान्य वाहनांप्रमाणेच ईव्ही विमा खरेदी करतानाही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पॉलिसीमध्ये बॅटरीसाठी स्वतंत्र कव्हर, चार्जिंगदरम्यान पूर किंवा आगीमुळे बॅटरीचे नुकसान पॉलिसीत कव्हर होते का, इलेक्ट्रिक वाहनामुळे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे नुकसान कव्हर होईल का, पॉलिसीमध्ये वेगळे दायित्व (Liability) कवच आहे का, वॉल माऊंट चार्जर आणि चार्जिंग केबलसाठी वेगळे कव्हरेज आहे का, या बाबी तपासणे गरजेचे आहे.
व्यापक (कॉम्प्रिहेन्सिव्ह) कव्हर
एखाद्या दुर्घटनेपासून संरक्षण करण्यासाठी व्यापक आणि थर्ड पार्टी अशा दोन प्रकारच्या विमा योजना बाजारात आहेत. इंधनावर धावणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने किमतीने महाग असतात. त्यामुळेच ‘थर्ड पार्टी’ विमा कव्हरऐवजी वाहन पूर्णपणे कव्हर करेल, अशी व्यापक पॉलिसी निवडणे योग्य ठरते. ज्यात थर्ड-पार्टी व्यक्ती, वाहन, मालमत्तेचे कोणतेही नुकसान भरून मिळण्याची शाश्वती असते. या शिवाय व्यापक संरक्षणासाठी विमा कंपन्यांनी ऑफर केलेले ‘ॲड-ऑन कव्हर’ चेक करणे आवश्यक आहे, असे डिजिट इन्शुरन्सचे आदर्श अग्रवाल यांनी सांगितले.
झीरो-डेप्रिसिएशन ॲड-ऑन
इलेक्ट्रिक वाहनांमधील पार्ट्स उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात आणि त्यांची किंमत तुलनेने अधिक असते. त्यामुळेच विम्याचा दावा (क्लेम) करताना झीरो-डेप्रिसिएशन (शून्य घसारा) ॲड-ऑन कव्हरेज फायदेशीर ठरते. कारण डेप्रिसिएशनवर आधारित मोजली जाणारी रक्कम माफ केली जाते आणि नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम दिली जाते. उदाहरणार्थ, बॅटरीचे अवमूल्यन वाहनाच्या पारंपारिक किमतीपेक्षा जास्त वेगाने होते. अशावेळी झीरो-डेप्रिसिएशन ॲड-ऑन सुविधेमुळे दाव्याच्या वेळी ग्राहकाला योग्य परतावा मिळू शकतो.
ठिकाणाचा पॉलिसी प्रीमियमवरील परिणाम
वाहनाचा प्रकार आणि भौगोलिक परिस्थिती किंवा वाहन मालक राहत असलेले ठिकाण हे पॉलिसीच्या अंडररायटिंगवर (जोखिमांकन) थेट प्रतिबिंबित होत असते. उदाहरणार्थ, काही विशिष्ट ठिकाणी वाहन किंवा बॅटरीसारख्या वाहनाच्या घटकांची चोरी होण्याची शक्यता जास्त असल्यास पॉलिसीचा प्रीमियम जास्त असू शकतो. अंडररायटिंग ही विमा कंपन्यांद्वारे प्रदान केलेली सेवा आहे, जिथे कंपन्या विमाधारक व्यक्तींसाठी हमीदार म्हणून काम करतात. अंडररायटिंगच्या निर्बंधांमुळे, ऑफर केलेला विम्याचा प्रीमियम देशाच्या इतर भागात उपलब्ध असलेल्या विम्याच्या प्रीमियमच्या तुलनेत जास्त असू शकतो. इलेक्ट्रिक वाहनाचा विमा उतरवताना ही गोष्ट ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू
विविध विमा कंपन्या भिन्न इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) ऑफर करतात. यात आयडीव्ही म्हणजे, जर आपले इलेक्ट्रिक वाहन चोरीला गेले किंवा दुरुस्तीही होऊ न शकण्याइतके खराब झाले तर आपली विमा कंपनी आपल्याला जास्तीत जास्त रक्कम प्रदान करू शकते. म्हणूनच आयडीव्ही तपासण्याबरोबरच, वाहनाच्या सध्याच्या बाजारातील किमतीचे मूल्यांकन करा. ऑनलाइन इलेक्ट्रिक व्हेकल इन्शुरन्स पॉलिसींची तुलना करत असताना, बाजार मूल्याच्या सर्वात जास्त आयडीव्ही ऑफर करणाऱ्या विमा कंपनीला प्राधान्य द्या. कमी प्रीमियम आकर्षक वाटत असले तरी त्याचे आर्थिक फायदे अधिक नसतात. आयडीव्ही असल्यास वाहनचोरी किंवा एकूण नुकसान झाल्यास सर्वाधिक परतावा मिळू शकतो.
पे ॲज यू ड्राइव्ह'' (पीएवायडी)
मोटर वाहन विमा संरक्षणातील नवीन नियमानुसार आपण वाहन कसे आणि किती वेळ चालवतो त्यानुसार विम्याचा हप्ता ठरणार आहे. इलेक्ट्रिक वाहने सामान्यत: शहराच्या हद्दीत सर्वाधिक चालवली जातात. फ्यूएल्ड म्हणजेच इंधनावर धावणाऱ्या कारच्या तुलनेत ही वाहने कमी चालवली जातात. ‘पीएवायडी’ सुविधा ग्राहकांना वर्षभरात कमी चालविल्या जाणाऱ्या वाहनांसाठी कमी प्रीमियमचा लाभ देते. यात अनेक पॉलिसी घेण्याच्या त्रासातून ग्राहकांची याद्वारे सुटका होते. म्हणूनच इलेक्ट्रिक वाहनासाठी पीएवायडी कव्हर ऑफर करणाऱ्या विमा कंपनीची तपासणी केल्याचे सुनिश्चित करा कारण ते सवलतीच्या दरात प्रीमियम देईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.