Neet Exam Scam : पन्नास लाख द्या, ‘नीट’ची प्रश्नपत्रिका घ्या!;लातुरात रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर प्रत्येकी तब्बल ४० ते ५० लाख रुपये द्या, अशी मागणी पालकांकडे होत आहे.
Neet Exam Scam
Neet Exam Scamsakal
Updated on

लातूर : वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर प्रत्येकी तब्बल ४० ते ५० लाख रुपये द्या, अशी मागणी पालकांकडे होत आहे. या संभाव्य प्रश्नपत्रिकेमुळे तुमच्या पाल्याला ७२० पैकी ६५० गुण मिळतील, अशी खात्रीही पालकांना दिली जात असून संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणारे रॅकेटच येथे कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. ‘नीट’ परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुले-मुली मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे ‘मिनी कोटा’ असाही लातूरचा उल्लेख होवू लागला आहे. पण, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार समोर येत असल्याने लातूरकरांमधून खंत व्यक्त होत आहे. त्यातच आता ‘नीट’च्या पेपरफुटीत सहभाग असल्याच्या संशयावरून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या लातूरच्या दोन शिक्षकांना नांदेडच्या ‘एटीएस’ पथकाने ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. हा लातूरच्या लौकिकाला धक्का असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यानिमित्ताने नीट परीक्षेदरम्यान चालणाऱ्या गैरप्रकारांची माहिती काही क्लासचालक, समुपदेशकांनी ‘सकाळ’ला दिली.

सक्षम पालकांची यादी

क्लासचालक राहुल माने (नाव बदललेले आहे) म्हणाले, लातुरात ‘नीट’चा संभाव्य पेपर देणारे रॅकेट कार्यरत असून ते तब्बल ४० ते ५० लाख रुपयांना पेपर देतात. ५० लाख देवू शकतील, अशाच मुलांच्या पालकांची यादी तयार करून ते त्यांच्यापर्यंत पोचतात. संभाव्य प्रश्नपत्रिका देवू म्हणणाऱ्यांकडे खरोखरच परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न असतात का, अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून विश्वासार्ह क्लासचालकांकडे आणि समुपदेशकांकडे होत असते.

जिल्हाधिकाऱ्यांचे हवे परीक्षेवर नियंत्रण

नीटबाबत बोलताना समुपदेशक सचिन बांगड म्हणाले, ‘‘देशाच्या वेगवेगळ्या भागात या परीक्षेतील गैरप्रकार समोर येत आहेत. त्यामुळे यापुढे ही परीक्षा सरकारने आपल्या आधिपत्याखाली घ्यायला हवी. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती प्रत्येक जिल्ह्यात राबवायला हवी. प्रशासनाचा यात हस्तक्षेप वाढला तर गैरप्रकार आटोक्यात येऊ शकतात, याकडेही बांगड यांनी लक्ष वेधले.’’

दोन संशयित शिक्षकांची रात्रभर चौकशी

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीच्या संशयावरून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या लातूरमधील दोन शिक्षकांना नांदेडच्या ‘एटीएस’ पथकाने शनिवारी (ता. २२) रात्री उशिरा ताब्यात घेवून पोलिस अधिक्षक कार्यालयात सखोल चौकशी केली. त्यानंतर रविवारी (ता. २३) दुपारी त्यांना सोडून देण्यात आले. जवळपास १४ तासांनी त्यांची सुटका झाली. पण, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून पुन्हा चौकशीला बोलावले जाईल, असेही त्यांना सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाबाबत योग्यवेळी माहिती जाहीर केली जाईल, असे पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.