wasota
wasota

वासोट्याची भव्यता जोडीला अथांग शिवसागर

Published on

आपल्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात जावळीच्या खोऱ्याला खूप मोठं महत्त्व आहे. आजही जावळीच्या खोऱ्याचं नाव ऐकल्यावर रपरप कोसळणारा पाऊस, महाबळेश्‍वरपासून जवळपास कोकणापर्यंत पसरलेलं घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी कोयना नदी... असं सारं आठवतं आणि हे अनुभवायचं तर वासोटा किल्ला अगदी बेस्ट जागा. 

पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्‍चिमेला उंचच उंच भयानक कडे, यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. कोयनेवर देशमुखवाडीजवळ धरण बांधलं आहे. कोयनेच्या या बॅकवॉटरला शिवसागर म्हणतात. शिवसागराच्या काठावर असलेल्या बामणोली गावात मुक्काम करता येतो. रात्री दीड-दोनच्या दरम्यान आम्ही गावात पोचलो. काहीजण टेंट लावायला लागले, तर काहीजण शेकोटीसाठी लाकडं गोळा करण्यात व्यग्र झाले. ऑक्‍टोबर महिना असला, तरी प्रचंड थंडी होती. आमचे टेंट अगदी शिवसागराला लागूनच असल्याने कदाचित थंडी जास्त वाटत होती. गप्पागोष्टी झाल्यावर थोड्यावेळाने सगळे आपापल्या टेंटमध्ये जाऊन झोपले. 

प्रत्येक ट्रेकला गेल्यावर काहीही झालं, तरी सूर्योदय चुकवायचा नाही म्हणून मी पहाटे साडेचारचाच गजर लावून झोपले. पहाटे जाग आल्यावर बाहेर पाहिलं, तर गडद अंधार होता. माझ्या आधीच उठून गणेश आकाशातलं चांदणं कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न करत होता. पाहता पाहता पाच वाजून गेले आणि पूर्वेकडून तांबडं फुटायला लागलं. टेंटच्या बाहेर पडले, तर समोर शिवसागराने लाल रंग पांघरायला सुरुवात केली होती. सगळी आवराआवर करून आम्ही शिवसागर पार करण्यासाठी बोटीत बसलो. तासभर बोटीत प्रवास करून आम्ही वासोट्याजवळ पोचलो. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चौकशी आणि तपासणी झाल्यावर आम्ही जंगलातून चालायला सुरुवात केली. या जंगलात अनेक श्‍वापदं (प्रामुख्याने अस्वलं आणि गवे) असल्याने जास्त काळजी घ्यावी लागते. सुरुवातीलाच एक पाणवठा लागतो. जवळपास अर्धा किल्ला चढला, की दोन वाटा फुटतात. उजवीकडची वाट नागेश्‍वराकडं जाते, तर सरळ वासोट्यावर. प्रवेशदारातून डावीकडं गेल्यावर पूर्वेकडच्या बाजूने शिवसागराचा मोठा पसारा दिसतो. इथूनच अजून जरा पुढे गेलं, की आपण दक्षिण टोकावर पोचतो आणि आपल्यासमोर उभा राहतो जुना वासोटा. समोर असलेला बाबूकडा आणि खोलवर गेलेल्या दरीचं दृश्य आपल्याला खिळवून ठेवतं. गडावर आलो, तसाच परतीचा मार्ग आहे. या ट्रेकचे फोटो माझ्या इन्स्टाग्रामवर पाहा. 

कसे जाल? 
१. कोकणातून चिपळूणमार्गे चोरवणे गावातून नागेश्‍वर सुळक्‍याकडून वासोट्यावर येता येतं. 
२. सातारा-कास-बामणोली या गाडीरस्त्याने शिवसागर काठावर येता येतं. बामणोलीतून शिवसागर ओलांडायला लाँचेस उपलब्ध आहेत. 

कधी जाल? 
भर पावसाळ्यातही हा ट्रेक करता येतो; मात्र पाण्याची वाढलेली पातळी आणि घनदाट जंगलामुळे थोडा अवघड होऊ शकतो. ऑक्‍टोबर ते मार्च या ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ आहे. 

टिप्स : 
भर पावसाळ्यात जंगलातल्या पाण्यातून जाताना जळू लागण्याचा धोका असतो, त्यामुळे पावसाळ्यात सोबत मिठाचं पाणी ठेवावं. 
वासोट्यावरून नागेश्‍वर सुळकाही करायचा असल्यास तीन-चार तास जास्तीचे ठेवून प्लॅनिंग करावं. गडावरून परतताना उजेडातच पायथ्याला येऊन शिवसागर पार करणं सुरक्षेच्या दृष्टीनं सोयीचं आहे
.

ट्रेक डिटेल्स 
 उंची : १३०१ मीटर 
 लागणारा वेळ (बोटीतला सोडून) : सहा ते सात तास 
 पाण्याची सोय : गडावर पिण्याजोगं पाणी फार कमी असल्याने सोबत किमान दोन लिटर पाणी ठेवावं. 
 जेवणाची सोय :  बामणोली गावात जेवणाची सोय आहे, मात्र गडावर काहीही नाही. याच गावात खास पर्यटकांसाठी बांधलेली अनेक सुलभ शौचालयंही आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()