आपण गेल्या काही आठवड्यांतील लेखांमधून महाराष्ट्रातील मंदिरांची माहिती घेत आहोत. टाहाकारीनंतर तिथून जवळचे सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर विसरून चालणार नाही. टाहाकारीवरून ठाणगाव-दुबेरे-सिन्नर असा अंदाजे ३० किलोमीटरचा सुस्थितीत असलेला रस्ता आहे. सिन्नर हे पुणे-नाशिक महामार्गावरचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असल्याने पुण्याहून नारायणगाव मार्गे राष्ट्रीय महामार्गाने येथे पोचता येते. मुंबईकरांना येण्यास मुंबई-ठाणे-घोटी-सिन्नर असा मार्ग आहे. सिन्नर शहरातील तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या समोरच हे संरक्षित मंदिर आहे.
एका प्रशस्त आवारात हे मंदिर बांधलेले असून, सभोवती पुरुषभर उंचीची तटबंदी आहे. हे गोंदेश्वराचे मंदिर शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य सप्तस्तरीय (म्हणजे सात थरांमध्ये असलेली रचना) मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. भूमीज शैलीत बांधलेल्या या मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून, त्याला तीन द्वार आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. या मंदिराचीही रचना भूमीज शैलीतच आहे. म्हणजेच मुख्य शिखराच्याच आकाराची लहान लहान शिखरे एकावर एक अशी रचना करत मंदिराचे शिखर बनवले जाते. मुख्य शिखर आणि त्याचे घटक असलेली उपशिखरे यातील साम्य अतिशय लक्षवेधक असते. या रचनेलाच शिखर-शिखरी रचना असेही म्हणतात. सभामंडपातील खांब नक्षीने शिल्पालंकृत असून, त्यांवर डोळ्यांचे पारणे फेडणारी अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवता, अप्सरा, पौराणिक प्रसंग कोरले आहेत.
हेही वाचा : टाहाकारीचे शिल्पसौंदर्य जगदंबा मंदिर
सिन्नर परिसरातील अन्य वैशिष्ट्ये म्हणजे आणखी एक प्राचीन ऐश्वर्येश्वर मंदिर आणि इथून जवळच असलेले गारगोटी संग्रहालय. गारगोटी संग्रहालयात पृथ्वीरचनेदरम्यान घडलेल्या अनेक नैसर्गिक उलथापालथीतून आणि अग्निजन्य खडकांतून तयार झालेल्या विविधरंगी नैसर्गिक गारगोटी, झिओलाईट्स, अनेकविध स्फटिक, खनिजे यांचा खजिना संग्रहित केलेला आहे. अशा पद्धतीचे हे भारतातील एकमेव संग्रहालय आहे.
हेही वाचा : अकोल्यातील सिद्धेश्वर मंदिर
सिन्नर तालुक्याचे ठिकाण आणि महामार्गावरील औद्योगिक केंद्र असल्याने सर्व प्रमुख शहरांशी रस्तेमार्गाने जोडलेले सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, निवास आणि भोजन व्यवस्था सहज होऊ शकते. दोन दिवस जोडून अकोले, टाहाकारी, सिन्नर, नाशिक असा भटकंतीचा प्लॅन करता येऊ शकतो. साधारण पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून सारख्याच अंतरावर ही ठिकाणे आहेत. पुढे नाशिकमध्ये आणि शहराच्या आसपासही अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. अनेक नैसर्गिक आविष्कार आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.