पावसाळा सुरू झाला, की भटक्यांचे पाय आपोआप निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ताल धरू लागतात. यावर्षीचा पावसाळा पर्यटनाच्या दृष्टीने अगदी ‘कोरडा’च जात आहे. पावसाळी पर्यटनात हक्काच्या ठिकाणाचे नाव म्हणजे अंबोली. प्रचंड पावसाच्या या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील थंड हवेच्या गावात वर्षभरात सुमारे ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो. पावसाबरोबरच येणाऱ्या धुक्याचा अलगद, नाजूक स्पर्श मनाला मोहवून टाकतो. जोडीला दाट जंगल आणि जैववैविध्याने नटलेल्या डोंगरदऱ्यांचाही अनुभव चित्तथरारक असतो. अंबोलीतलं सर्वांत मोठं आकर्षण आहे ते पारपोली गावाजवळचा सर्वांत मोठा धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम असलेलं गुहा मंदिर आणि जवळच असलेला कावळेसाद पॉइंट.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अंबोली गाव हे बेळगाव-सावंतवाडी किंवा कोल्हापूर-गारगोटी-सावंतवाडी रस्त्यावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंच असलेल्या या ठिकाणचं वास्तव्य, वर्षाच्या कोणत्याही ऋतूमध्ये आल्हाददायक वाटतं. सावंतवाडीच्या खेम-सावंत या राजघराण्याची ही उन्हाळी राजधानी होती. इथं त्यांचा एक छानसा राजवाडाही आहे.अंबोली परिसरात महादेवगड नावाचा एक डोंगरी किल्ला आहे. अंबोली परिसरातील चौकुळचं जंगल अत्यंत दाट आहे. यात रानडुकरं, ससे, गवे, बिबटे, भेकर, रानमांजर, चितळ आदी वन्यपशू आणि इतरत्र सहसा न दिसणारे अनेक पक्षी विहरत असतात.
अंबोलीहून सावंतवाडीकडं जाताना अंबोली घाटातून जावं लागतं. याच रस्त्यावर प्रसिद्ध पारपोलीचा धबधबा आहे. अंबोलीपासून ११ किलोमीटरवर कावळेसाद पॉइंट आहे. गावापासून ५ किलोमीटरवर हिरण्यकेशीचं गुहामंदिर आहे. मंदिरासमोर एक पुष्करिणी आहे. याच नदीवर बेळगावच्या रस्त्यावर प्रसिद्ध नांगरतास धबधबा आहे. त्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा घनगंभीर आवाज उरात धडकी भरवतो. त्याशिवाय शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे अन्य अनेक पॉईंट आहेत. अंबोली घाट उतरून गेल्यानंतर साटम महाराजांचे समाधीमंदिर आहे.
अंबोलीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या रिसॉर्टसह अनेक हॉटेल आहेत. भोजन आणि निवासाची इथं उत्तम सोय होऊ शकते. स्थानिक गावकऱ्यांनीही हॉटेलं सुरू केली आहेत. मालवणी पद्धतीचं शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, खवय्यांना निश्र्चित समाधान देतील. येथील काही हॉटेलांचं ऑनलाइन बुकिंगही करता येतं.
कसे जाल?
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.