सोनोरीचा मल्हारगड

mahlargad
mahlargad
Updated on

पुण्याच्या आसपास काही वाटांवर लक्ष ठेवून लहान लहान किल्ल्यांची किंवा भुईकोटांची प्रभावळ आहे. काही किल्ले  भुलेश्वर डोंगररांगेच्या माळेत सामावले आहेत. पेशवाईच्या काळात पुणे शहरासोबत जुन्नर, सासवड, अहमदनगर, चाकण अशा प्रमुख बाजारपेठा इथं होत्या. त्यातल्या पुणे आणि जुन्नरच्या बाजारपेठांना जोडणारा रस्ता म्हणजे दिवेघाट. बराच व्यापार या मार्गाने होत असे. या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता आणि टेहळणीसाठी उभारलेले एक त्रिकोणी आकाराचे एक दुर्गशिल्प म्हणजे मल्हारगड किंवा सोनोरीचा किल्ला.

या किल्ल्याची बांधणी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पेशव्यांच्या तोफखान्याचे सरदार पानसे यांनी केली. पुण्याजवळच व तासाभराच्या अंतरावर असलेला हा तसा बऱ्यापैकी अवशेष शिल्लक असलेला किल्ला आहे. किल्ल्यावर पोचायला दोन वाटा आहेत. पुणे-हडपसर-दिवेघाट मार्गे झेंडेवाडी आणि तिथून चार किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या मागच्या दरवाजाच्या खाली आपण पोचतो. अंदाजे २० मिनिटांची सोपी चढाई आपल्याला या दरवाज्यात घेऊन येते. दुसरा मार्ग आहे तो तसाच दिवेघाटाने सासवडवरून सोनोरी गावात पोचतो. याच गावाच्या नावावरून किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात. सोनोरी गावात गाडी लावून साधारण अर्ध्या तासात आपण किल्ल्यावर पोचू शकतो. सोनोरी गावातून दिसणाऱ्या विजेच्या टॉवरच्या दिशेने मार्ग धरून चढाई केल्यास आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोचतो. दोन्ही मार्गावरची चढाई सोप्या श्रेणीतली आहे.

किल्ल्याचा मुख्य दरवाजा भव्य आहे. अद्यापही सुस्थितीतील या दरवाजाच्या कामावरून तत्कालीन दुर्गस्थापत्याची कल्पना येऊ शकते. तट, दरवाजा, नगारखाना, पहाऱ्याच्या देवड्या, माऱ्याच्या जंग्या, तोफांच्या जागा हे सारं इथं पाहता येईल. किल्ल्यावर अन्यत्र दोन तलाव, दोन बांधीव विहिरी, व्यवस्थित तटबंदी ही या किल्ल्याची वैशिष्ट्यं आहेत. बालेकिल्ल्यात एक महादेवाचं आणि एक खंडोबाचं मंदिर आहे. खंडोबाच्या नावावरून आणि जेजुरीचा शेजार लाभला असल्यानेच या किल्ल्याला मल्हारगड असं नाव दिलं गेलं असावं. खंडोबाची अश्वारूढ मूर्ती, म्हाळसा आणि अन्य शिल्पे आहेत. झेंडेवाडीच्या बाजूने दरवाजाच्या उत्तरेला उंचावरून कऱ्हा नदी, जेजुरी, कडेपठार असा विस्तीर्ण परिसर दिसतो.

किल्ल्यावर जाताना पिण्याच्या पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था आपण स्वतः करावी. खाली सोनोरी गावात जुजबी सोय होऊ शकेल. गावातच सरदार पानसे यांचा पेशवेकालीन देखणा बुरूजबंदी वाडा आहे, तो नक्की पाहा.

मल्हारगडाच्या सोबतीनं सासवड परिसरातली प्राचीन मंदिरं, दिवेघाटाच्या पायथ्याला मस्तानी तलाव, दिवेघाटाच्या माथ्यावर असलेलं कानिफनाथ मंदिर, लोणीकाळभोरजवळचा रामदरा अशी ठिकाणं पाहता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.