पवनार (जि. वर्धा) : आता दहावी व बारावीची परीक्षा झाल्यानंतर शाळा व महाविद्यालयांना सुटी लागेल. यानंतर बच्चे कंपनी पालकांकडे मामाच्या, आजी-आजोबांच्या गावाला जाण्याचा आग्रह धरू लागतील. तरुण-तरुणी पर्यटनाला जाण्याचा बेत आखतील. विदर्भात पर्यटनासाठी अनेक स्थळ आहेत. वर्धा जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांपैकी पवनार हे एक पर्यटकांना आकर्षित करणारे प्रेक्षणीय आणि प्रेरक पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक भेट देण्यासाठी येतात.
पवनार हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. याच ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले ब्रह्मविद्या मंदिर आहे. या भूमीतून पर्यटक प्रेरणा घेऊन जातात. सोबतच येथील धाम नदीचा खडकाने आच्छादलेला निसर्गरम्य परिसर पर्यटकांना खुणावतो. आचार्य विनोबा भावे यांनी येथूनच भूदान चळवळीला सुरुवात केली होती. ब्रह्मविद्या मंदिरात विनोबा भावे यांच्या विचारांना मानणाऱ्या भगिनी वास्तव्यास राहतात. विनोबांनी शिकविलेल्या स्वावलंबन आणि साधेपणाचे त्या आचरण करतात. विनोबा भावेंच्या कार्याविषयी पर्यटकांना माहिती दिली जाते.
धाम नदीपात्राच्या मध्यभागी महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची समाधी आहे. येथे भेट देणारे पर्यटक या समाधिस्थळांचे आठवणीने दर्शन घेतात. आचार्य विनोबा भावे हे महात्मा गांधी यांचे शिष्य होते. महात्मा गांधी यांनी त्यांचे पहिले सत्याग्रही म्हणून निवड केली होती. या ऐतिहासिक घटनांच्या अनेक नोंदी ब्रह्मविद्या मंदिरात सापडतात. विनोबा भावे यांनी केलेल्या विपूल लेखणाचे भंडारही ब्रह्मविद्या मंदिरात आहे.
प्रशासनाच्या वतीने पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी नदी परिसर प्रदूषणमुक्त करणे, प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण, नदीकाठ आल्हाददायक करणे, नदीकाठावर हरितपट्टा तयार करताना बारमाही हिरवेगार राहणाऱ्या झाडांची लागवड करणे, परिसरात ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी वाहनांची महामार्गापलीकडे व्यवस्था, विविध रंगी कारंजे, स्वयंचलित पाणीपुरवठा, बोटिंग, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे अशा अनेक सोयीसुविधा पर्यटकांसाठी निर्माण करण्यात येत आहेत. या सर्व सोयीसुविधांमुळे हे पर्यटनस्थळ पर्यटकांचे मन मोहून घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांपैकी हे एक पर्यटकांना आकर्षित करणारे प्रेक्षणीय आणि प्रेरक पर्यटनस्थळ आहे. वर्धा शहरापासून केवळ नऊ किलोमीटर अंतरावर हे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे शहरातील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. येथील धाम नदीला बारमाही असणारे पाणी, खडकांमधून खळखळत वाहत असलेले पाणी, पावसाळ्यात अनेक ठिकाणी निर्माण होणारे झरे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य कारण ठरते.
अनेक वर्षांपासून या पर्यटनस्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत येथील धाम नदीच्या सौंदर्यीकरणासाठी २६ कोटींचा निधी नदीपात्राच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला मिळाला. या कामाला सुरुवातही झाली आहे. काही दिवसांत हे काम पूर्णत्वास जाणार आहे. सौंदर्यीकरणाच्या या कामामुळे पवनार येथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.