‘सोलो’ ट्रॅव्हल ते ‘सोल’ ट्रॅव्हल

सकाळी सातच्या सुमारास माझ्या खांद्यावरची बॅगपॅक आणि हातातली छोटी बॅग सांभाळत मी माझ्या घराचा जीना चढत होते.
Solo Travel
Solo Travelsakal
Updated on

- डॉ. समिरा गुजर

सकाळी सातच्या सुमारास माझ्या खांद्यावरची बॅगपॅक आणि हातातली छोटी बॅग सांभाळत मी माझ्या घराचा जीना चढत होते. शेजारच्या आजी दारात कडीला अडकवलेला पेपर घेत होत्या. त्यांची नजर माझ्यावर पडली. ‘काय दौऱ्यावरून वाटतं?’ (कलाकार असल्यामुळे सतत प्रवास सुरू असतो. माझ्या येण्या-जाण्याच्या या विचित्र वेळा आता शेजाऱ्यांच्याही अंगवळणी पडल्यात!) मी, ‘नाही आजी, खूप दिवसांनी दोन-तीन दिवस सुट्टी मिळाली, मग फिरायला गेले होते. गिरनारला जाऊन आले.’

आजी : ‘वा, वा, दत्तमहाराजांचं दर्शन घेऊन आलीस, छान!’ मी : ‘हो, खूप छान झालं दर्शन.’

आजी : ‘कोण कोण गेला होतात.’ मी : ‘मी एकटीच गेले होते.’

आजी : ‘एकटीच?!’

...आजींच्या स्वरातलं आश्चर्य आणि प्रश्न सुस्पष्ट होते. इतक्यात आतून हाक आली आणि आजी गेल्या. चश्मा लावला नसला, की आजी डोळे बारीक करून बोलतात. पण ‘एकटीच’ हे म्हणताना मी पहिल्यांदा त्यांचे डोळे मोठे झालेले पाहिले. मी हसत हसतच दार उघडलं. कुठंही फिरायला जाऊन आले, तरी घरी परत आल्याचा आनंद काही वेगळाच असतो. आज मी माझी पहिली सोलो ट्रिप करून परतत असल्यामुळे वेगळ्याच उत्साहात होते.

घरी सगळे वाट बघत होते. गरम गरम चहाचे घोट घेत ट्रिपच्या हायलाइट्स घरच्यांना सांगताना वेगळाच ‘सेन्स ऑफ अचिव्हमेंट’ अनुभवत होते; पण अजून कानात आजींच्या स्वरातले ‘एकटीच?!’ घुमत होते. नाही, तसा त्यांचा प्रश्न स्वाभाविकच होता. सुट्टी म्हटली, की कुटुंबाबरोबर नाहीतर मित्र-मैत्रिणींबरोबर एखाद्या छान ठिकाणी फिरायला जाणं हे मस्टच आहे.

नवीन जागा पाहणं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं, गप्पा, अंताक्षरी, चवीनं खाणं, रात्री जागवत मारलेल्या गप्पा रिफ्रेश करतात. मग हे सगळं एवढं आवडत असताना सोलो ट्रॅव्हलचं फॅड हवंच कशाला, असं आजींना काय कुणालाही वाटलं तर त्यात नवल नाही... पण मैत्रिणी, तुला ताज्या अनुभवावरून हक्कानं सांगते : ‘सोलो ट्रिपची मजा काही वेगळीच आहे.’ झिम्माच्या धर्तीवर सांगायचं, तर मी इतकी मजा केली, इतकी मजा केली, की इतकी कुणीच केली नसेल.

तसं तर एकटीनं फिरण्याचे खूप फायदे आहेत. खूप काही शिकवणारा अनुभव असतो तो. आपल्या प्रत्येक निर्णयाला आपण जबाबदार आहोत ही गोष्ट बाईसाठी तरी खूप मजेशीर असू शकते बरंका! साधं हॉटेलमध्ये गेलो, तरी आपण आपल्याबरोबर असणाऱ्यांची मर्जी सांभाळून ऑर्डर देतो. ‘सगळ्यांना साऊथ इंडियन खायचं आहे ना- मग आपल्यालाही डोसाच चालेल.’

अर्थात, हे काय आपण बाई म्हणून त्याग वगैरे करतो असं नाही हं. साधं ग्रुप डायनामिक्स आहे हे. आपल्याबरोबर असलेल्यांशी जुळवून घेणे. पण ‘तुम्ही जे मागवाल ते’ याची इतकी सवय झालेली असते, की हातात मेन्यू कार्ड दिलं, तर काय मागवावं पटकन सुचत नाही.

मग इथं सगळं आपण ठरवायचं. कुठं जायचं, किती बजेट असावं, कुठं राहायचं आहे, काय काय करायचं आहे. (शॉपिंग करायचं मनात असलं, तरी नंतर बॅगा आपल्याला एकटीला वाहायच्या आहेत याचंही भान ठेवायचं.) एकटी फिरणार म्हटल्यावर स्वतःची काळजी स्वतः घेणंही आलंच.

सेफ्टी फर्स्ट. एवढी यातायात आपणच करून जाण्यात खरंच गंमत आहे का? तर उत्तर आहे हो. याच कारण आपण सोलो ट्रॅव्हल करत असलो, तरी आपण एकटे नसतो. उलट कधी नव्हे ते आपणच आपल्या सोबतीला असतो. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःशी बोलणं होतच नाही जणू. अशा प्रवासात विशेषकरून ते होतं. दुसऱ्या कोणाशी गप्पा न मारता, गप्प राहून स्वतःशी बोलतो आपण. किती काय काय उफाळून येतं मनात.

एखादी मस्त मनासारखी गोष्ट जुळून येते प्रवासात आणि आपण आपल्यालाच टाळी देतो मनात. काहीतरी गोंधळ झाला, तर स्वतःलाच दोषही देतो; पण मग सावरतोही स्वतःच स्वतःला. मीच नाही का, बघताबघता दहा हजार पायऱ्या चढून गेले, स्वतः स्वतःशीच गप्पा मारत.

मग शिखरावरून खाली पाहत होते, ढगांचा कापूस आजूबाजूला स्वप्नांसारखा तरंगत होता आणि मी स्वतःच्याच पाठीवरून मनोमन कौतुकानं हात फिरवत म्हटलं, ‘‘बघ, जमतं आहे आपलं छान एकमेकींशी. तुझी माझी टीम सॉलिड आहे. हे केलं, की आपण शक्य!! मग आणखीनही कितीतरी गोष्टी सहज करू. आपण नुसत्या मैत्रिणी नाही, soulmate आहोत.’

कुणी शायरनं म्हटलं आहे ना,

औरों का साथ ढूंढता हर कोई,

खुद से क्यों बेगाना है|

खुद से खुद को मिल कर आज

थोडा सा खुद को जाना है|

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.