समृद्ध संग्रह ‘रुबी थ्रोट’चा

आसामच्या मागुरी बिल गवताळ परिसरात आम्ही पक्ष्यांचे छायाचित्रण करत असताना ध्यानीमनी नसताना अचानक आमचा मार्गदर्शक ‘चायनीज रुबी थ्रोट’ असे ओरडला.
chinese ruby throat bird
chinese ruby throat birdsakal
Updated on
Summary

आसामच्या मागुरी बिल गवताळ परिसरात आम्ही पक्ष्यांचे छायाचित्रण करत असताना ध्यानीमनी नसताना अचानक आमचा मार्गदर्शक ‘चायनीज रुबी थ्रोट’ असे ओरडला.

- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार

आसामच्या मागुरी बिल गवताळ परिसरात आम्ही पक्ष्यांचे छायाचित्रण करत असताना ध्यानीमनी नसताना अचानक आमचा मार्गदर्शक ‘चायनीज रुबी थ्रोट’ असे ओरडला. क्षणात सर्व तिथे गोळा झाले. गवताच्या काडीवर हे महाशय आरामात बसून आजूबाजूचे निरीक्षण करत होते. पटापट त्याचे छायाचित्रण केले आणि भारतात दिसणाऱ्या सर्व ‘रुबी थ्रोट’च्या छायाचित्रांचा संग्रह पूर्ण झाला.

भारतातील पक्षिप्रेमींची पंढरी अर्थात भरतपूरचा दौरा २०१६ साली केला होता. त्यापूर्वीही अगदी नव्यानेच छायाचित्रणाला सुरुवात केली होती, तेव्हाही भरतपूरला गेलो होतो. २०१६ च्या त्या भरतपूर टूरमध्ये पक्ष्यांची थोडीफार ओळख होती. त्यामुळे थोडे पद्धतशीर छायाचित्रण करता आले. अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला थोडीशी झाडी व काटेरी झुडूप होते. त्याभोवताली काही छायाचित्रकार निरीक्षण करत होते. काहीजण चक्क आडवे झोपून त्यांच्या लांब लेन्सेस ताणून तयारीत होते. इतके जण गोळा झाले म्हणजे नक्कीच दुर्मिळ किंवा सुंदर पक्षी असेल, असे गृहीत धरून मीदेखील तिथे थांबलो. सायबेरियन रुबी थ्रोट आहे, असे त्यापैकी एकाने सांगितले. थोड्या वेळाने त्या झुडपाच्या एका मोकळ्या जागेवर टुनटुन उड्या मारत चिमणीच्या आकार व रंगासारखाच एक पक्षी दिसला. कंठ मात्र लाल माणकासारखा. हा इतका दुर्मिळ असेल असे तेव्हा माहीत नव्हते, मात्र इतर लोक फोटो काढतायत म्हणून मीही आयता दिसतोय म्हणून त्याची छायाचित्रे टिपून घेतली. पुढे जसे पक्षी जगताशी अधिक जोडला गेलो, तेव्हा मात्र भरतपूरला टिपलेल्या त्या सायबेरियन रुबी थ्रोटचे महत्त्व कळले. मध्यंतरी विरारमध्ये एका झुडपात हा दिसला होता तेव्हा मुंबईतील शेकडो पक्षिप्रेमी त्याला पाहायला त्या झुडपाभोवती कित्येक दिवस ठाण मांडून होते, मात्र सुरुवातीचा दिवस वगळता सर्वांनाच निराश व्हावे लागले होते.

या रुबी थ्रोट पक्ष्याच्या तीन प्रजाती हिवाळ्यात भारतात काही दिवसांकरिता दिसू शकतात. सायबेरियन रुबी थ्रोट, चायनीज रुबी थ्रोट आणि हिमालयन रुबी थ्रोट हे विशेषतः उत्तर व उत्तर-पूर्व भारतात दिसू शकतात. नेमके कुठे दिसतील, हे जेव्हा दिसतात तेव्हाच कळते. चायनीज रुबी थ्रोट आणि हिमालयन रुबी थ्रोट यांची छायाचित्रे सोशल मीडियावर अधूनमधून येत असत. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रणाची सुप्त इच्छा मनात होतीच. त्यातच या वर्षी मार्चमध्ये सत्तालला जाण्याचा योग आला. कोरोनामुळे दोन वर्षे रखडलेला हा दौरा होता. दोन ट्रीपमध्ये चक्क १२ दिवस तिथे मुक्काम केला. या दौऱ्यात ध्यानीमनी नसताना एक दिवस आमचे मार्गदर्शक हरी लामा आम्हाला सत्तालमध्येच एका रहिवासी वसाहतीच्या बाहेरील बाजूस घेऊन गेले. पडीक जागा व त्याभोवती सिमेंटचा कठडा होता. त्यापलीकडे झाडी वाढली होती. या झाडीत आपण हिमालयन रुबी थ्रोट शोधू या असे लामाजी म्हणाले. काही वर्षांपूर्वी भरतपूरला जसे मला वाटले, तसेच आमच्या चमूतील काहींना वाटले.

दिसतोय ना, म्हणून टिपू या, मात्र ग्रुपमधील डॉ. मंगेश प्रभूलकर या उत्कृष्ट पक्षी निरीक्षकांना त्याचे महत्त्व माहीत होते. अवघ्या दहा मिनिटांत लामाजींनी हिमालयन रुबी थ्रोट शोधून काढला व सर्वांना सुंदर छायाचित्रे टिपता आली. सत्तालचा दौरा संपल्यावर अवघ्या पंधरा दिवसांत आसामचा पक्षी छायाचित्रणाकरिता दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात आम्हाला अनेक दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे टिपता आली. या दौऱ्यातदेखील डॉ. प्रभूलकर होते. ते सोबत असले की पाहिलेल्या सर्व पक्ष्यांची अचूक नोंद ठेवतात. दररोज रात्री जेवण झाल्यावर दिवसभरात पाहिलेल्या सर्व पक्ष्यांची नोंद करणे हा त्यांचा दौऱ्यातील दिनक्रमच असतो. आसामच्या मागुरी बिल गवताळ परिसरात आम्ही पक्ष्यांचे छायाचित्रण करत असताना ध्यानीमनी नसताना अचानक आमचा मार्गदर्शक ‘चायनीज रुबी थ्रोट’ असे ओरडला. क्षणात सर्व तिथे गोळा झाले. गवताच्या काडीवर हे महाशय आरामात बसून आजूबाजूचे निरीक्षण करत होते. आम्हीही पटापट त्याचे छायाचित्रण केले. त्याबरोबरच माझे भारतातील सर्व रुबी थ्रोटचे छायाचित्रण पूर्ण झाले होते. आम्हा वन्यजीव छायाचित्रकारांना अशाच स्वतः ठरवलेल्या छोट्या-छोट्या संकल्पांचे पूर्णत्व झाले की एक वेगळेच समाधान मिळते.

sudhir_gaikwad03@yahoo.co.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.