- डॉ. सुधीर गायकवाड इनामदार
वाऱ्याची झुळूक आल्यावर घुबडाच्या समोरील फांदी किंचित बाजूला सरकते आणि तितक्या वेळापुरते ते घुबड किंचित स्पष्ट दिसते. मग सर्वांनीच वाऱ्याची झुळूक यायची वाट पाहून दोनचार छायाचित्रे टिपायची असे ठरवले. त्या शांत, निर्मनुष्य ठिकाणी अचानक इतकी माणसे कशी, या उत्सुकतेने ते घुबडदेखील आम्हाला निरखून पाहू लागले आणि त्या नादात जागेवरून ते किंचित सरकले. त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही त्याची काही समाधानकारक छायाचित्रे टिपली.
हा छंद जीवाला लावी पिसे... असेच जणू आमच्या बाबतीत होत आहे. दुर्गम भागात जाऊन दुर्मिळ वन्यजीवांचे छायाचित्रण करण्याचा जणू छंदच जडला, परंतु अशा दुर्गम भागात जाताना इतर ठिकाणांपेक्षा थोडा जास्तच अभ्यास करावा लागतो. कारण काही बरे-वाईट घडल्यास लगेच मदत मिळेल याची खात्री नसते. तसेच दुर्गम भागात सुख-सुविधा यादेखील जुजबीच असतात. त्यामुळे सोबत येणारे साथीदार असेच निवडावे, जे या ठिकाणी फारशा सुख-सुविधा नाहीत म्हणून कुरबुर करणार नाहीत. गेली दोन वर्षे काश्मीरला वन्यजीव छायाचित्रणासाठी जाण्याचा विचार मनात घोळत होता, परंतु तेथील अस्थिर सामाजिक व राजकीय वातावरणामुळे त्यादृष्टीने फारशी प्रगती होत नव्हती. पुढे आमच्या अंदमानच्या दौऱ्यात ग्रुपमधील काही सदस्यांशी याबाबत चर्चा केल्यावर काश्मीरला वन्यजीव छायाचित्रणाला जाण्याचा बेत पक्का केला. त्या दिवसापासूनच काश्मीरमध्ये दिसू शकणाऱ्या संभाव्य पशू-पक्ष्यांची यादी तयार करू लागलो. त्या यादीत सर्वप्रथम नाव होते हिमालयीन काळे अस्वल, हिमालयीन तपकिरी अस्वल, हिमालयीन खोकड आणि पिंगट घुबड.
साशंक मनाने श्रीनगर विमानतळावर उतरून आरक्षित करून ठेवलेल्या हॉटेलवर पोहोचायला आम्हाला दुपारचे १२ वाजले. जेवण झाल्यावर ग्रुपमधील सर्व सदस्यांना ब्रिफिंग केल्यावर थोडा आराम करून दुपारी २.३० वाजता छायाचित्रणाला बाहेर पडायचे ठरले. ‘टावनी आऊल’ अर्थात पिंगट घुबडाकरिता सर्वप्रथम प्रयत्न करायचे ठरले. सर्व जण उत्साहात होते. अगदी काही दिवसांपूर्वीच एकदोन छायाचित्रकारांनी या ‘टावनी आऊल’चे चिनार वृक्षाच्या पानाआड डोकावणारे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे साधारणतः त्याच्या ठावठिकाणाचा अंदाज आम्हाला होताच. घुबडे सहसा आपले ठिकाण बदलत नाहीत (जर त्यांना तिथे कुणी त्रास दिला नाही तर...) श्रीनगरपासून ४५ मिनिटांवर असलेल्या बडगामला आम्ही पोहोचलो. वस्तीपासून थोडे दूर एका गुरुद्वाराजवळ गाड्या थांबवून तिथे काही पक्ष्यांचे छायाचित्रण केले आणि नंतर पायवाटेने घनदाट व उंचच्या उंच चिनार वृक्षांच्या वनात शिरलो.
उंच चिनार वृक्षाची पाने १२-२० सेमी लांब आणि रुंद असतात. ती पाने हिरवीगार व गर्द दाटीवाटीची होती. आमचे हे घुबड निशाचर असल्यामुळे दिवसा निष्क्रिय होऊन शांतपणे फांद्याआड दडून बसले होते. तिथे अनेक चिनार वृक्ष होते. त्यामुळे त्याला शोधणे कर्मकठीण काम होणार हे आमच्या लक्षात आले, परंतु काहीही करून आम्हाला त्याचा फोटो हवा होता; कारण हे पिंगट घुबड भारतात काश्मीरव्यतिरिक्त इतरत्र दिसत नाही. आम्हाला एका ठिकाणी बसायला सांगून आमचे मार्गदर्शक त्याला शोधायला निघाले. १५-२० मिनिटांतच त्यांना त्या ‘टावनी आऊल’चे दर्शन घडले, तसे त्यांनी आम्हाला बोलावले. खूप निरखून पाहिल्यावरही आम्हाला ते दिसेना. डोळ्यांवर बराच ताण दिल्यावर चिनार वृक्षाच्या एका भरगच्च फांदीआडून आमच्याकडे टकमक पाहताना त्याचा केवळ चेहराच दिसत होता. सर्वांना लगेच छायाचित्रे टिपण्याचा सल्ला देऊन अजून स्पष्ट दिसते का, याची वाट पाहण्याचे आम्ही ठरवले. प्रत्येकाने वेगवेगळ्या कोनातून आणि वेगवेगळ्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करून पाहिला.
इतक्यात आमच्या ग्रुपमधील डॉ. संतोष यांनी एका उतारावर जाऊन उभे राहून फोटो काढण्याचा प्रयत्न केला. डॉ. संतोष नेहमीच चांगली छायाचित्रे मिळवण्याकरिता विशेष प्रयत्न करतात आणि त्याचा फायदा आम्हा सर्वांनाच झाला. त्या उतारावर उभे राहून घसरता-घसरता स्वतःला सावरत सर्वांनी फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. नंतर लक्षात आले, की वाऱ्याची झुळूक आल्यावर घुबडाच्या समोरील फांदी किंचित बाजूला सरकते आणि तितक्या वेळापुरते ते घुबड किंचित स्पष्ट दिसते. मग सर्वांनीच आळीपाळीने तो ‘कोन’ पकडून वाऱ्याची झुळूक यायची वाट पाहून दोनचार छायाचित्रे टिपायची, असा क्रम निश्चित केला. तितक्यात ग्रुपमधील कोणी तरी म्हणाले, की झाडाच्या विरुद्ध दिशेने जास्त स्पष्ट दिसतंय, मग सर्व जण तिथे धावले. त्या वेळी लक्षात आले, की तो अँगल चांगला नाही, मग पुन्हा आधीच्या उताराकडे धावलो. कदाचित एव्हाना त्या शांत, निर्मनुष्य ठिकाणी अचानक इतकी माणसे कशी, या उत्सुकतेने ते घुबडदेखील आम्हाला निरखून पाहू लागले आणि त्या नादात जागेवरून ते किंचित सरकले. त्या संधीचा फायदा घेऊन आम्ही त्याची काही समाधानकारक छायाचित्रे टिपली. एका अत्यंत दुर्मिळ घुबडाचे छायाचित्र मिळाल्याचे समाधान तर होतेच, पण त्यासाठी केलेली धडपड व धावपळ दीर्घकाळ स्मरणात राहील हे मात्र नक्की. ‘टावनी आऊल’चे छायाचित्रण करता-करता काळोख होऊ लागल्याने आम्ही आमच्या हॉटेलचा मार्ग धरला, दुसऱ्या दिवशी काश्मीरच्या वेगळ्या वनप्रदेशात वेगळ्या पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यास सिद्ध होऊन...
sudhir_gaikwad03@yahoo.co.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.