- डॉ. सूरज एंगडे
क्रोएशियाच्या बेटावरील रिसॉर्टमध्ये असताना मला जानवे धारण केलेले एक गृहस्थ भेटले. अनेक संस्कृतचे संदर्भ देत ते बोलत होते. त्यांचे नाव होते महात्मा दास. क्रोएशियाचे ब्राह्मण अशी त्यांची ओळख. वय वर्षे ४०. व्यवसाय शाकाहारी जेवणाचे डबे बनवणे. त्यांना मी त्यांच्या जानव्याबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की, ते ब्राह्मणत्वाच्या मार्गावर आहेत. त्यांची वीस वर्षांची तपश्चर्या पाहून त्यांच्या गुरुजींनी त्यांना जानवं दिलं. त्यांच्या जानव्याचा जातीशी व त्यांच्या ब्राह्मण होण्याच्या परिस्थितीचा ब्राह्मणाशी काहीही संबंध नव्हता...
इटलीनंतर प्रवासाचा वेग बाल्कन राष्ट्रांकडे परत वळला. खासगी बसने इटलीचा नकाशा पार करून क्रोएशियात आलो. व्हाया स्लोव्हेनिया. स्लोव्हेनियात एक रात्र वुडहाऊसमध्ये राहिलो. अर्थात फार्म हाऊसमध्ये. दुमजली हाऊस संपूर्ण लाकडाने बनवले होते. त्यामुळेच आगीचा वापर अगदी कमी होता. दुरून पाहिले तर ते एखादी पवनचक्की वाटावी, असा या हाऊसचा आकार होता. ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण प्रसिद्ध आहे; पण दुरून जसे हे हाऊस पवनचक्की वाटले तसेच जवळून पाहिल्यावरही होते. याला ग्लॅम्पिंग असे म्हणतात. म्हणजे ज्यांना सुख-सुविधासोबत कॅम्पिंग करता येईल, त्यांच्यासाठी.
बाल्कन राष्ट्रे हे कधीकाळी अखंड युगोस्लावियाचा एक भाग होती. तिथल्या आंतरिक फुटीमुळे युगोस्लावियाचे सात राष्ट्र झाले. क्रोएशिया हे बाल्कन राष्ट्रांचे गोवा आहे. इथे प्रत्येक सुट्टीत अन्य राष्ट्रांचे लोक काही आठवड्यांसाठी घर बसवतात. क्रोएशियाची किनारपट्टी ३,६०० मैल आहे. त्याचा सर्वात महत्त्वाचा कर पर्यटन क्षेत्रातून येतो. अलीकडच्या अहवालात क्रोएशियाचा २० % जीडीपी पर्यटन उद्योगातून आला व त्या क्षेत्राने जवळजवळ ९० हजार लोकांना रोजगार दिला.
क्रोएशियाबद्दलची कुतूहलता मला स्लोव्हेनियाचे जगप्रसिद्ध मार्क्सवादी-हेगेलियन विचारवंत स्लावो झिझेक यांनी ई-मेलद्वारे दिली. क्रोएशियात माझे सहप्रवासी हे मूळ भारतीय वंशाचे. त्यांचा केनियामध्ये जन्म व ब्रिटनमध्ये वाढ, असा कॉस्मोपोलिटन अनुभव घेऊन फिरतात. पण जेव्हा ते माझ्याशी बोलायचे, त्यांचे ब्रिटिश इंग्लिश गुजराती इंग्लिशमध्ये परिवर्तीत व्हायचे. हे ६४ वर्षांचे युवा मित्र रिटायरमेंट लाईफची मजा अगदी प्रामाणिकपणे घेत आहेत. तिकडच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘ते सूर्याची शिकार’ करतात. म्हणजे जेव्हा युरोपात असह्य थंडी येते, तेव्हा त्या काळापुरते दुसऱ्या उष्ण भागात जातात. हीच गोष्ट मी अमेरिकेतदेखील पाहिली. उत्तर-अमेरिकेत राहणारे लोक थंडीच्या दिवसात फ्लोरिडा या टॅक्स फ्रेण्डली राज्यात उन्हाचे चटके घेण्यासाठी काही महिन्यांसाठी जातात.
एके काळी सुट्टी व हंगामी काळासाठीचे स्थलांतर हे एका विशिष्ट वर्गासाठीच उपलब्ध होते; पण मागील चार दशकांतले जागतिक अर्थकारण व कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे सर्वसाधारण ब्ल्यू कॉलर नोकरधाऱ्याला त्याची मजा घेता येणे शक्य झाल्याचे दिसून येते. आता निवृत्तीचे वयदेखील बदलत आहे. आजकाल तिशी व चाळिशीच्या आसपासचे युवकदेखील रिटायरमेंटकडे स्वेच्छेने पाहात आहेत. रिमोट वर्किंगमुळे आजकाल कुठेही बसून काम करता येते. युवा जोडपे जगभ्रमंती करून या संधीचा फायदा उचलत आहेत.
क्रोएशियाच्या एका बेटावर मला रिटायरमेंटची मजा घेणारे लोक पाहायला मिळाले. त्या बेटाचे नाव होते ‘इश्शज’. जादार हे शहर प्रसिद्ध. ‘गेम ऑफ थ्रोन’ची शूटिंग झाली, हेच ते शहर. इथून एका तासात बोटीने पोहोचता येते. या बेटावर अनेक हॉटेल होती; पण आमच्या रिसॉर्टचे वैशिष्ट्य हे की, ते शाकाहारी होते. इथे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सर्व शाकाहारी. इथे आलेले लोक आध्यात्मिक कारणांसोबत पर्यटन असे दोघांचे मिश्रण करून सुट्टीची मजा घेत होते. या रिसॉर्टमध्ये योगा, ध्यान व अनेक थेरेपिजचे पॅकेज घेता येते. अनेक पुरुष व महिला योग, ध्यान करून झाल्यावर एड्रियाटिक समुद्रात डुबकी मारून उन्हात गर्मीची मजा घेत होती.
रिसॉर्टमध्ये फेरफटका मारताना मला एक जानवे धारण केलेला पुरुष दिसला. माझे कुतूहल वाढले; पण तो इसम आंघोळीसाठी जात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. सायंकाळी त्यांच्यासोबत भेट झाली. मी भारतातून आलो आहे, हे लक्षात येताच त्यांचे डोळे आनंदाने मोठे झाले. ते माझ्याशी अनेक संस्कृत भाषेचे संदर्भ देत बोलत होते. त्यांचे नाव होते महात्मा दास. मात्र जन्म नाव होते बोरिस. क्रोएशियाचे ब्राह्मण अशी त्यांची ओळख देता येईल. महात्मा दास ऊर्फ बोरिस हे हरे कृष्णा चळवळीत वयाच्या विसाव्या वर्षी उतरले. त्यांचे गुरू हे अमेरिकन होते. महात्मा दास हे सध्या ४० वर्षांचे आहेत. मागील दोन दशके त्यांनी पवित्रतेची शपथ घेतली. ते संपूर्ण शाकाहारी होते. त्यांचा व्यवसाय शाकाहारी जेवणाचे डबे बनवणे किंवा कॅटरिंग होते. त्यांना मी त्यांच्या जानव्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, ते ब्राह्मणत्वाच्या मार्गावर आहेत. त्यांची वीस वर्षांची तपश्चर्या पाहून त्यांच्या गुरुजींनी त्यांना जानवं दिलं.
त्यांना ते अगदी जबाबदारीचे वाटले. सकाळी सूर्योदयापूर्वी ते दोन तास ध्यान व गायत्री मंत्राचा जप करतात. त्यासाठी हे जानवं घेतलं आहे, असे त्यांनी सांगितले. महात्मा दास यांच्या ब्राह्मणत्वाबद्दलचे ज्ञान पोकळ किंवा दीर्घ असू शकते; पण त्यांची त्यांच्या आस्थेप्रतीची किमया खूप काही सांगून जाते. मी त्यांना असे म्हणालो की, आमच्याकडे जर मला जानवं घ्यायचं असेल तर ते अशक्य आहे. हे ऐकताच त्यांचा चेहरा पडला, चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्यांना दुःख झाल्याचं जाणवलं, अगदी वाईट आहे, असे ते म्हणाले. त्यांना जाती व्यवस्थेबद्दल माहिती होती व ती अगदी कुरूप पद्धत आहे, असे मत महात्मा दास यांनी मांडले. एवढ्यात त्यांची पत्नी लीला आली. आमच्या चर्चा घडल्या. महात्मा दासने जानवं एका जबाबदारीने घातले. त्यांच्या जानव्याचा जातीशी व त्यांच्या ब्राह्मण होण्याच्या परिस्थितीचा ब्राह्मणाशी काहीही संबंध नव्हता, असे मला जाणवले.
आमच्या इकडचे अनेक ब्राह्मण अध्यात्मतेशी संबंध नसतानादेखील घामाने पिवळ्या झालेल्या जानव्याचे भांडवल करून कायम राजसत्तेत घुबडासारखे बसलेले असतात. शाळा, कॉलेज, नोकरी व व्यवसायात सर्वत्र आपले वर्चस्व लादून ब्राह्मणाच्या एकाधिकारशाहीचे स्वप्न पाहतात. चक्रधर स्वामींनी या एकाधिकारशाहीला आपल्या मठात व आपल्या अनुयायांमध्ये आवाज उठवला. त्या काळी ब्राह्मण ‘साधू’ जानवं दाखवून मलाईदार भिक्षेची अपेक्षा करीत असे. चक्रधर महाराजांनी त्या प्रथेला बंद केले. त्यामुळे बिथरलेल्या ब्राह्मणशाहीने चक्रधर स्वामींवर आरोप-प्रत्यारोप करून त्यांच्या कृतीचा विरोध केला.
पुढच्या सदरात आपण बाल्कन राष्ट्रांची विविधतेने नटलेली आध्यात्मिकता, ऑर्थोडोक्स ख्रिस्चीयानिटी, इस्लाम व इथल्या आणि आपल्या संस्कृतीचे साम्य व भेद यांची ओळख करून घेऊ. इथे एक चाळीस वर्षांच्या महिलेसोबत तिच्या वयात येण्याचा अनुभव व तिने पाहिलेले बदल, Age of consent यावर चर्चा करू.
क्रोएशियाच्या बेटावरील रिसॉर्टमध्ये असताना मला जानवे धारण केलेले एक गृहस्थ भेटले. अनेक संस्कृतचे संदर्भ देत ते बोलत होते. त्यांचे नाव होते महात्मा दास. क्रोएशियाचे ब्राह्मण अशी त्यांची ओळख.
surajyengde@fas.harvard.edu
(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, ‘कास्ट मॅटर्स’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.